हिंदी चित्रपटसृष्टीतील पडद्यामागील कलावंतांच्या संपापुढे शरण जात निर्मात्यांनी माघार घेणे हे एक सुचिन्ह म्हणायला हवे. चित्रपटातील ‘हिरो’ची तब्येत बिघडली आहे म्हणून पॅकअप करणारी निर्माते मंडळी, त्या ‘पॅकअप’च्या आधीपासून चित्रिकरणाच्या तयारीत लागलेल्या तंत्रज्ञांचे, स्पॉट बॉयचे आधीचे सहा तास फुकट गेले आहेत आणि पुढचे सात-आठ तास त्याला त्याच्या नेहमीच्या शिफ्टपेक्षा जास्त तास काम करावे लागणार आहे, हे लक्षात घ्यायला तयार होत नाहीत. चित्रपट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या या तंत्रज्ञांची, चांगली कथा लिहिणाऱ्या लेखकांची, गीतकारांची निर्मात्यांना गरज असते. मग त्यांचा माणुसकीच्या नात्याने विचार केला जाऊ शकत नाही का? असा सवाल शनिवारी चित्रपट निर्मात्यांच्या मुस्कटदाबीविरोधात आवाज उठवणाऱ्या चित्रपट कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केला आहे.
स्पॉटबॉयला मानधन वाढवून द्यावे लागले, म्हणून काही महिन्यांपूर्वी तक्रार करणाऱ्या चित्रपटनिर्मात्यांच्या संघटनेतील अनेक मोठय़ा निर्मात्यांनी हिंदीतील आघाडीच्या कलाकारांना कोटीच्या घरात मानधन दिले आहे. त्या चित्रपटासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या आपल्याच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचा धोका निर्माते का पत्करत नाहीत? चित्रपटाची कथा हाच खरा हिरो असेही कित्येक कलाकार, निर्माते सांगताना दिसतात. तरीही लेखकापासून सुरू होणाऱ्या या साखळीत सगळ्यात कमी पैशाचा धनी तो लेखकच असतो. चित्रपटनिर्मितीत कॉर्पोरेट कंपन्या उतरल्यानंतर याही व्यवसायात शिस्त, सुसूत्रतेचा अट्टहास केला जाऊ लागल्याचे दिसू लागले आहे. त्याचा फायदा पडद्यामागे आपली ‘कला’ दाखवणाऱ्यांनाही मिळाला पाहिजे, ही जाणीव आता त्यांच्यातच जोर धरू लागली आहे. त्याची प्रचीती शनिवारी अगदी कलाकारांनाही विश्वासात घेऊन देशभर या मंडळींनी काम बंद पाडले त्यावरून आली आहे. त्यांच्या या संपाच्या शस्त्रापुढे निर्मात्यांनी सामंजस्य करार करण्याची तयारी दाखवली हा या संघटनांचा मोठा विजय म्हणायला हवा.