अचानक येणाऱ्या पावसाने राज्यातील सगळ्या शहरांमध्ये जी धांदल उडाली आहे, ती अनपेक्षित वाटावी अशी आहे. गेल्या वर्षी ऐन थंडीच्या बहरात डिसेंबर महिन्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, तरीही नवे अनेक प्रश्न निर्माण झाले. राज्यात थंडीच्या मोसमाला सुरुवात होताहोताच पावसाळी ढगांनी आक्रमण करून आपले पावसाळ्यात हरवलेले अस्तित्व दाखवून दिले असले, तरीही त्यामुळे पुन्हा एकदा नव्या समस्यांना सामोरे जाण्याची तयारी करणे भाग पडले आहे. चेन्नईतील पावसाने केलेला हाहाकार दूरचित्रवाणीवर पाहून थक्क होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना हा पाऊस आपल्याच दारी धिंगाणा घालू लागल्यावर मात्र चिंतातुर होण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
या पावसाने शेतीचे पुन्हा एकदा नुकसान होणार आहे आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पिकाची नुकसानी होणार आहे. ही सारी परिस्थिती दुष्काळात तेरावा-चौदावा महिना आल्यासारखी आहे. येत्या दोन तीन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे हे नुकसान अधिकच वाढण्याचीही शक्यता आहे. याची झळ फक्त शेतकऱ्याला बसेल असे नव्हे. कांद्यासारख्या पिकावर आणि भाज्यांवर झालेला पावसाचा परिणाम नोकरदारांच्या खिशावरही होऊ शकतो.
अवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते. आणि त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या पावसावरही होतो. हे सारे लक्षात घेता सृष्टीचक्राचे नियम समजवून घेताना, त्याला सामोरे जाण्याचीही तयारी करायला हवी. नोव्हेंबर-डिसेंबरात पडणारा पाऊस हेही नित्याचेच वळण होणार असेल, तर असे करण्याशिवाय गत्यंतरच नाही.