News Flash

हवाई दलाची महिलांना साद!

भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून महिलांचा समावेश करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे

हवाई दलासह लष्कर व नौदलात अन्य विभागांत महिला कार्यरत आहेत.

भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून महिलांचा समावेश करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. वाहतूक करणाऱ्या विमानसेवांमध्ये महिला वैमानिकांची भरती यापूर्वीच सुरू झाली असली, तरीही हवाईदलात मात्र त्यांना मज्जाव होता. आता महिलांसाठी युद्धाचे आकाशही मोकळे झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या ८३ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर, घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे प्रदीर्घ काळापासून विविध पातळीवर चाललेल्या लढाईचा एक भाग. दिल्ली उच्च न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी लष्कर व हवाई दलात महिला अधिकाऱ्यांची पूर्ण सेवा मान्य केली होती. हवाई दलासह लष्कर व नौदलात अन्य विभागांत महिला कार्यरत आहेत. तथापि, त्यांना युध्दभूमीवर पाठविण्यास कोणी तयार नव्हते. हवाई दलास भेडसावणाऱ्या लढाऊ वैमानिकांचा तुटवडा यामुळे दूर होण्याची शक्यता आहे. अलिशान जीवनशैलीची भुरळ पडलेल्या नवयुवकांची प्रतिष्ठेच्या पण खडतर सेवा मानल्या जाणाऱ्या सैन्य दलात दाखल होण्याची उर्मी कमी झाल्याचे संरक्षण दलाचे निरीक्षण आहे.

हवाई दलात सुमारे साडे चार हजार पदे रिक्त आहेत. लष्कर व नौदलात वेगळी स्थिती नाही. लढाऊ विमान आणि वैमानिक यांचे प्रमाण १ : १.२५ असणे गरजेचे असताना ते सध्या १ : ०८१ पर्यंत खाली घसरले आहे. पाकिस्तानी हवाई दलात हे प्रमाण १ : २.५ इतके म्हणजे भारतीय हवाई दलाच्या तुलनेत अधिक आहे. भारतीय हवाई दलात सध्या महिला वैमानिक मालवाहू विमाने व हेलिकॉप्टरचे सारथ्य करतात. नव्या निर्णयामुळे युध्दभूमीवर त्यांना लढाऊ विमानांद्वारे आपले कर्तृत्व सिध्द करण्याची संधी मिळाली आहे. उशिरा का होईना, हवाई दलाने ऐतिहासिक वारसा वर्तमानात प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेतला. हेच शहाणपण लष्कर आणि नौदलाने दाखविण्याची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2015 3:10 pm

Web Title: iaf planning to induct women in fighter stream
टॅग : Indian Air Force
Next Stories
1 फक्त पोलीस मित्र काय कामाचे?
2 पडद्यामागच्या ‘कला’कारीला महत्व कधी?
3 विजयी सप्तक
Just Now!
X