संधिवातासारख्या आजाराचे वय कमी होणे ही बदलत्या जीवनशैलीची देणगी आहे. गेल्या काही दशकांत भारतातील काम करणाऱयांच्या जीवनपद्धतीत जे आमूलाग्र बदल घडत गेले, त्यामुळे वयाच्या साठीत सुरू होणारे गुडघा आणि मणक्याचे दुखणे आता चाळिशीतच सुरू होत असल्याची माहिती पुढे आली आहे. ती काळजी करायला लावणारी तर आहेच, पण धोक्याची सूचना देणारीही आहे. जागतिक संधिवात दिनाच्या निमित्ताने अस्थिरोगतज्ञांनी दिलेली माहितीनुसार वयामुळे सांध्यांची झीज होऊन गुडघा आणि मणक्याशी संबंधित दुखणे उद्भवते. त्याला ‘ऑस्टिओ आर्थ्रायटिस’ म्हणतात. या आजाराचे वय आता कमी होऊ लागले असून तो चाळिशीतच सुरू होत असल्याची खूप उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. दिवसभर एकाच जागी बसण्याने सांध्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. कामाच्या वेळाही नैसर्गिक वेळापत्रकाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱया असल्याने दिवसातला कोणताही वेळ सांध्यांना व्यायाम देण्यासाठी उपलब्धच होऊ शकत नाही, अशी सध्याच्या काम करणाऱयांची अवस्था आहे. विशेषत: माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱयांना तर या आजाराने मोठय़ा प्रमाणावर ग्रासले आहे.
कामाच्या ठिकाणी शरीराची काळजी घेण्याची पद्धत भारतात नाही. काम करणाऱयांचे शरीर आणि प्रफुल्लित मन ही त्या संस्थेच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम करणारी असतात, याची जाणीव नसल्याने सलग बारा बारा तास एकाच जागी बसून राहण्याने शरीरांची झीज अधिक प्रमाणात होत राहते. त्यातच वातानुकूलित वातावरणाची भर पडते. हे सगळे धोकादायक आहे आणि त्याची वेळीच खबरदारी घेतली नाही, तर आयुष्यातील काम करण्याची वर्षे कमी होत जाण्याचीही शक्यता आहे. सांधे आणि मणका ही मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाची संस्था सुरक्षित ठेवण्यासाठी अशी कामे करणाऱया प्रत्येकाने आपल्या जगण्याच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्याची सूचनाच अस्थिरोगतज्ज्ञांनी दिली आहे.