तोकडय़ा कपडय़ांना विरोध, ड्रेस कोड वगैरे शब्द ऐकले की हल्ली प्रतिक्रिया तयार असतात. देशभरात फैलावू लागलेल्या असहिष्णु वातावरणाचा हा परिणाम किंवा ते वातावरण वाढवणारा घटक आहे, असा या तयार प्रतिक्रियांचा आशय असतो. तो अनेकदा खराही ठरतोच; परंतु मुंबई विमानतळावर सोमवारी घडलेली आणि गुरुवारी उघडकीस आलेली घटना जरा निराळी आहे.. येथे एका खासगी विमानसेवेने, आपल्या अंतर्गत नियमांवर बोट ठेवून तोकडय़ा कपडय़ांतील महिलेला विमान-प्रवेशास नकार दिला. हा नियमही अजबच. आमच्या विमानसेवेचे कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक जर याच विमानसेवेने सवलतीत प्रवास करत असतील तर त्यांना सभ्य पोशाखच करावा लागेल, अशा अर्थाचा हा नियम ‘इंडिगो’ या विमानसेवेत लागू असल्याचे या महिलेला सांगण्यात आले. ही महिला माजी कर्मचारी होती आणि तिची नातेवाईक अद्याप याच विमानसेवेची कर्मचारी आहे. त्यामुळे जे झाले ते आमच्या अंतर्गत नियमावलीनुसार झाले असा या विमानसेवेचा पवित्रा आहे.

याचाच सोपा अर्थ असा की, येथे नीतीनियमांबद्दलचे दुराग्रह किंवा कोणताही धर्माभिमान वगैरे काहीही नाही.. हा शुद्ध कामकाजसंबंधित नियमांचा भाग आहे आणि केवळ आपली प्रतिमा जपण्यासाठी एखादी कंपनी असे पोशाखनियम करू शकते. ते पाळले जातील, असे पाहणे ही त्या कंपनीची जबाबदारीच असते. संबंधित महिलेने गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट घातला होता, तो अखेर विमानतळावरच बदलून तिने विजार चढवली आणि मगच तिला विमानात प्रवेश देण्यात आला. म्हणजे नियमांच्या पालनासाठी तीही तयार झाली होतीच.
कतार या इस्लामी देशातील दोहा विमानतळावरून ही महिला मुंबईस आली होती आणि ‘इंडिगो’च्या विमानाने दिल्लीकडे जात असताना तिला अडवण्यात आले. हे सारे अवमानकारकरीत्या झाले, असे तिच्या दोघा सहप्रवाशांचे म्हणणे आहे. परंतु सोमवारी झालेल्या या प्रकाराची वाच्यता गुरुवारी कशासाठी? ही पश्चातबुद्धीच नव्हे का?

होय. ही पश्चातबुद्धीच. तेव्हा त्या एका महिलेला आता न्याय हवा म्हणून कोणीही भांडण उकरण्यात काहीही अर्थ नाही हेसुद्धा अगदी खरे. मात्र व्यापक अर्थाने, ही पश्चातबुद्धी त्या महिलेला झाली हे फारच चांगले झाले.. त्याने आपल्याला, आपलीच बुद्धी एरवी कशी चालते याचा तपास घेण्याची संधी तरी मिळेल..

‘कंपनीचा नियम- अंतर्गत नियम’ वगैरे ऐकून आपले समाधान होते आणि याला उगाच कोण्या दुराग्रहाचा रंग देण्याचे कारण नाही, असा ‘सोपा अर्थ’ काढून आपण गप्प राहातो. शिवाय ‘प्रतिमासंवर्धन’ वगैरे युक्तिवादही अनेकांना पटू शकतात! पण मग ‘गावातील बायकांनी गाउन (मॅक्सी) घालून रस्त्यावर यायचे नाही’ असा ‘अंतर्गत नियम’ – म्हणजे गावापुरता कायदा- नवी मुंबईजवळील एका गावाने केला होता, तेव्हा त्या गावातल्या कथित धुरिणांनीसुद्धा ‘गावाच्या प्रतिमासंवर्धना’चा विचार केला असणार की नाही?

तोकडे कपडे टाळणे हा प्रतिमासंवर्धनाचा मार्ग होय, ही कल्पना मुळात येते कोठून? त्यामागे कोणते दृष्टिकोन, कोणते आग्रह असतात?
ज्या विमानसेवेने ‘कर्मचाऱ्याची नातेवाईक’ म्हणून तोकडय़ा कपडय़ांतील महिलेला अडवले, त्याच विमानसेवेच्या विमानांत तेवढय़ाच लांबीरुंदीच्या कपडय़ांतील अन्य प्रवासी नसतीलच, असेही नाही. त्या प्रवासी महिलांचे पोशाख-निवडीचे स्वातंत्र्य जरी काही सहप्रवाशांच्या मनात विविध भावना निर्माण करणारे असले, तरी आपण त्या स्वातंत्र्याचा आदर करून आपल्या भावनांचे प्रकटीकरण करायचे नसते, हे त्या सहप्रवाशांना माहीत असते, बहुतेक सहप्रवासी सभ्यतेचे ते संकेत पाळतातच, हेही सत्यच की नाही?
तरीही असे नियम असतात, तेव्हा आपण कोणत्या जमान्यात वावरतो आणि ‘प्रतिमासंवर्धना’च्या आपल्या कल्पना काय असतात, हा प्रश्न पडतो. तो पडावा, यासाठी त्या महिलेची पश्चात्बुद्धी मोलाची ठरली आहे.