सत्ता ही गुळाच्या ढेपेसारखी असते आणि सत्तेला चिकटलेले राजकारणी हे मुंगळ्यांसारखे असतात, हे काही आजचे सत्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सत्याचा काल केवळ पुनरुच्चार केला. फरक एवढाच, की या वेळी या वास्तवातील सत्तेचा गूळ आणि त्याला चिकटलेल्या मुंगळ्यांची पात्रे बदलली आहेत. त्यामुळे कालानुरूप काही संदर्भ बदलले. या वेळी सत्तेचा गुळाला चिकटलेल्या मुंगळ्यांचे चेहरे शिवसेना आणि भाजपचे आहेत. हे सरकार सत्तेवर येण्याआधी, याच सत्तेच्या गुळाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मुंगळे चिकटलेले होते. या गुळाची गोडी टिकेल तोवर त्याला मुंगळे चिकटून राहतील आणि तोवर सरकार टिकेल, हे पवार यांनी सेना-भाजप सरकारबाबत वर्तविलेले भाकित हेदेखील इतिहासाच्या अनुभवाचेच बोल आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याआधी राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही त्यामध्ये भागीदार होती. आज भाजप आणि शिवसेनेत ज्या कुरबुरी आणि कुरघोडीचे राजकारण चाललेले दिसते, प्रसंगी उभय पक्ष हमरीतुमरीवर येऊन सत्तेतून बाहेर पडण्याची आव्हाने परस्परांना देत असतात, ते सारे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतच होते.
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या, तेव्हा सत्तेच्या गुळाची गोडी कमी झाल्याची जाणीव राष्ट्रवादीलाच अगोदर झाली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. हा इतिहास पाहता, शरद पवार काल जे काही बोलले त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काही नव्या सिद्धान्ताची एेतिहासिक भर घातली वगैरे मानण्यात काहीच अर्थ नाही. उलट, सत्ताधीश हे सत्तेच्या गुळाला चिकटलेले मुंगळे असतात आणि सत्तेचा गूळ सोडण्यास ते कदापिही तयार असत नाहीत, हे सार्वत्रिक सत्य आता वर्षानुवर्षांच्या अनुभवामुळे सामान्य जनतेलाही पटलेले आहे. शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यातील एक गोष्ट मात्र जनतेने लक्षात ठेवावी अशी आहे. ती म्हणजे, आमचा पक्ष सरकारमध्ये कधीही सामील होणार नाही, हे त्यांनी केलेले निःसंदिग्ध प्रतिपादन! शरद पवार हे अनाकलनीय नेते म्हणून राजकारणात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कोणत्याही कृती वा वक्तव्याकडे जसे आहे तसे पाहावयाचे नसते, हेही आता सर्वांना सवयीने माहीत झाले आहे. सरकारात सामील न होण्याच्या त्यांच्या वक्तव्याचे भविष्य जाणण्यासाठी मात्र अनेकजण उत्सुक असतील, एवढे खरे!…