येत्या काही वर्षांत पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र होईल, पाण्यासाठी युद्धे होतील आणि यात जो प्रबळ असेल त्यालाच पाण्यावर हक्क गाजवता येईल असा इशारा या क्षेत्रातील जाणकार लोक वारंवार देत असतात. मात्र, अजूनही याचे गांभीर्य माणसाला समजलेलेच नसावे. कारण तहान लागल्याबरोबर पाणी समोर येत असल्याने, तहान लागल्यावर विहीरी खोदण्याची वेळ सध्या तरी आलेली नाही. यंदा राज्यातच नव्हे तर देशातही मान्सूनच्या पावसाने बराच काळ दडी मारली तेव्हा दुष्काळाच्या झळांनी माणसाची उमेद आता काजळू लागली आहे. पाणी जपून वापरले नाही तर भविष्यात काय घडू शकते याची भयाण जाणीव यंदाच्या दुष्काळाने करून दिली आहे. त्यातल्या त्यात, माणसाचे एक बरे असते. अशा संकटसमयी सारे एक होतात. तात्पुरत्या स्वरूपात का होईना, त्यावर उपाय शोधतात, आणि संकट दूर होईपर्यंत शहाण्यासारखे वागतात.

सरकारी यंत्रणांच्या उपाययोजनांमध्येही, माणूस हाच केंद्रबिंदू असतो. म्हणून पाण्याचे दुर्भिक्ष्य सुरू होताच पाण्याचे सारे स्रोत जणू माणसाच्या वापरासाठी ताब्यात घेतले जातात. अशा वेळी, अन्य सजीवांना काय भोगावे लागत असेल, याची विदारक वस्तुस्थिती राजस्थानातील एका खेडेगावात बुधवारच्या एका प्रसंगाने सामोरी आली. माणसाने स्वतःच्या वापरासाठी साठवून ठेवलेल्या एका भांड्यात, तहानेने व्याकुळलेल्या बिबट्याने तोंड घातले आणि तो फसला. त्या भांड्यात त्याचा जबडा अडकला आणि हे उमदे जनावर केविलवाणे झाले. अगोदरच तहानेमुळे गलितगात्र झालेला हा प्राणी, पुरता परावलंबी झाला, आणि फसलेल्या या जंगली जनावराला पाहण्यासाठी माणसांची गर्दी भोवती गोळा झाली. कुणी त्याची शेपूट ओढून स्वतःची करमणूक करून घेऊलागले, कुणी मोबाईलवरून व्हिडिओ चित्रीकरण करू लागले. बिबळ्या मात्र, सुटकेच्या असफल प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर थकून गेला होता. अशा वेळी माणुसकीची अनेक रूपे एका वेळी जागी व्हायला हवी होती. प बराच वेळ मनसोक्त करमणूक झाल्यानंतर माणुसकीला जाग आली आणि सहा तासांनंतर बिबळ्याला सोडविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याची मुक्तता झाली. पण या सहा तासांत पाण्याच्या एका घोटासाठी बिबळ्याने जे काही सोसले असेल, त्यातून माणसाने धडा घ्यायला हवा. एक जनावर मडक्यात अडकले एवढीच या घटनेची बातमी नाही. त्या प्रसंगानंतर त्याचे व्हिडीओ जगभर फैलावले. आणि ते करुण दृश्य पाहताना माणुसकीच्या झऱ्यांना महापूरही आले. हे झरे वेळीच जिवंत व्हायला हवे होते.

पाण्याच्या एका घोटासाठी जीवघेण्या संकटात सापडलेल्या एका वन्य पशूने या घटनेतून माणसाला खूप काही सांगितले आहे. पहिली गोष्ट म्हणजे, सर्व सजीवांमध्ये प्रगत असलेल्या माणूस नावाच्या प्राण्यावर अन्य सजीवांच्या जीविताची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. दुसरे म्हणजे, अशा प्रसंगात माणसाच्या बुद्धिमत्तेची कसोटी लागते. एका केविलवाण्या प्रसंगातून एका असहाय्याची मुक्तता करण्यासाठी बुद्धिमान माणसाला सहा तास लागणे दुर्दैवी आहे. आणि तिसरे म्हणजे, भविष्यातील संकटाची जाणीवच जणू या प्रसंगातून निसर्गाने माणसाला करून दिली आहे. अशा संकटात यापुढे केवळ माणसाच्या भविष्याचा विचार करून चालणार नाही. अगोदरच माणसाने वन्यजीवांच्या हक्कांवर अतिक्रमण केले आहे. आता त्यांच्या जगण्याच्या किमान अपेक्षा अबाधित राहतील याचा विचार करूनच भविष्यातील उपाययोजना कराव्या लागतील. आज केविलवाण्या बिबट्यावर वेळ ओढवली असताना त्याची गंमत पाहणाऱ्या माणसाला भविष्याचा विचार करून मनाचा माणुसकीचा कोपरा घासूनपुसून घ्यावाच लागेल. कारण जगण्याचा हक्क माणसाएवढाच प्रत्येक सजीवाला आहे.