दु:ख माणसाला जागं करतं, अंतर्मुख करतं. मग माणूस आपल्या आजवरच्या जीवनाच्या प्रवासाचं निरीक्षण करू लागतो. त्याला काय दिसतं? एकनाथ महाराज सांगतात, ‘‘तूझीच तूज देखतां। काळें गिळिली बाल्यावस्था। तारुण्याचा ग्रासिला माथा। वार्धक्याभंवता लागला असे॥२२२॥ केवळ वार्धक्याचा जरंगा। त्यासीही काळू लागला पैं गा। आयुष्य व्यर्थ जातसे वेगा। हा निजनाडु जगा कळेना॥२२३॥’’ (अध्याय सातवा). पाहता पाहता काळानं बाल्यावस्था गिळली, तारुण्याचाही घास घेतला आणि म्हातारपणाभोवतीही त्याचा पाश आवळत आहे. आयुष्य याप्रमाणे वेगानं सरत आहे. बाल्य तसंच तारुण्याचा काळ व्यर्थ गेला असून वृद्धत्वाचा काळही असाच अतृप्तीत सरण्याची भीती आहे, असं मनात येऊ  लागतं. त्याच्या मनातली ही तळमळच जणू मांडताना एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘क्षणक्षणा काळू जातसे व्यर्थ। कांही न साधे जी परमार्थ। जन्ममरणांचा आवर्त। पुढें अनर्थ रोकडा॥२२४॥’’ (अध्याय सातवा). क्षणाक्षणानं काळ वाया जात आहे. परमार्थ काही साधलेला नाही. जन्म-मृत्यूचं आवर्तन जोरात सुरू असल्यानं पुढे अनर्थच अटळ आहे. आता इथं, परमार्थ म्हणजे काय? तर अशाश्वताचा प्रभाव पुसणारा आणि शाश्वताचं भान आणणारा अभ्यास. तर त्या परमार्थासाठी फार कमी वेळ शिल्लक आहे, असं वाटू लागतं. आजवरचं आयुष्य स्वार्थ साधण्यातच गेलेलं असतं आणि म्हणूनच स्वार्थाकडून परमार्थाकडे पाऊल टाकताना एक चकवाही येतो तो ‘स्वर्गा’चा! स्वर्गप्राप्तीसाठी पुण्यर्कम करीत राहणं, उपासना करणं, हाच परमार्थ वाटण्याचा धोका असतो. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘स्वर्ग नरक कर्म ब्रह्म। चहूं प्राप्तींसी मनुष्यधर्म। यालागीं त्यजूनि पापकर्म। मोक्षधर्म धरावा॥२२५॥’’ (अध्याय ७). माणसाचा जन्म मिळाला तरच चार गोष्टींची प्राप्ती होऊ  शकते. या चार गोष्टी कोणत्या? तर स्वर्ग, नरक, कर्मप्रारब्ध आणि ब्रह्म अर्थात ब्रह्ममय अवस्था! थोडक्यात, पुण्यकर्मानी स्वर्गप्राप्ती होते, पापकर्मानी नरकप्राप्ती होते, पाप-पुण्य कर्माच्या संमिश्र भोगांसाठी कर्मप्रारब्धानुसार मृत्युलोकात कर्माची रेषा घेऊन जन्मप्राप्ती होते आणि केवळ सद्गुरूमयतेनं ब्रrौक्य स्थिती प्राप्त होते. आता ‘यालागीं त्यजूनि पापकर्म। मोक्षधर्म धरावा॥’ हा जो या ओवीचा दुसरा चरण आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. आधी या प्राप्तींचा थोडा संक्षेपानं विचार करू. पुण्यकर्मानी स्वर्ग आणि पापकर्मानी नरकाची प्राप्ती होते, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतंच. पण इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे कुणीही फक्त पापच पाप किंवा कुणीही फक्त पुण्यच पुण्य कमावत नसतो. पण त्यात जे अधिक असतं त्यानुसार आणि त्या आधिक्यानुसारच्या काळासाठी प्रथम त्या त्या लोकाची प्राप्ती होते. पुण्यांश संपला की स्वर्गातून आणि पापांश संपला की नरकातून सुटका होते. मग उरलेले भोग भोगण्यासाठी मृत्युलोकात परतावं लागतं. तिथं परतल्यावर पुन्हा कर्म आणि त्याचं फळ यांचं चक्र सुरू राहतं. तसंच या मृत्युलोकातही माणूस कधी ‘स्वर्ग-सुख’ भोगत असतो, तर कधी ‘नरक-यातना’ सोसत असतो, ते वेगळंच! – चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com