12 July 2020

News Flash

२२८. अद्वैताचा द्वैत पसारा

मायेच्या जगात त्याचा शाश्वत सुखाचाच शोध सुरू असतो.

(संग्रहित छायाचित्र)

शाश्वत परमात्मा आणि त्याची अनंत अशाश्वत आकारांत विस्तारत जाणारी माया यांची लीला म्हणजे ही दृश्य-अदृश्य सृष्टी. खरं तर त्यापलीकडेही असलेल्या दृश्यातीत आणि अदृश्यातीत सृष्टीचा पसारा हादेखील मायेच्याच परिघातला. या सर्व परिघांपलीकडे सद्गुरू तत्त्व आहे! ही शक्तिरूप माया भगवंताचीच असली आणि भगवंतापासून स्वतंत्र भासत असली, तरी ती भगवंताच्याच अधीन आहे. काहींना वाटतं की, ही माया जर भगवंताचीच आहे, तर मग ती माणसाला भ्रमित का करते? त्याच्यापासून दूर का करते? वरकरणी तसं वाटत असलं तरी प्रत्यक्षात माया ही दूरच्या मार्गानं का होईना, अखेरीस शाश्वतासाठीची तगमग निर्माण करत जीवनाचं रहस्य शोधण्याचीच प्रेरणा देते. माया म्हणजे काय? तर अंतरिक्षाच्या सांगण्यानुसार, ‘‘आपली कल्पना संपूर्ण, ते माया जाण नृपवर्या’’ आणि ‘‘निजहृदयींची निजआशा। तेचि माया गा मुख्य क्षितीशा।’’ म्हणजे अशाश्वताशी जखडलेल्या देहबुद्धीजन्य कल्पना आणि त्या अशाश्वताच्या आधारेच अखंड सुख मिळविण्याची आशा, हीच माया आहे! माणसाला जन्मापासूनची एकमेव ओढ ही अखंड सुखी होण्याचीच आहे. भले तो अशाश्वतात गुरफटला असला, तरी त्यातून त्याला शाश्वत टिकणारं सुखच हवं असतं. तेव्हा त्याच्या अंतरंगातली खरी ओढ ही शाश्वताचीच आहे. मायेच्या जगात त्याचा शाश्वत सुखाचाच शोध सुरू असतो. हे सुख व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीच्या आधारे मिळत असल्याच्या भावनेनं तो आवडत्या अर्थात सुखानुकूल, स्वार्थानुकूल व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीला कायमचं पकडून राहू पाहतो. पण काळाच्या प्रवाहात हा आधार टिकून राहात नाही. तेव्हा मग जगात खरंच शाश्वत म्हणून काही आहे की नाही, याचा शोध सुरू होतो. हा शोध शाश्वत भगवंताकडेच वळवतो! मग त्याला जाणवू लागतं की, भगवंताची माया भगवंताच्याच अधीन आहे, पण आपण मायेच्या अधीन असलो, तर मायेच्या विविध अस्थिर आकारांत गुंतून आपण दु:खच भोगू. पण एका भगवंताशी मनानं जितकं जोडले गेलो, तर हा मायेचा प्रभाव लोपेल. संत एकनाथ महाराज एका अभंगात सांगतात, ‘‘जें जें दिसे तें तें नासे। अवघें ओस जायाचें॥’’ जे जे म्हणून आज दिसत आहे ना, ते ते काळाच्या ओघात रूप पालटत नष्ट होणार आहे. अहो आपल्या भोवतालची माणसं, वस्तूच कशाला? आपल्यातही जन्मापासून आजवर किती बदल झाला आहे, ते आठवून पहा. देहाच्या आकारमानात, प्रकृतिमानात, केसांच्या रंगात, त्वचेच्या तुकतुकीतपणातही वयपरत्वे पालट होत गेला. हा बाह्य़ रूपात्मक बदल आहे. त्याचबरोबर कल्पना, धारणा, वासना, कामना यांतही किती पालट होत गेला! हा आंतरिक बदल आहे. तर असा अंतर्बाह्य़ पालट एका आयुष्यात आपण स्वत:मध्येही अनुभवत आहोत मग जगाच्या अशाश्वततेचा आणखी काय पुरावा हवा? आपण आता या क्षणी आहोत, उद्याचं सोडा! पुढच्या क्षणी काय होईल, आपण असू का, याचा नेम नाही, इतकं जगणं अशाश्वत आहे! मग या क्षणाचा अत्यंत सकारात्मक वापर करायला हवा, ही जाग मायाच आणते! मग अनेक आकारांत व्यक्त झालेल्या मायेचा आधार तो एक परमात्माच आहे, असं संत सांगतात. मायेच्या बळावर अनेकविध रूपांत प्रकटूनही त्या भगवंताचा एकपणा अखंड आहे! राजा जनकाला अंतरिक्ष सांगतो, ‘‘एवं एकपणीं बहुपण। रूपा आणी मूळींची आठवण। परी बहुपणीं एकपण। अखंडत्वें पूर्ण तें कदा न भंगे॥ ७९॥’’

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2019 2:32 am

Web Title: article ekatmayog akp 94
Next Stories
1 २२७. लीला-जगत्
2 २२६. प्रश्न-जाल
3 २२५. माया-विस्तार
Just Now!
X