News Flash

२३७. खरा कर्ता

नीट विचार करताच त्याचं उत्तर लख्खपणे सापडतं!

(संग्रहित छायाचित्र)

आपण कर्तेपणा स्वत:कडे घेऊन जगत असतो आणि म्हणूनच कर्माबाबत मर्यादेपेक्षा जास्त चिंता करतो. अहंभावातून आपली र्कम आपण करीत असतो. त्या समस्त कर्माचा प्रमुख हेतू कर्तव्यपूर्ती हा नसतो, तर आपल्या अपेक्षांची पूर्ती हा असतो. या अपेक्षा देहबुद्धीनुसार मनात उद्भवतात आणि त्या मनोकल्पित देहसुखाच्या ओढींनुसार असतात. त्यात वास्तवाचं भान असतंच असं नाही. त्यामुळे अनेकदा अवास्तव अपेक्षा मनात ठेवून मनाच्या ओढीनुसार होत असलेल्या कर्माबद्दल नि:शंकता नसते. त्या कर्मातून नेमकं कोणतं फळ वाटय़ाला येईल, याबाबत चिंता असते. म्हणजेच आपल्या अपेक्षांशी विपरीत फळ मिळेल, ही भीती असते. पण आपण केवळ निमित्तमात्र आहोत, कर्ताकरविता परमात्मा आहे, हा भाव दृढ झाला की आंतरिक धारणा, दृष्टिकोन, आकलन यांत पालट होऊ  लागतो. पण अनेकांना वाटतं की, माणूस स्वत:च्या जोरावर कर्म करतो- मग कर्तेपण परमात्म शक्तीला का द्यायचं? नीट विचार करताच त्याचं उत्तर लख्खपणे सापडतं! आपण हात-पाय, डोळे आदी कर्मेद्रियांनी कृती करतो. त्या कृतीसाठी जमेल तसा विचार करतो, निर्णय घेतो. पण हे खरंच ‘स्वबळा’वर असतं का? आपण डोळ्यांनी पाहतो, पण डोळ्यांतील पाहण्याची शक्ती आपण निर्माण केली का? ती शक्ती टिकवणं तरी आपल्या हातात आहे का? एका परिचिताचा तरुण आप्त एकदा भेटला. त्याची पाहण्याची शक्तीच झपाटय़ानं ओसरत होती. मला म्हणाला की, ‘‘मला तुमचं रूप दिसत नाही. फक्त अगदी धूसर आकार तेवढा दिसतो आहे आणि हे दिसणंही पूर्णपणे संपुष्टात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे!’’ लाखो लोकांमध्ये क्वचितच एखाद्याला असा विकार जडतो. पण मग सांगा, त्या लाखो लोकांतला एखाद्जण मीदेखील असू शकत नाही का? मग तशी वेळ आली, तर डोळ्यांची पाहण्याची शक्ती गमावू न देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे का? तर अर्थातच नाही. तेव्हा आपण अनेक अवयवांनी युक्त देहामार्फतच कर्म पार पाडतो हे खरं, पण त्या-त्या अवयवात असलेली कर्म पार पाडण्याची शक्ती आपण उत्पन्न करू शकत नाही. इतकंच नव्हे, तर ती शक्ती टिकवणंही आपल्या हातात नाही. त्या क्षमतेचा अभाव भरून काढण्याचे प्रयत्न आपण अवश्य करतो. उदाहरणार्थ दृष्टिक्षमतेत कमतरता आली असेल, उणीव निर्माण झाली असेल, तर चष्मा लावून पाहण्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही मूळ अवयवाच्या क्षमतेइतकी अचूक क्षमता उपकरणांनी लाभत नाहीच. तेव्हा या देहामार्फत कर्म पार पडतं हे खरं, पण या देहाची शक्ती ही परमात्म्यानंच दिलेली आहे आणि ती किती काळ टिकेल, यावर या देहाची काही सत्ता नाही! असं असताना ‘मी’च्या संकुचित ओढींनुसार संकुचित अपेक्षांच्या पूर्तीसाठीची र्कम करण्यापेक्षा त्या परमात्म शक्तीचं अवधान राखत कर्तव्यकर्माची पूर्ती करीत गेलो तरी कर्माचा पसारा बाधक ठरणार नाही. कर्तेपणाचा अहंकारच लयाला गेला, तर मग मन, बुद्धी आणि चित्ताचा संकुचितपणाच ओसरेल. अंतरीक्ष सांगतो, ‘‘समूळ मावळल्या अभिमान। कैंची बुद्धि कैंचें मन। बुडे चित्ताचें चित्तपण। ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे।।११४।।’’ पण त्यासाठी आधी अहंच्या जागी सोहंभाव प्रगटावा लागतो. मग चित्तात चैतन्य प्रकट होतं. मनाचं उन्मन होतं आणि देहबुद्धीच्या जागी देवबुद्धी विलसू लागते! – चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:03 am

Web Title: article ekatmyog akp 94
Next Stories
1 २३६. जीवन-धारणा
2 २३५. मायाप्रभाव
3 २३४. स्वप्न-योग
Just Now!
X