देहाचा जो चंचल अहंभाव आहे, देहअहंता आहे तिलाच ‘मन’ म्हणतात! त्या मनाच्या महासागरात नाना संकल्प-विकल्पांचं जाळं फेकलं जातं. समस्त हवं-नकोपणा म्हणजेच संकल्प आणि विकल्प. जे हवं ते मिळतंच असं नाही, मिळालं तरी टिकतंच असं नाही. जे नको ते टळतंच असं नाही. त्यामुळे या संकल्प-विकल्पांमुळे भीती, शोक आणि दुखानं अंत:करणच भरून जात असतं. मग अंतरिक्ष सांगतो, ‘‘देहअंहतेचें शहाणपण । तिये नांव गा ‘बुद्धि’जाण। ते बुद्धीनें निश्चय केला पूर्ण। आम्हां जन्ममरण अनिवार॥१११॥’’ देह अहंतेचं जे शहाणपण आहे तिलाच बुद्धी म्हणतात! म्हणजे ‘देह म्हणजेच मी’ या जाणिवेतून     देहाला जपणारी, जोपासणारी कृती सुचणं हीच माणसाला बुद्धिमत्ता वाटते! मग या बुद्धीनं स्वतची ओळख तपासली. जे नाव आपल्याला लाभलं आहे, जी माणसं लाभली आहेत, जो सामाजिक परीघ लाभला आहे, पारंपरिक पाश्र्वभूमी लाभली आहे ती सगळी जणू या देहाचीच ओळख आहे. ही ओळख का आणि कधीपासून आहे? तर जन्म झाल्यामुळे आणि जन्म झाल्यापासून ती चिकटली आहे. बरं, ती कधीपर्यंत टिकणारी आहे? तर ती मृत्यूपर्यंत टिकणारी आहे. मृत्यू ही ओळख तर पुसून टाकणार आहेच; पण ‘मी’ची जगण्याची संधीही हिरावणार आहे. देहाला चिकटलेल्या देहबुद्धीच्या या आकलनामुळे माझा जन्म झाला आहे आणि मी मरणार आहे, या दोन्ही धारणा पक्क्या झाल्या आहेत. आता कुणीही म्हणेल की, जन्म आणि  मृत्यू काल्पनिक थोडेच आहेत? जन्म झालेला दिसतोच आणि मृत्यू झालेलाही दिसतोच की! तर जन्म आणि मृत्यू या कल्पना नाहीत, पण ‘माझा’ जन्म झाला आहे आणि ‘माझा’ मृत्यू होणार आहे, हा विचार अनंत कल्पनांची साखळी निर्माण करणारा आहे. माझ्या जन्माआधीही जग होतं, जीवन होतं आणि माझ्या मृत्यूने त्या जगात आणि जीवनाच्या प्रवाहात कोणताही खंड पडणार   नाही, या वास्तवाचा त्यात विसर आहे. त्यात केवळ देह अस्तित्वालाच प्रमुख स्थान आहे, पण हा देह ज्याचा आहे त्याच्या वास्तविक स्वरूपाचं भानही नाही. खरं तर जन्म आणि मृत्यू हा या देहाचा    आहे, माझा नव्हे! जे ‘स्व’चं अस्तित्वभान आहे ते सदोदित आहे, हा अनुभव असूनही ती जाणीव नाही, त्याचा विसर आहे. सगळा विचार,     सगळ्या कल्पना, सगळ्या धारणा या देहाशीच जखडलेल्या आहेत. मग अंतरिक्ष म्हणतो, ‘‘एवं देहाभिमानाचे माथां। चित्तचतुष्टय़ अवस्था। मुख्य संसाराचा कर्ता। जाण तत्त्वतां देहाभिमानु॥११२॥’’  अशा प्रकारे देहाभिमानाच्या मस्तकी मन, चित्त, बुद्धी आणि अहं या चार अवस्था असतात आणि त्यामुळे या संसाराचा कर्ता देहाभिमानच आहे. यात बदल मात्र अवश्य होऊ शकतो. कधी आणि कसा? तर अहंचं सोऽहं झालं, चित्तात चतन्य प्रकटलं, मनाचं उन्मन झालं आणि बुद्धी देहभाव सोडून परमभावाशी निश्चयानं युक्त झाली, तरच हे साधेल (अहंकार धरी सोहंपण। तैं चित्तीं प्रगटे चतन्यघन। तेव्हां मनही होय उन्मन। बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मीं॥११३॥). अहंभावाच्या जागी सोहंभाव येणं म्हणजे काय? तर हा धारणेतला पालट आहे. मी खरा कर्ता नाही, मी निमित्तमात्र आहे, कर्म करण्याचं स्वातंत्र्य तेवढं मला आहे, खरं कर्तृत्व त्या परम सत्तेचंच आहे, चतन्यशक्तीचंच आहे, ही जाणीव अनुभवानं स्थिर होणं म्हणजे अहं मावळून सोऽहं भाव प्रकट होणं आहे.

– चैतन्य प्रेम