जन्मापासून आपल्याला देहाची भक्ती जडली आहे. या देहभावातूनच सुखाभास आणि दु:खाभास तीव्र होतो, लोभ, मोह, आसक्ती चिकटते. एकनाथ महाराज अकराव्या अध्यायात सांगतात, ‘‘विषयप्राप्तीं जो हरिख। तया नांव म्हणती ‘सुख’। विषयविनाश तेंचि ‘दु:ख’। परम असुख त्या नांव॥८७॥’’ या देहगत इंद्रियांचं विषयसुख ठरलेलं आहे. मधुर शब्दांच्या श्रवणानं कानांना श्रवणसुख लाभतं, सुंदर रूपदर्शनानं डोळ्यांना दृष्टीसुख लाभतं, याप्रमाणे घ्राणेंद्रियांना सुगंधसुख, त्वचेला स्पर्शसुख आहे. त्या त्या इंद्रियांना त्यांची त्यांची विषयसुखं प्राप्त झाली की मोठा आनंद होतो. त्या सुखप्राप्तीत अडथळा आला की दु:ख होतं. त्या विषयांच्या प्राप्तीत कायमचा मोडता आला, तर मग त्याच्यासारखं परम दु:ख नाही, असंच माणूस मानतो.

या शोक आणि मोहाच्या चक्रात भरकटत माणूस अनेकवार जन्मतो आणि मरतो. अनेक प्रकारचे देह प्राप्त करतो, पण त्या प्रत्येक जन्मात देहाभिमानाच्या खोडय़ात सापडतो आणि दु:खं भोगत जगतो. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘शोक-मोह-सुख-दु:ख। येणेंचि ‘देहाची प्राप्ती’ देख। देहाभिमानें देह अनेक। दु:खदायक भोगवी॥८८॥’’ (अध्याय १०). जन्मभर याच सुख-दु:खाच्या चक्रात भिरभिरताना ज्या अतृप्त इच्छांना कवटाळून माणूस मरतो किंवा एखाद्याबद्दलचा तीव्र वैरभाव किंवा द्वेष उरात ठेवून मरतो; त्याच अतृप्त इच्छा आणि तोच वैरभाव त्याला पुन्हा जन्माला घालतो! एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जो जेणें तीव्रध्यानें मरे। तो तेंचि होऊनि अवतरे। कां जो निमे अतिद्वेषाकारें। तो द्वेषानुसारें जन्मतु॥८९॥’’ थोडक्यात माणसानं खरं पाहता किती सावधपणे जगलं पाहिजे, हेच एकनाथ महाराज लक्षात आणून देतात. आपल्या जगण्याची रीत सुधारली पाहिजे, वैर आणि द्वेषभावना मनात उत्पन्न होताच आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं ते सांगतात. ज्या देहप्रेमानं आपण भारलो असतो, तो देह प्रत्यक्षात कसा आहे? तर, ‘‘अस्थिमांसाचा कोथळा। विष्ठामूत्राचा गोळा।’’, असं त्याचं वर्णन नाथांनी आठव्या अध्यायात केलं आहे. पण हाच नरदेह मोक्षाभ्यासासाठी साधनही आहे, असं नमूद करीत मनुष्यजन्माचं आणि मनुष्यदेहाचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे.

नवव्या अध्यायात नाथ सांगतात, ‘‘देहाऐसें वोखटें। पृथ्वीमाजीं नाहीं कोठें। देहाऐसें गोमटें। पाहतां न भेटे त्रिलोकीं ॥२५१॥ वोखटें म्हणोनि त्यागावें। तैं मोक्षसुखासी नागवावें। हो कां गोमटें म्हणोनि भोगावें। तैं अवश्य जावें नरकासी ॥२५२॥ तरी हें त्यागावें ना भोगावें। मध्यभागें विभागावें। आत्मसाधनां राखावें। निजस्वभावें हितालागीं ॥२५३॥’’ म्हणजे, या मनुष्य देहाइतकं वाईट या पृथ्वीतलावर काही नाही आणि या देहाइतकं उत्तम त्रलोकात काही नाही! वाईट म्हणून या देहाचा त्याग करावा, तर मोक्षसुख प्राप्तीची शक्यताच उरत नाही. हा देह उत्तम आहे म्हणून भोगसुखात रमू द्यावा, तर तोच नरकयातनेत ढकलतो!

म्हणूनच, या देहाचा त्याग न करता किंवा अनिर्बंध भोगांनाही वाव न देता, हा देह मध्यममार्गी राखावा. म्हणजेच त्याग आणि भोगामध्ये संतुलन साधत, आत्मसाधनेत राबवावा! आता त्याग आणि भोग यात संतुलन साधण्याची कला आत्मसात करणं काही सोपं नाही. जो आत्मस्थ आहे त्याच्याच आधारानं ते साधेल. – चैतन्य प्रेम