जे जे अशाश्वत आहे ते ते आज ना उद्या नष्ट होणारच आहे. त्यामुळे त्यात जो गुंतला आहे त्याच्या वाटय़ाला कधीच परम सुख, परम शांति, अखंड निश्चिती येऊ शकत नाही. मग तो मृत्युलोकात असो की स्वर्गात असो! मग प्रश्न हा की खरं परमसुख आहे कुठे? तर त्याचं उत्तर आहे की जो परम सुखस्वरूप आहे, परम आनंद स्वरूप आहे, परम शांतिस्वरूप आहे त्याच्याचपाशी परमसुख आहे! आणि असा केवळ खरा सद्गुरूच आहे! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जाणोनि विषयांचें नश्वरपण। पावावयालागीं ब्रह्म पूर्ण। सद्गुरुसी अनन्यशरण। रिघावें संपूर्ण श्रद्धायुक्त।।२७३।। सद्गुरुवचनमात्रे माया। तरेन हा निश्चयो राया। येणें सद्भावें लागतो पायां। पावावया निजस्वार्थु ।।२७४।।’’ विषयांची नश्वरता अनुभवानं जाणण्यासाठी, मनात ठसण्यासाठी आणि त्यायोगे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी सद्गुरूपाशी अनन्य श्रद्धेनं शरण गेलं पाहिजे. ‘शरण’ हा शब्द खटकायची कोही गरज नाही कारण भौतिकातल्या लाचारीपायी आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा शरण जातो. इथं शरणागतीचा अर्थ मनाच्या नश्वराकडे असलेल्या सगळ्या गती खुंटणं हा आहे. मग त्या सद्गुरू बोधावर विश्वास ठेवून जर जगू लागलो, तर मनातल्या मोहभ्रम-आ                                                                                                                                                                                                                                                         सक्तीचा जो मायिक भवसागर आहे तो सहज तरून जाता येतो! आसक्तीयुक्त अंतकरण हाच भवसागर आहे! तो तरून जाणं हाच खरा शुद्ध स्वार्थ आहे. पण हा सद्गुरू खरा मात्र पाहिजे. त्याची लक्षणं नाथांनी विस्तारानं सांगितली आहेत. ती मूळ ‘एकनाथी भागवता’त वाचावीत. पण खोटय़ा स्वयंघोषित ‘सद्गुरू’पासून सावध करताना नाथ म्हणतात, ‘‘जेवीं अमृत म्हणतां। चवी न लभे गा सर्वथा। तेवीं शाब्दिक ज्ञानयोग्यता। अनुभववार्ता स्वयें नुपजे।।२८४।। जेणें स्वयें चाखिली नाहीं चवी। तो दुजयातें गोडी केवीं लावी। यालागीं जो पूर्णानुभवी। तो तारि सद्भावें सच्छिष्यासी।।२८५।।’’ अमृत हा शब्द काही अमृताची चव चाखवीत नाही! त्याप्रमाणे ज्याच्याकडे निव्वळ आध्यात्मिक शब्दज्ञान आहे तो आत्मानुभव काही देऊ शकत नाही! मग खरा सद्गुरू कसा असतो? तर, ‘‘देहीं असोनि नाहीं अहंकृती। गेहीं असोनि नाहीं गृहासक्ती। शेखीं लोकांमाजीं लौकिकस्थिती। सुखें वर्तती लोकांसरिसें।।३०८।।’’  तो देहात असतो, पण देहभावात कणमात्रही आसक्त नसतो. तो घरातही असू शकतो, पण प्रपंचाच्या आसक्तीत कधीच नसतो, लोकांमध्ये तो सर्वसामान्य लोकांसारखाच वावरत असतो. त्याची एक फार मोठी खूण मात्र असते. ती म्हणजे तो कोणत्याही स्थितीत असो, तो सदैव आत्मतृप्त असतो! नाथ म्हणतात, ‘‘त्याचे गुरुत्वाची वोळखण। अंगीं निजशांति पूर्ण। हेंचि सद्गुरुत्वाचें लक्षण। मुख्य भूषण हेंचि राया।।३१२।।’’ त्याच्यापाशी निजशांती सदैव असते. ही आत्मशांती हेच त्याचं मुख्य भूषण आहे. मग नाथ महाराज मोठं रहस्य इतक्या सहजतेनं सांगतात की त्याचं मोल आणि गूढार्थ पटकन लक्षातही येत नाही! त्या रहस्यापाशी आपण या सदराचा समारोप करणार आहोत. ‘एकनाथी भागवत’ ३१ अध्यायांचं आहे आणि त्यातल्या तिसऱ्या अध्यायाच्या जेमतेम मध्यावर आपण पोहोचलो आहोत. पण जे महत्त्वाचं सांगायचं आहे ते बरंचसं सांगितलं गेलंच आहे. अखेरच्या चार भागांत आपण संक्षेपानं का होईना, ‘एकात्मयोगा’चं तथ्य पाहणार आहोत.

– चैतन्य प्रेम