जन्मापासून माणसाची प्रत्येक कृती ही सुखाच्याच हेतूनं होत असते. खरं सुख कोणतं, हे मात्र कळत नसल्यानं सुखासाठी म्हणून माणूस जी जी धडपड करतो, त्यातून सुखाचा रस अगदी कमी आणि दु:खाची चिपाडंच अधिक वाटय़ाला येतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि खरी अखंड सहजसुखस्थिती प्राप्त व्हावी यासाठी भक्तीमार्गावर चालावंच लागेल, असं संत मोठय़ा कळकळीनं सांगतात. आता भक्ती म्हणजे काय? तर अहंभावाचं विस्मरण घडवून जी सोहंभावात तादात्म्य निर्माण करते ती! आणि या ‘भक्ती’ची क्षीण झलक आपणही आयुष्यात विविध टप्प्यांवर अनुभवतो. एखादा माणूस साधना करीत नसेलही, पण तो सद्विचारानं प्रेरित होऊन सेवाकार्य करीत असू शकतो. अशा समाजसेवेतही जर अहं विरघळला आणि ‘सोहं’ म्हणजे मी समाजाचा आहे त्यामुळे समाजसुखासमोर स्वसुख गौण आहे, ही भावना जागृत झाली, तर तीही ‘भक्ती’च आहे. धोका इतकाच की, ‘मी सेवा करतो म्हणून अनेकांचं भलं होतंय,’ हा भाव जर निर्माण झाला, तर तो अहंचा पाया अधिकच बळकट करतो! भगवंताच्या भक्तीतही हे धोक्याचं वळण येऊ शकतं. त्यातून साधनेचा अहंकार निर्माण होऊ शकतो. सिद्ध झाल्याचा भ्रम निर्माण होऊ शकतो. त्या वळणावर घसरून भल्याभल्यांचा कपाळमोक्ष झाला आहे. आणि त्यामुळेच खरी भक्ती कोणती, ती कशी साधावी, हे उमगलं पाहिजे. या भक्तीचा जो उलगडा संत एकनाथ महाराज यांनी केला आहे तो मुख्यत्वे ‘एकनाथी भागवता’च्या आधारे आपण जाणून घ्यायला खरा प्रारंभ करीत आहोत. आता भक्तिमार्ग वगरे शब्द आपल्याला माहीत असतात हो! पण तो मार्ग नेमका कोणता? त्या मार्गावरून चालायचं म्हणजे नेमकं काय, याबाबतच स्पष्ट कल्पना नसते. ती नसल्यानं भौतिकातील र्कम जशी कत्रेपणाचा अहंकार निर्माण करतात आणि बाधक होतात, तसंच साधना करणं, हे देखील ‘कर्म’च होतं आणि ती ‘मी करतो,’ हा कत्रेपणाचा भाव अहंकार निर्माण करतो आणि तोही बाधकच होतो. तेव्हा भौतिक र्कमही जशी कृष्णार्पण वृत्तीनं करायची आहेत, तशीच साधनादेखील कृष्णार्पण भावानंच करायला हवी! हा कृष्णार्पण भावही केवळ भक्तीनंच साधतो. भगवान कृष्ण स्वत: सांगतात, ‘‘मज अíपती हातवटी। अवघड वाटेल जगजेठी। ज्यासी आवडी माझी मोठी। त्याची दृष्टी मदर्पण॥६५॥ कृष्णीं निश्चळ ज्याचें मन। त्याचें कर्म तितुकें कृष्णार्पण। त्यासी न अíपतांही जाण। सहजें मदर्पण होतसे॥६६॥’’ (अध्याय १०). म्हणजे कृष्ण सांगत आहेत की, ‘कर्म मला अर्पण करणं प्रथम अवघड वाटेल, पण ज्याला माझी मोठी आवड त्याची दृष्टी जणू मला अर्पण झाली असते! ज्याचं मन माझ्या ठायी निश्चल झालं, त्याची सर्व र्कम मलाच अर्पण होत असतात. मग भले त्याला त्याची जाणीवही होत नसेना का!’ तर ही जी भगवंताची आवड आहे, त्याच्यावाचून दुसरं कोणतं दर्शनच न होणं आहे, त्याच्या ठायी चित्त जडणं आहे; तीच खरी भक्ती आहे आणि जो परम तत्त्वापासून कधीच विभक्त नाही तोच ही खरी भक्ती बिंबवू शकतो! -चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com