दान सत्पात्री असावं आणि त्याला ‘मी’चा स्पर्श नसावा. सत्पात्री- म्हणजे जो खरा गरजवंत आहे त्यालाच दान मिळावं आणि त्या दानकर्त्यांत दातृत्वाचा अहंकार नसावा. खरं पाहता, ‘दान’ ही काय स्वबळावर साधणारी गोष्ट आहे का? मी पैशाचं दान करू शकतो, कारण ते दान देऊनही माझ्या चरितार्थावर विपरीत परिणाम होणार नाही इतपत पैशाचा ओघ माझ्याकडे येत आहे, अशी स्थिती असते. हा पैशाचा ओघ येण्यासाठी जे प्रयत्न, जे परिश्रम आवश्यक असतात, ते करताना मी दिसतोच; पण ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी परिस्थितीची जी अनुकूलता असावी लागते, जे योग जुळून यावे लागतात, त्यात भगवत्कृपेचा भाग मोठा असतो. त्यामुळे मी दान करीत असलो तरी, माझ्यात दानाची क्षमता भगवंतच निर्माण करतो. दाता म्हणून मला तोच पात्र ठरवतो! तेव्हा, जे मला मिळालं आणि मिळवता आलं आहे, त्यातलं काही गरजवंताला देणं हेच दान आहे. मग ते पैशाचं असेल, धान्याचं असेल, कपडय़ांचं वा वस्तूचं असेल.. आणि दान दिल्यानं देण्याची क्षमता भगवंतच वाढवतो, हेच पृथ्वीच्या रूपकावरून अवधूत शिकवतो. त्या दानात ‘मी’पणा अर्थात अहंकार कणमात्रही डोकावता कामा नये. ईशावास्य उपनिषदातील पहिलाच श्लोक आहे तो असा : ‘‘ॐ ईशावास्यम् इदम् सर्वम् यत्किंञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्।।’’ म्हणजे, ‘या चराचरात जे जे काही साकार-निराकार, दृश्य-अदृश्य, स्थूल-सूक्ष्म आहे, ते ते सर्व एकाच ईश्वरानं व्याप्त आहे. म्हणून त्यागानं भोगा, आसक्ती सोडून अनासक्त भावानं भोगा, ईश्वराच्या स्मरणात भोग भोगा; कारण हे समस्त सुखभोग ज्याच्या सामर्थ्यांनं माझ्या आवाक्यात आले आहेत त्यासाठी आवश्यक ते धन आणि बळ त्या ईश्वरावाचून कुणाचं आहे? अर्थात कुणाचंच नाही. त्याच्या कृपेनंच मला ते लाभलं आहे.’ त्यागानं सुख भोगायचं आहे! याच्या दोन अर्थछटा आहेत. पहिली ही की, गरजवंताला मी काही तेव्हाच देऊ  शकेन, जेव्हा त्या वस्तूच्या संग्रहाच्या मोहाचा त्याग माझ्या अंत:करणातून घडेल! आई पंचपक्वान्न करो की झुणका-भाकर करो; ते स्वत:च सगळं खाऊन ती तृप्त नाही होत. प्रसंगी स्वत:ला कमी ठेवून किंवा काहीच न वगळून ती लेकरांना पोटभर खाऊ  घालते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती तृप्त होते! हे, ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथा’ आहे, त्यागानं भोगलं जाणारं सुख आहे. दात्याच्या अंत:करणात तसा आईसारखा वात्सल्यभाव पाहिजे! आई अहंभावानं त्याग करीत नाही, मुलांना ती आपलाच तुकडा मानत असते. तसं- जो स्वत:सकटच्या जगाला ‘ईशावास्यम् इदम् सर्वम्’ या रूपात पाहतो, तो आपल्या गरजा भागवतानाच यथाशक्ती इतरांच्या गरजेचाही संवेदनशीलतेनं विचार करतो, त्यात साह्य़ करतो. आपल्या दोन घासांतला अर्धा घास इतरांसाठी सोडतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दीड घासांत आपणही पूर्ण तृप्त झाल्याचं तो अनुभवतो! त्यागानं सुख भोगायचं, यातली दुसरी अर्थछटा फार सूक्ष्म आहे. ती खरा त्याग सांगते. हा त्याग आहे अहंकाराचा! ‘मी देत आहे’ या भावनेचा त्याग झाल्याशिवाय देऊ  शकल्याचा आनंद खरेपणानं भोगताच येत नाही. कारण त्या आनंदात आपल्याला निमित्त बनविणाऱ्या ईश्वरी कृपेचंच कृतज्ञ स्मरण आहे. त्या स्मरणातही एक विलक्षण आनंद, विलक्षण तृप्ती भरून असते.

– चैतन्य प्रेम