‘परोपकार’ या शब्दाचा साधकासाठीचा जो सूक्ष्मार्थ आहे त्याच्या दोन पातळ्या आहेत, असं गेल्या वेळी सांगितलं. यातली पहिली पातळी अशी की, साधकाची वृत्ती ही इतकी व्यापक होत जाते की त्याची प्रत्येक कृती ही सहज परोपकारी होत जाते. मुख्य म्हणजे त्यात ‘उपकारा’चा भाव नसतोच. अशा साधकाच्या सहवासात जो येतो, त्याच्या चित्तावरही शांततेचे आणि प्रसन्नतेचे संस्कार झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यातून तो माणूसही साधनापथाकडे वळतो. यासारखी खरी विलक्षण परसेवा नाही! आता दुसरी सूक्ष्म पातळी कोणती? तर, ती अगदी आपल्या मूळ धारणेलाच हात घालते. ‘परोपकारा’त ‘पर’ म्हणजे परका आला. म्हणजे शाब्दिक अर्थानं इतर माणसांनी भरलेलं जग आलं. पण खरंच जग आपल्याला परकं वाटतं का हो? तर नाही! जग जवळचं वाटतं, आपलं वाटतं, सवयीचं वाटतं! मग परकं काय वाटतं? तर, भगवंत परका वाटतो! सद्गुरूबोध परका वाटतो!! अहो, ज्या जगाला आपण सत्य मानतो, सुखाचा आधार मानतो, त्या जगाला मिथ्या आणि मायेचा आधार म्हणून घोषित करणारा सद्गुरूबोध प्रथम तरी आपल्या मनोधारणेला, मनोरचनेला परकाच भासणार ना? तरीही आपण सत्पुरुषाच्या दारी जातो, त्यामागचा खरा हेतू जगाची ओढ हाच असतो! या जगातल्या अडचणी संपाव्यात, भौतिकाची चिंता उरू नये, लोक आपल्याला अनुकूल व्हावेत, आपली भरभराट व्हावी.. हेच तर हेतू मनात असतात! त्यामुळे परिस्थितीचा स्वीकार करून भगवंताची भक्ती करायला सांगणारा बोध प्रथम मनाला, कानांना परकाच भासतो. पण ‘परक्या’ भासत असलेल्या त्या सत्पुरुषाच्या बोधाच्या आचरणाच्या दिशेनं खरा ‘परोपकार’ सुरू झाल्याशिवाय पहिलं पाऊलही उचललं जात नाही! मग लक्षात येतं की, हा परोपकार नाही, तर ‘आत्मोपकार’च आहे! अहो, आपल्याला हा आत्मासुद्धा परकाच तर भासत असतो की! आत्मा अमर आहे वगरे आपण ऐकतो; पण दिसत नसलेला जीव जितका आपला वाटतो, तसा आत्मा आपला वाटतो का हो? ‘जीव गेला तरी चालेल, आत्मरूपानं आपण आहोतच,’ हा भाव कधी असतो का? त्यामुळे आपण आत्मकल्याण वगरे म्हणतो, पण भौतिकातलं कल्याण हेच आपल्याला खरं कल्याण वाटत असतं. परंतु स्वतचं खरं आत्महित साधणं, हाच खरा परोपकार आणि आत्मोपकारही आहे. कारण त्यामुळे निरपेक्ष, निरिच्छ, नि:शंक भावात सद्गुरूकृपेनं स्थिर होत असलेल्या साधकाकडून खरं आत्महित आणि परहितही सहज नकळत साधलं जात असतं. तसंच जगात विखुरलेलं मन सद्गुरू चरणी केंद्रित होऊन ते चरण ज्या भक्तिपथावर आहेत, त्या पथावर त्यांच्याच कृपाछायेत वाटचालही सुरू होते. जीवनातला ‘विभक्ती प्रत्यय’ मावळतो आणि पदोपदी ‘भक्ती प्रत्यय’ येऊ लागतो. अशा साधकाची दशा काय होते? एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘उपकारुचि साकारला। कीं परोपकारू रूपा आला। तसा जन्मौनि उपकारी झाला। उपकारला सर्वासी॥३८८॥’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). जणू काय उपकार भावच देहाच्या आकारात प्रकटला, परोपकार भावच मनुष्यरूपात आला आणि या रीतीनं साधकाचा जन्म म्हणजे सर्वोपकारी ठरला आहे. परोपकाराचा हा पाठ पर्वताकडून अवधूत शिकला.

– चैतन्य प्रेम