पर्वताकडून योगी परोपकार शिकतो, असं अवधूत यदुराजाला सांगतो. तो म्हणतो, ‘‘जसे पर्वतीं निर्झर। तैसे उपकाराचे पाझर। सुकों नेणती निरंतर। कृतोपकार जग केलें।।३९०।। सांडोनि कृपणवृत्तीची संगती। उपकारी पर्वत एकांतीं। राहिलासे उपकारमूर्ती। धैर्यवृत्ति निर्धारें।।३९१।।’’ म्हणजे पर्वतातून जसे पाण्याचे झरे प्रवाहित होत असतात आणि श्रमलेल्या जीवांची तहान भागवून त्यांना तृप्त करीत असतात, त्याप्रमाणे योग्यांच्या अंत:करणातून प्रेमाचा पाझर अखंड वाहत असतो. प्रेम हे कधीच निष्क्रिय नसतं. अर्थात, कृतीशिवाय ते राहूच शकत नाही. त्यामुळे या प्रेमभावातून ज्या ज्या कृती घडतात, त्यांनी जगावर सहज उपकारच होत असतो. पर्वत म्हटला की शिखर आलंच. शिखर हे जगात असूनही जगापासून अलिप्त असणारी उंचीही दाखवतं. पर्वताच्या पायथ्याशी माणसाचं संकुचित जग आहे. ते मत्सर, हेवेदावे, लोभ आणि मोहामुळे स्वार्थी आणि कृपण झालं आहे. या जगापासून वर आलेला, वेगळी उंची गाठू पाहणारा योगी पर्वताकडून एकांतातही धैर्यवृत्तीच्या निर्धारानं उपकार-रतच राहतो! इथं धैर्य आणि निर्धार हे शब्द फार मोलाचे आहेत. जगातच, पण अलिप्त भावानं राहात असताना परहिताच्या कळकळीतून कृतिशील राहण्यासाठी धैर्य लागतं! यात आंतरिक एकांत आणि एकात्म स्थिती न मोडता लोकहित साधलं जात असतं. आता पर्वताबरोबरच ‘पृथ्वी’ या गुरूचाच दुसरा घटक असलेल्या वृक्षाकडून आपण कोणता बोध ग्रहण केला, हे अवधूत आता सांगत आहे. तो म्हणतो, ‘‘सर्वागे सर्वभावेंसी। सर्वकाळ सर्वदेशी। पराधीन होआवें सर्वासी। हें वृक्षापाशीं शिकलो।।३९३।। वृक्ष जेणें प्रतिपाळला। तो त्या आधीन झाला। का जो छेदावया रिघाला। त्याही झाला स्वाधीनु।।३९४।।’’ याचा अर्थ, वृक्ष हा सर्वासाठी सदैव सेवारत असला तरी तो सर्वागानं, सर्व भावनांशी, सर्वकाळ आणि सर्व स्थितीत पराधीनच असतो! ज्यानं तो जपला, जोपासला, त्याच्याही तो अधीन असतो आणि ज्यानं तो तोडला त्याच्याही तो अधीन असतो! म्हणजे फळानं लगडलेला वृक्ष ज्यानं तो लावला त्यालाही जशी गोड फळं देतो, तसंच ज्यानं तोडला त्यालाही सर्वस्व म्हणजे फळं, फुलं, लाकूड वगैरे देतोच. आता या ओव्या वाचून ‘पराधीनते’बद्दल मनात गोंधळच निर्माण होण्याची शक्यता आहे. वृक्षतोड रोखण्याची गरज तीव्र झाली असताना या रूपकानं अनेक जण अस्वस्थही होतील. परोपकाराची शिकवण ठीक आहे, पण पराधीनतेची शिकवण समर्थनीय नाही, असंही अनेकांना वाटेल. त्यामुळे या ओव्यांचा खरा रोख लक्षात घेतला पाहिजे. मुख्य म्हणजे पराधीन स्थितीतही निर्लिप्त राहून आपल्या स्वरूपाशी कसं प्रामाणिक राहता येतं, हे वृक्षाकडून योगी कसा शिकतो, हे अवधूत सांगत आहे! पण हे सांगणं तर सामान्यांसाठी आहे ना? मग आपण त्यातून काय शिकावं? तर, स्वीकार शिकावा! खरं पाहता, माणूस जन्मापासून पराधीनच तर आहे! तो कधी व्यक्तींच्या, तर कधी परिस्थितीच्या अधीन असतो. ही पराधीनता कधी स्वार्थ साधण्यासाठी स्वत:हून स्वीकारलेली असते, तर अनेकदा परिस्थितीमुळे स्वीकारावी लागलेली असते. स्वार्थासाठी पराधीन माणसाला त्या पराधीनतेचं वैषम्य वाटत नाही. उलट त्यात तो स्वत:चं मूल्य स्वत:च कमीदेखील करून घेत असतो. जी पराधीनता मनाविरुद्ध स्वीकारावी लागते, त्यातही तो लाचार होऊन स्वत:चं मूल्य स्वत:च कमी लेखत असतो!

– चैतन्य प्रेम