प्राणवायू अभेदवृत्तीनं सर्व जीवमात्रांत संचार करतो. या प्राणवायूच्या योगानं मनुष्याच्या शरीरात प्राण टिकून असतो. या प्राणाचे प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान असे पाच स्थान भेद आहेत. पण तरीही प्राण एकसमान आहे! अवधूत यदुराजाला सांगतो की, ‘‘प्राण अपान समान उदान। सर्व संधी वसे व्यान। इतुकी नामे स्थानें पावोनि जाण। न सांडी प्राण एकपणा॥४१९॥’’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). हे वायू पाच प्रकारचे भासत असले तरी प्राण जसा एक आहे तसा योगी जगात एकत्वानं वावरतो. बाह्य़ जगात अनेक भेद आहेत. काही निसर्गनिर्मित आहेत तर अनेक मानवनिर्मित आहेत. जे निसर्गनिर्मित आहेत त्यांच्यात सौंदर्य आणि सहजता आहे. म्हणजे साधी फुलं घ्या. त्यांच्या दृश्यरूपात आणि गंधरूपांत किती भेद आहेत. प्रत्येक फुलाचं रूप वेगळं, गंध वेगळा. पण त्यात एक नैसर्गिक सौंदर्य आहे. त्याउलट माणसानं जातपात, धर्म, वर्ण, रंग, आर्थिक पातळी अशा अनेक गोष्टींच्या आधारावर केलेले भेद किती विखारी पातळीपर्यंत घसरू शकतात, माणसाला हीन करू शकतात. पण जो खरा योगी आहे तो या भेदवर्धक जगातही एकत्वानंच वावरतो. जो त्याच्यासमोर येतो त्यात तो उच्च-नीच भेद करीतच नाही. जरी या वायूकडून योगी एकत्वभाव शिकला असला ना, तरी या वायूतही श्रेष्ठतेचा वाद होता बरं का! ‘महाभारता’त या पाचही वायूंमध्ये श्रेष्ठ कोण, या विषयी झालेला संवाद आहे. यातील प्रत्येक वायूनं आपणच श्रेष्ठ असल्याचा दावा केला आणि उरलेल्या चारही वायूंनी तो खोडून काढला. मग हे पाचही वायू ब्रह्मदेवाकडे गेले आणि आमच्यात श्रेष्ठ कोण, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर ब्रह्मदेव उदगारले, ‘तुम्ही सर्वच जण श्रेष्ठ आहात, आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहात, पण तुमच्यातला कुणीही एक सर्वात श्रेष्ठ नाही! तुम्ही एकमेकांना पूरक आहात आणि एकमेकांवर अवलंबून आहात!’ (सर्वे श्रेष्ठा न वा श्रेष्ठा: सर्वे चान्योन्यधर्मिण:। सर्वे स्वविषये श्रेष्ठा: सर्वे चान्योन्यधर्मिण:। -आश्वमेधिक पर्व) किती शिकण्यासारखं आहे या उत्तरात! आपण भेदमूलक वृत्तीनं जगात वावरतो आणि त्या भेदाच्या आधारावरच स्वत:ला श्रेष्ठ ठरवतो. प्रत्यक्षात मानव समाजात जो तो आपापल्या जागी श्रेष्ठच असला तरी कुणीही एक सर्वाहून श्रेष्ठ नाही! जो तो प्रत्येकावर अवलंबून आहे. स्वबळावर आर्थिक यश आणि भरभराट साधलेला एखादा उद्योजक श्रेष्ठ वाटतो, पण तो नवजात असताना त्याला सांभाळणारी दाई, त्याच्या शाळेतले शिक्षक, त्याच्या प्रवासात साह्य़भूत ठरलेले बस ते चारचाकी वाहनांचे चालक, ज्या अन्नावर त्याचा देह पोसला ते अन्नधान्य पिकवणारे शेतकरी, मजूर.. आपलं जीवन घडविण्यात आणि सुखकर करण्यात किती अनंत माणसांचा सहयोग आहे. मग माझ्या प्रगतीत किंवा मी जो कोणी बनलो आहे त्यात या प्रत्येकाचा वाटा नाही का? निश्चित आहे. त्यामुळेच समाजातला प्रत्येक घटक त्याच्या त्याच्या जागी श्रेष्ठ आहे, पण कुणीही एक सर्वश्रेष्ठ नाही! योगी याच वृत्तीनं समाजात वावरतो. प्रत्येकाशी समत्वानं व्यवहार करतो आणि आपल्या जगण्यातून या अंतर्बाह्य़ समत्वाचा संस्कारही समाजमानसावर करतो. आता हे जे पाच प्रकारचे वायू माणसाच्या देहात आहेत त्यांचा तपशील तसंच त्यांचं परस्परावलंबी आणि परस्परपूरक रूप जाणून घेऊ.

– चैतन्य प्रेम