अनंताचा शोध घेण्यास साह्य़भूत ठरतील अशा अनंत क्षमतांनी युक्त मनुष्य देह लाभूनही माणूस संकुचित गोष्टीतच अडकतो. नश्वराच्या प्राप्तीसाठी त्या क्षमता कामी आणतो आणि अतृप्तीनंच हे जग सोडतो! एकनाथ महाराज अशा आम्हाला कळकळीनं बजावून सांगतात की, ‘‘मनुष्यदेहीं जे भजननष्ट। ते होती गा स्थानभ्रष्ट। अधपातें भोगिती कष्ट। अतिउद्भट यातना ॥६२॥’’ (अध्याय ५). मनुष्य देह लाभूनही जर भगवंताचं खरं भजन साधलं नाही, तर अध:पात ठरलेलाच आणि त्या अध:पातानं मोठे कष्ट वाटय़ाला येणं अटळच. आता हे खरं भजन फार सूक्ष्म आहे बरं का! आता परमेश्वरानं माणसाला जसा देह दिला, तसंच मन दिलं, चित्त दिलं आणि बुद्धी दिली. या सर्वापेक्षा आणखी एक फार महत्त्वाची, पण मोठी धोकादायक गोष्टही दिली ती म्हणजे स्वातंत्र्य! कसलं स्वातंत्र्य दिलं? तर कृती करण्याचं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे मन दिलं, पण त्या मनानं चांगल्या गोष्टीचं मनन करावं की वाईट गोष्टीचं मनन करावं, हे स्वातंत्र्य माणसाला आहे. चित्त दिलं, पण या चित्तानं चांगल्या गोष्टीचं चिंतन करावं की वाईट गोष्टींचंच चिंतन करावं, हे स्वातंत्र्य माणसाला दिलं. बुद्धी दिली, पण या बुद्धीनं आत्मबोधात रमावं की भ्रममोहाचं पोषण करणाऱ्या देहबोधात रमावं, याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. अगदी त्याचप्रमाणे डोळे दिले, पण त्यांनी चांगलं ते पाहावं की वाईट ते पाहावं, कानांनी त्यांनी चांगलं ऐकावं की वाईट ऐकावं, मुखानं चांगलं बोलावं की वाईट बोलावं, हातांनी सत्कर्म करावीत की दुष्कर्म? करावीत, पायांनी चांगल्या जागी जावं की वाईट जागी जावं; या सगळ्याच्या निवडीचं स्वातंत्र्य माणसाला आहे बरं! देव अडवत नाही. पण जसं कर्म तसं फळ, हा नियम चुकत नाही! माणूस जन्मभर भजनच करीत असतो. भजन म्हणजे एखाद्या गोष्टीचं अंतकरणपूर्वक स्मरण आणि त्या गोष्टीसाठीचं समर्पण! आपण एकतर चांगल्या गोष्टींचं अंत:करणपूर्वक स्मरण करू शकतो किंवा वाईट गोष्टींचं! ज्याचं जसं भजन करू तसं उन्नती वा अधोगतीचं फळही प्राप्त करू! बरं आता चांगलं आणि वाईट म्हणजे तरी काय हो? हे चांगलं-वाईट सूक्ष्मातलं अधिक आहे. तुमच्या वृत्तीत ते खोलवर दडलं आहे. अखंड परम व्यापक शाश्वत तत्त्वाशी जे जे जोडतं ते ते सगळं चांगलं आणि खंडित संकुचित अशाश्वत तत्त्वाशी जे जे जोडतं ते ते सगळं वाईट आहे! इतकं ते सहज साधं आहे आणि म्हणूनच आपण जगासमोर ‘चांगलं’ वागत असू, पण आतून ‘वाईटा’कडेच ओढा असेल, तर त्या चांगल्या वागण्याला तृप्तीचा स्पर्श कधी होणारच नाही! ‘चांगलं’ वागत असूनही आपली आंतरिक स्थिती तृप्त, शांत, प्रसन्न राहणार नाही. तेव्हा शाश्वताचं स्मरण आणि त्याला समíपत होऊन जगणं, हेच मनुष्य देहातलं खरं सार्थक भजन आहे. अशाश्वताचंच स्मरण आणि अशाश्वतामागे वाहावत जाऊन जगणं, हेच मनुष्य देहातलं निर्थक भजन आहे! आणि तुम्ही जन्मभर कोणतं भजन करावं, याचं स्वातंत्र्य परमात्म्यानं दिलं आहे. पण ती जशी मोठी देणगी आहे, तशीच मोठी धोकादायक गोष्ट आहे, असं म्हटलं ते याचसाठी. अशाश्वताच्या ओढीचं, त्याच्या प्राप्तीसाठी धडपडण्याचं स्वातंत्र्यच नसतं, तर माणसाचे किती तरी प्रारब्धभोग टळले असते! पण तसं होत नाही. आपण अनवधानानं अनंत जन्म असेच जगत आलो, आता तरी अवधान टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी अंतर्मुख होऊन आपल्या जगण्याचं परीक्षण करीत गेलं पाहिजे.

– चैतन्य प्रेम