आपण अनवधानानं जगत आलो आणि म्हणून अनंत चुका करीत गेलो. शाश्वताचं अवधानच नसल्यानं चित्तात अशाश्वताचंच चिंतन, मनात अशाश्वताचंच मनन व बुद्धीचा अशाश्वताच्याच बाजूनं निवाडा; अशी आंतरिक घसरण सुरूच राहिली. त्यातून प्रारब्ध आणि त्यायोगे जन्म-मृत्यूचा खेळ तेवढा वाढत गेला. माझे सद्गुरू एकदा म्हणाले की, ‘‘चित्ताची जशी स्थिती असते तशी कृती घडते, तसं कर्म घडतं. जसं कर्म घडतं तसं प्रारब्ध बनतं आणि जसं प्रारब्ध तसे भोग वाटय़ाला येतात!’’ याचाच अर्थ, प्रारब्धभोग जर दुखदायक असतील, तर आपल्या हातून आधी र्कमही तशीच घडली असली पाहिजेत. चुकीच्या कर्मानीच दुखं वाटय़ाला येतात आणि जशी चित्ताची स्थिती तशी र्कम घडतात; हे पाहता, चित्ताच्या स्थितीतच सुधारणा आवश्यक आहे! ही सुधारणा नुसत्या ज्ञानबळानं साधणारी नाही. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे, ज्ञानानं जशी समज वाढू शकते, तसाच ती समज गाडून टाकणारा अहंकारही उत्पन्न होऊ शकतो! तो अहंकार भक्तीपासून विन्मुख करतो. ‘एकनाथी भागवता’च्या पाचव्या अध्यायात एकनाथ महाराज सांगतात, ‘‘यापरी जे पंडित। ज्ञानाभिमानें अतिउन्मत्त। तेणें अभिमानेंचि येथ। भजनीं निश्चित विमुख केले।।५४।।’’ स्वतला ज्ञाते मानणारे अतिउन्मत्त होऊन अभिमानानं फुलून जातात व भजनभावापासून विमुख होतात. अहो, साध्या साध्या माणसांना जे कळतं ते अहंकाराची पट्टी डोळ्यांवर बांधलेल्या ज्ञान्यांना कळत नाही! घरकामासाठी कुणी स्त्री मिळते का, याचा शोध माझ्या परिचयातील एक महिला घेत होती. तशी एक स्त्री मिळाली. वागा-बोलायला अगदी नीटस. पण आल्या आल्या तिनं सांगितलं की, ‘‘ताई, माझ्यावर एका घरातले पन्नास हजार रुपये चोरल्याचा आळ होता. तो खोटा असल्याचं नंतर सिद्ध झालं आणि मी निर्दोष सुटले. पण मी आधीच हे सांगते, कारण नंतर कुठून तरी कळल्यावर तुम्हाला वाईट वाटू नये वा संशय राहू नये. तेव्हा हे कळल्यावरही मला काम द्यायचं असेल, तर द्या!’’ ती कामाला लागली तेव्हा तिच्या साध्या साध्या बोलण्यातून अध्यात्मच जणू पाझरत असे. एकदा माझ्या परिचितांनी तिला विचारलं की, ‘‘तुमच्यावर चोरीचा खोटा आळ जिनं घेतला, तिचा तुम्हाला राग नाही का वाटत?’’ ही ‘अडाणी’ बाई म्हणाली, ‘‘माझं प्रारब्धच तसं असेल हो. ती निमित्त झाली. तिचा राग वाटून काय उपयोग? मी चोरी केली नाही, हे सिद्ध झालं हे काय कमी आहे?’’ हे जे सहज ज्ञान आहे, हा परिस्थितीचा जो सहज स्वीकार आहे, तो भल्याभल्यांना साधत नाही! अशी साधी माणसंच भक्तीच्या वाटेवर श्रद्धेनं चालू शकतात. ती भले परिस्थितीशी झुंजत दोन-चार पावलंच चालतील, पण शेकडो पावलं चालूनही ‘माझ्याच जीवनात हे दुखं का’ या प्रश्नाच्या खोडय़ात अडकलेल्या साधकापेक्षा ती चार पावलांची वाटचाल अधिक तृप्त करणारी असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी स्वबळावर लढत असलेला श्रीगोंदवलेकर महाराजांचा एक तरुण भक्त मला सहज म्हणाला, ‘‘परिस्थिती किती का वाईट असेना, मी नाम घ्यायचं सोडत नाही. फक्त महाराजांना एक प्रार्थना करतो की, महाराज परिस्थिती जरी सुधारली तरी ती नामानं सुधारली, असा भाव माझ्या मनात कधीच उत्पन्न होऊ देऊ नका! नाही तर नामाच्या खऱ्या अनुभवाला मी पारखा होईन आणि परिस्थितीच्या मोजपट्टीत नामाला जोखण्याचं महापाप करीत जगेन!’’ याला म्हणतात हो प्रार्थना! याला म्हणतात खरं मागणं!! अध्यात्म अध्यात्म म्हणतात ते यापेक्षा काय वेगळं असतं हो? – चैतन्य प्रेम