माणूस देहानं बरीवाईट र्कम करतो खरी, पण ती कृत्यं करण्यासाठी मनच देहाला नाचवतं! त्या बऱ्यावाईट कर्मानुसारची बरीवाईट फळं मग माणसाला भोगावी लागतात. ती फळंही देहच भोगत आहे, असं वाटतं. म्हणजे सुखात देह सुखभोग भोगताना दिसतो, तर दुखभोगात देहच हालअपेष्टा भोगताना दिसतो. प्रत्यक्षात मात्र त्या सुखाचा वा दुखाचा तीव्र अनुभव मनालाच भिडत असतो. समस्त इंद्रियं याच मनाच्या अधीन असल्यानं हे मनच या देहाचा खरा स्वामी असतं! त्यामुळे सर्वच सत्पुरुषांनी मनाला हाताशी धरून त्याला वळविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. हे मन जगात वावरतं आणि जगातल्या गोष्टींना चिकटतं. मात्र ज्या जगाच्या संयोगानं विषयप्रेम जागं होतं त्याच जगाकडे एकात्म दृष्टीनं पाहिलं तर पदोपदी परम तत्त्वाचं स्मरणही वाढू शकतं. कृष्ण-उद्धव संवादाच्या माध्यमातून ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या अध्यायात एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘इंद्रियें असोतु विषयांवरी। मन रिघों नेदी त्यांभीतरी।’’ म्हणजे इंद्रियं विषयात असली, तरी मन त्यात शिरू देऊ नकोस किंवा मनात विषयांना शिरकाव करू देऊ नकोस. आता हे आपल्याला अशक्य वाटतं. पक्वान्नं डोळ्यांनी पाहताच मनाला ती खावीशी वाटतात. आता डोळ्यांनी रसगुल्ला पाहिला, जिव्हेनं तो चाखला, पण मनात त्याची गोडीच नाही, असं कसं शक्य आहे? मग इथं इंद्रियं विषयात असू दे, पण मनात त्या विषयांना स्थान नको, हे म्हणण्यामागचा खरा रोख नीट लक्षात घेतला पाहिजे. विषयांची ओढ मनाला आहे आणि विषयप्राप्तीचं सुख आणि विषय अप्राप्तीचं दु:खही मनालाच आहे. एखादी हवीशी वस्तू पाहून डोळे तृप्त होत नाहीत किंवा न पाहिल्यानं अतृप्त राहात नाहीत. सुख-दुखाची जाणीव मनालाच आहे. बरं, आज जे ‘सुख’ इंद्रियांद्वारे भोगता येत आहे, ते कायमचं राहणारं नाही, ते ‘सुख’ भोगण्याची इंद्रियांची क्षमता कायम राहणारी नाही. मग जे ‘सुख’ मिळत आहे ते आसक्तीयुक्त स्मरणाच्या वेष्टनात जपून ठेवण्याची काय गरज? त्या सुखाशेत गुंतून राहण्याची काय गरज? त्या सुखप्राप्तीचे जे जे भौतिकातले आधार आहेत त्यांच्यासमोर लाचार होण्याची काय गरज? यापुढे जाऊन परमात्मा सांगतो की ज्या जगाच्या संपर्कानं आणि सहवासानं विषयमोह बळावतो त्याच जगात व्याप्त असलेल्या मला पाहा! श्रीकृष्णाचा हा बोध मांडताना एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘माझें स्वरूप सर्वगत। मनाबाहेरी आणि आंत। जेथ जेथ जाईल चित्त। तेथ तेथ तें असे॥९३॥’’ माझं स्वरूप सर्वगत आहे, सर्वत्र आहे. मनाच्या आतही मीच आहे आणि मनाच्या बाहेरही मीच आहे. जिथं जिथं मन पोहोचू शकतं तिथं तिथं मी आहे. ‘‘मजवेगळें जावयासी। ठावो नाहीं पैं चित्तासी। स्वदेशीं हो परदेशीं। अहíनशीं मज आंतु॥९४॥’’ माझ्याशिवाय चित्तालाही जायला कुठे जागाच नाही. ते स्वदेशी असो वा परदेशी, रात्रंदिवस ते माझ्या आतच असतं. ‘स्व’देशी म्हणजे ऐक्यदशेत असो की ‘पर’देशी म्हणजे जगात विखुरलं असो, अनेकदशी असो. खरं तर ज्ञानाचा दिवस असो वा अज्ञानाची रात्र असो; ते चित्त सदोदित माझ्यातच असतं. मग ज्या जगात परम तत्त्वापासून फारकत आणि विषयांची संगत जडते त्याच जगातील त्याच वस्तू परम तत्त्वाचा बोध बिंबवू शकतात. मग त्याच जगात या परमबोधाचं मनन आणि चिंतन घडू शकतं. हे कसं साधतं हेच आता कृष्ण- उद्धव संवादाच्या निमित्तानं एकनाथ महाराज उलगडून दाखवणार आहेत.

– चैतन्य प्रेम