09 April 2020

News Flash

२९५. दातृत्वाचा कळस!

ज्याला जागृतीची तळमळ आहे त्याला या चराचरातली प्रत्येक गोष्ट जागं करील!

ज्याला जागृतीची तळमळ आहे त्याला या चराचरातली प्रत्येक गोष्ट जागं करील! ज्या पृथ्वीवर अवधूतासारखा योगी अवतरला, वावरला त्याच पृथ्वीवर आपणही जन्मलो आहोत, आपणही वावरत आहोत. या धरणीच्याच आधारावर आपलं जीवन टिकून आहे. या धरतीवर वाहात असलेल्या नद्या, पिकत असलेलं धान्य, फळं, लाकडापासून ते धातूपर्यंतच्या वस्तू, अवजारं, शस्त्रं आणि वाहनं या सगळ्याचा मूळ स्रोत ही धरतीच आहे. पण ज्या धरतीच्या आधाराशिवाय आपल्या जीवनाचा डोलारा क्षणभर टिकूही शकत नाही, त्या धरतीकडे अवधूतानं ज्या दृष्टीनं पाहिलं, तसं आपण कधी पाहिलं का? या धरतीकडून, तिच्यावरील पर्वत आणि वृक्षांकडून अवधूत जे शिकला ते आपण कधीतरी शिकलो का? नव्हे, या गोष्टीही काही शिकवत असतात, हे तरी आपल्याला कधी जाणवलं का? आज पर्यावरण वाचवायची हाक माणूस देतोय, पण तीसुद्धा त्याच्याच रक्षणासाठी आहे! पण कित्येक मलांचा वणवा पसरतो आणि झाडंच्या झाडं भस्मसात होतात, तरी पृथ्वी माणसासारखी हतबल होते का? आगीत झाडं भस्मसात होणंसुद्धा हा निसर्ग स्वीकारतो आणि त्याच वेळी भूमीतून नवीन अंकुरही फुटून जीवनाचा प्रवाह अबाधित राखतो. ही जीवनऊर्जा आमच्या जीवनात आम्ही उतरवतो का? तर नाही! अवधूतानं मात्र अनंत जीवनाविष्कारांना अव्याहत वाव देत असलेल्या पृथ्वीला गुरू केलं आणि जगण्यासाठीचे काही मंत्र या वसुंधरेकडून तो शिकला! या पृथ्वीवरील भूमी, पर्वत आणि वृक्षांकडून शांतीसह काही फार मोठे सद्गुण त्यानं अंगी बाणवले. तो म्हणतो, ‘‘पृथ्वीपासोनि झाले। ते पर्वतही म्यां गुरू केले। त्यांपासोनि जें जें शिकलें। तेंही वहिलें परियेसी॥३७८॥’’ (एकनाथी भागवत, अध्याय सातवा). अवधूत म्हणत आहे, ‘हे यदुराजा, या धरतीचंच रूप असे जे पर्वत त्यांच्याकडूनही मी जे काही भरभरून शिकलो ते आता ऐक!’ काय शिकला अवधूत? तर, ‘‘रत्न-निकर समस्त। पर्वत परार्थचि वाहत। तृण जळ नाना अर्थ। तेही परार्थ धरितसे॥३७९॥’’ म्हणजे, या पर्वतावरील खाणींत रत्नंही सापडतात. पण ती तो लपवून ठेवत नाही. त्यांची आसक्ती धरीत नाही. रत्नादिकांचा साठा इतरांसाठीच असतो जणू! याच पर्वतावर गायीगुरांना, शेळीमेंढय़ांना चरण्यासाठी गवत, चारा वाढवतो. माणसासाठी फळांनी लगडलेले वृक्ष निर्माण करतो. मेघांना अडवून पावसाचं आणि त्यायोगे जीवनाचं चक्र नियमित करण्यात हातभार लावतो. अवधूत म्हणतो, ‘‘कोणासी नेमी ना निवारी। उबगोनि न घाली बाहेरी। याचकाचे इच्छेवरी। परोपकारीं देतसे॥३८०॥’’ म्हणजे पर्वत ना कुणाला स्वत:हून जवळ करतो ना कुणाला धुडकावतो. कोणाला उबग येऊन तो परत पाठवत नाही. जो ज्या इच्छेनं येतो त्याची इच्छा पूर्ण होते. ज्याला फळं हवीत त्याला फळं, ज्याला फुलं हवीत त्याला फुलं, ज्याला लाकूडफाटा हवाय त्याला लाकूडफाटा, ज्याला गवत-चारा हवाय त्याला गवत-चारा आणि ज्याला खाणीतली रत्नं हवी आहेत त्याला ती रत्नंही तो देतो! पर्वताकडून दातृत्वाचा हा गुण अवधूत शिकला. पण हे दातृत्वही अगदी सहज आहे बरं का! त्यात दातृत्वाचा म्हणजे आपण काय ते देत आहोत, असा अभिनिवेश नाही! पर्वतच गायब केले तर मोकळ्या झालेल्या जमिनीची दामदुप्पट ‘किंमत’ मिळवता येईल, या राक्षसी लालसेनं माणूस पर्वतच्या पर्वतसुद्धा नष्ट करीत असला तरी या पर्वताच्या दातृत्वात अखेरच्या क्षणापर्यंत तसूभरही फरक पडत नाही!

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 12:02 am

Web Title: article ektmayog akp 94 8
Next Stories
1 २९४. शांती-भस्म
2 २९३. शांतिब्रह्म
3 २९२. प्रथम गुरू
Just Now!
X