पृथ्वीवरील धरणी, पर्वत आणि वृक्षांकडून अवधूत शांती आणि दातृत्व शिकला. पर्वताच्या दातृत्वाच्या निमित्तानं आणखी एका विलक्षण सत्याचीही अवधूताला अनुभूती आली. ते कोणतं? तर, जेव्हा नि:स्वार्थीपणे, कोणताही हेतू मनात न बाळगता तुम्ही दान करता तेव्हा तुमचे देणारे हात कधीच रिकामे होत नाहीत! अवधूत म्हणतो, ‘‘ग्रीष्माअंतीं सर्व सरे। परी तो देतां मागें न सरे। सवेंचि भगवंतें कीजे पुरें। वर्षोनि जळघरें समृद्धी॥३८१॥ जंव जंव उल्हासें दाता देतु। तंव तंव पुरवी जगन्नाथु। विकल्प न धरितां मनाआंतु। देता अच्युतु अनिवार॥३८२॥’’ जेव्हा ग्रीष्म ऋ तु संपतो तेव्हा या पर्वतावरील तृण आणि धान्यं सर्व काही संपून जातं, पण तरी जे आहे त्याचं दान पर्वत करीतच असतो. आणि म्हणूनच परमेश्वर तात्काळ कृपावर्षांव करतो! पाऊस पडू लागतो आणि दाता पर्वत पुन्हा हिरवाईनं नटतो! अवधूत सांगत आहे की, दाता जेव्हा उल्हासानं देऊ लागतो ना, तेव्हा तो जगन्नाथच त्याला पुरवठा करू लागतो! एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा की, दातृत्वाचा अहंकार येता कामा नये. आता दान दिलंय, तर मला काही कमी पडणार नाही ना, असा विकल्प येता कामा नये. असा विकल्प उरला नाही, तर ज्याला कोणत्याही गुणाचा, वृत्तीचा, आवेगाचा स्पर्शही कधी होत नाही असा परमात्मा अनिवारपणे या दात्याला पुरवठा करू लागतो! आता ‘विकल्प’ हा शब्दही फार खोल आहे. दान देण्यामागे किंचितही वासनात्मक ओढ असणं वा दानाच्या बदल्यात काही तरी मिळवण्याची अत्यंत सूक्ष्म इच्छा असणं, हासुद्धा विकल्पच आहे! कारण त्या दानात मग, त्या इच्छेची पूर्ती होईल की नाही, या साशंकतेचं मिश्रण आहे. पण जो निरीच्छपणे गरजवंताला यथाशक्ती मदत करतो त्याच्या गरजेची पूर्ती परमात्माच करू लागतो. कारण खरा दाता केवळ एक परमात्माच आहे. अवधूत म्हणतो, ‘‘सत्य अच्युत दाता। हें न मनेचि तत्त्वतां। यालागीं दरिद्रता। विकल्पवंता लागली॥३८३॥’’ भगवंत हाच खरा दाता आहे, हे संशयग्रस्त, विकल्पग्रस्त लोकांना पटत नाही. त्यामुळे एक तर ते मनाच्या ओढीनुसार अपात्री दानाची उधळण करतात किंवा कूपमंडूक वृत्तीनं एक छदामही दान म्हणून देत नाहीत. अशा दोघांच्या वाटय़ाला मग दारिद्रय़ाचं दु:ख येतं. आता याचा थोडा व्यावहारिक पातळीवरही विचार करू. माणूस दान करतो, ते कशाचं असतं? तर ते पशाचं असतं, वस्तूचं असतं, अन्नाचं असतं. आता हे अन्नधान्य काय त्या माणसानं केवळ स्वबळावर उत्पन्न केलं का? तर, भगवत्कृपेनं पाऊस पडला म्हणून कष्टाला निसर्गाची जोड मिळून धान्य पिकवता आलं. मग खरा दाता भगवंतच नाही का? तहानलेल्याला मी पाणी दिलं, पण पाणी काय मी उत्पन्न केलं का? एखाद्याला मी पशाची मदत केली, पण तो पसा मिळवण्यासाठी ज्या देहानं परिश्रम केले तो धडधाकट देह मला भगवंताच्या कृपेनंच मिळाला ना? मला आणि घरातल्या कुणाला मोठं आजारपण आलं नाही, मोठं संकट आलं नाही म्हणून माझ्याकडे पसा वाचला ना? पसा आहे म्हणून तो देता येतोय, तो आजवर आटला नाही यामागेही ईश्वरी कृपाच आहे ना? तेव्हा देताना जरी मी दिसत असलो, तरी ते देवविणारा आणि देण्याची पात्रता माझ्यात निर्माण करणारा आणि ती टिकवणारा खरा दाता भगवंतच आहे, मी निमित्तमात्र आहे, हे सत्य प्रकाशमान होईल. अशा निमित्त ठरलेल्या दात्याच्या दातृत्वात मग तो खरा दाता कधीच खंड पडू देत नाही. दोनच गोष्टी फक्त पाळल्या पाहिजेत. दान सत्पात्रीच असावं आणि त्याला ‘मी’चा स्पर्श नसावा.

– चैतन्य प्रेम