09 April 2020

News Flash

एकात्मयोग : २९१. शांतिपाठ

हिला प्रकार म्हणजे जे हवंसं वाटतं ते न मिळणं आणि दुसरा प्रकार म्हणजे जे नकोसं वाटतं ते मिळणं!

अवधूत आपल्या चोवीस गुरूंची नावं सांगत आहे. त्यातला पहिला गुरू आहे तो पृथ्वी. अवधूत सांगतो, ‘‘परमार्थी मुख्य शांती। साधकांसी पाहिजे निश्चितीं। यालागीं प्रथम गुरु क्षिती। निजशांतीलागूनी ॥३६०॥’’ म्हणजे, परमार्थात शांती ही मुख्य आहे. याकरता साधकांच्या अंगी ती निश्चित असली पाहिजे. आणि म्हणून मी त्या शांतीच्या प्राप्तीकरता पृथ्वीला गुरू केलं. माणसाचं जीवन कसं आहे? ते अशांतीनं भरलं आहे. अशांती का आहे? तर मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, तर माणसाच्या मनात अशांती उत्पन्न होते. मनासारखं न घडण्याचे दोन प्रकार श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितले आहेत. पहिला प्रकार म्हणजे जे हवंसं वाटतं ते न मिळणं आणि दुसरा प्रकार म्हणजे जे नकोसं वाटतं ते मिळणं! आता या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत! म्हणजे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोच आणि जे नको आहे ते टाळण्यासाठीही प्रयत्न करतोच. ते प्रयत्न करूनही जे वाटय़ाला येतं ते स्वीकारावंच लागतं. ते स्वीकारणं जड जातं आणि त्यामुळे अशांती उत्पन्न होते. मन अशांतीनं व्यापून जातं. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संत लक्षणांत शांती हे पहिलं लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा-शांतिरूप आहे. त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंत:स्थिती हीच कारण आहे.’’ (प्रवचने, पृ. २२५). भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत आणि त्यात पहिलीच पायरी श्रवण आहे ही फार रहस्यमय गोष्ट आहे. श्रवणच का प्रथम सांगितलंय हो? कारण आपल्याला कुणाचं ऐकूनच घ्यायची सवय नाही! आपल्या मनाचंच तेवढं आपण ऐकतो. तेव्हा ‘मी’चा संपूर्ण निरास करण्यासाठीच्या अध्यात्माच्या वाटेनं जायचं आहे ना? मग आधी सत्पुरुषाचं ऐका! नुसतं ऐका नव्हे, भक्तीपूर्वक, प्रेमपूर्वक ऐकायचं आहे. तेव्हा भक्तीत जशी श्रवणभक्ती प्रथम तसं संत लक्षणांत शांती प्रथम आहे! त्यांची शांती ही बाहेरच्या कोलाहलानं ढळत नाही. उलट बाहेरच्या कोलाहालानं गजबजलेल्या जगात असा संत वावरतो ना, तेव्हा त्याच्या निज म्हणजे आत्मिक शांतीचा प्रभाव पडल्याशिवाय राहात नाही. आता कुणी म्हणेल की, काही वेळा काही सत्पुरुष क्रोधाविष्ट होतात, उग्र आणि आक्रमक रूप धारण करतात. मग हे विसंगत किंवा विपरीत नाही का? तर याचं उत्तर नीट जाणून घेतलं पाहिजे. एखादा मारेकरी तुमच्यावर वार करतो तसाच एखादा डॉक्टरही, अंगात विष पसरवू शकेल असा रुग्णाच्या शरीराचा भाग काढून टाकतो. दोघंही शस्त्रच हाती घेतात, पण दोघांचे हेतू पूर्णत: वेगळे असतात. एकाला स्वार्थलालसेपुढे तुमच्या जिवाचीही पर्वा नसते, तर दुसरा केवळ तुमच्या हिताची काळजी वाहात असतो. त्याचप्रमाणे सत्पुरुष उग्र रूप धारण करतात त्यामागचं कारण त्यांचा कुठलासा स्वार्थ पुरा केला जात नाहीये, हे नसतं. त्यांचा काही स्वार्थच नसतो. त्यांना स्वतच्या सुख-दुखाची, मान-अपमानाची, निंदा-स्तुतीची यित्कचितही पर्वा नसते. अशा कोणत्या कारणानं ते रागावत नाहीत. पण वारंवार समजावूनही जीव मोहासक्ती सोडत नसेल तरच ते उग्र रूप धारण करतात. त्यांच्या क्रोधामुळे आपला अहंकार दुखावत असेल आणि त्यामुळे आपण दुरावत असू, तर अजून बरीच वाटचाल करायची आहे, हे लक्षात घ्यावं. तेव्हा सत्पुरुषाकडून शिकायची, स्वीकारायची आणि अंगी भिनवायची जर कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे शांती! बाहेर कोलाहल असणारच, पण अंत:करणात कोलाहल नको, हे सत्पुरुष बिंबवतो.

– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 12:08 am

Web Title: article ektmayog chintran dhara akp 94
Next Stories
1 २९०. सर्वागाचे कान
2 २८९. जीवन-बोध
3 २८८. गुण आणि दोष
Just Now!
X