संसाराच्या भौतिक सुखातून मनानं निवृत्त होण्यातच कष्ट आहेत. त्यापेक्षा माणसानं कर्मरत राहावं. त्या कर्मबळाच्या जोरावर सुख उपभोगावं. कर्मप्रवृत्तीला विरोध करणारे आध्यात्मिक विचार सोडून द्यावेत, असा सल्ला स्वमताभिमानी माणसं देत असतात. ज्या संसाराशिवाय, भौतिक जगाशिवाय सुख मिळण्याची सुतराम शक्यता नाही, त्या संसाराला मायिक ठरविणारे मूर्खच आहेत. (संसार म्हणती मायिक। ते जाणावे केवळ मूर्ख। संसारावेगळें सुख। नाहीं देख जीवासी॥४१४॥ अध्याय १०). उलट खरं सुख मनुष्य जन्मातच उपभोगता येतं त्यामुळे देवदेखील मनुष्यदेहाचीच कामना करतात, अशा मनुष्यदेहाची वेदान्ती विटंबना करतात, हे सयुक्तिक तरी आहे का? (मनुष्याधिकारें सुखप्राप्ति। यालागीं देव मनुष्यत्व वांछिती। वेदान्ती मनुष्यत्व निंदिती। केवीं ते युक्ती मानावी॥४१५॥). ही सर्व मते उद्धवासमोर ठेवल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी या मतांमधला फोलपणा उलगडून दाखवला. प्रभु म्हणाले, ‘‘उद्धवा निवृत्तीमध्ये कष्ट आहेत, असं हे म्हणतात, मग प्रवृत्तीतही कष्ट नाहीत काय? अरे, जन्माआधीपासूनच मातेच्या गर्भात कोंडल्यापासूनच जीवाचे कष्ट सुरू होतात! पण गर्भात दुख सोसलं म्हणून जन्मापासून तरी केवळ सुखच सुख मिळेल, याचीही काही शाश्वती नाही! अरे, एका जन्मानं जन्मसाखळी तुटत नाही की एका मृत्यूनं मरणसाखळी तुटत नाही. कोटी-कोटी जन्मफेरे घेत जीवाला दुखातून सुखासाठी धडपडत काळमिठीत जगावं लागतं!(एके जन्में जन्म न सरे। एकें मरणें मरण नोसरे। कोटि कोटि जन्मांचे फेरे। काळ योनिद्वारें करवितु॥४३६॥) बरं हा जन्म आणि मृत्यूमधला जो कालावधी आहे, त्यातही दुखबाधा सुटत नाही. (जन्ममरणांमाजिले संधीं। आणिकही थोर दुख बाधी।). कर्मवादी कितीही म्हणोत की जीव स्वतंत्र आहे, पण त्याची परतंत्रता पावलोपावली उघडी पडत असते. (कर्मवादियांच्या मतां। जीवु स्वतंत्र कर्मकर्ता। म्हणती ते मिथ्या वार्ता। परतंत्रता प्रत्यक्ष॥४४१॥). जीव जर स्वतंत्र असता, तर त्यानं केवळ सुखाचीच निवड केली असती. दु:खभोग झिडकारले असते. पण नाही! ते त्याच्या हातात नाही. ज्या कर्माद्वारे पाप उत्पन्न होतं आणि त्या पापाचं फळ म्हणून दुख भोगावं लागतं, ती र्कम त्याला सोडता येत नाहीत. जीव बिचारा सदा दीन आहे. कर्म करून तो कर्माधीन राहतो, पण त्या कर्माचं फळ काय मिळावं, हेदेखील त्याच्या हाती नाही. जे फळ मिळतं ते भोगावंच लागतं आणि ते फळ देणारा भिन्न असतो. (जीव बापुडें सदा दीन। कर्मे करुनि कर्माधीन। कर्मफळदाता तो भिन्न। सुखदुखें जाण तो भोगवी॥४४३॥). हा कर्मफळ देणारा ईश्वरच आहे. त्यामुळे त्याची सत्ता श्रेष्ठ आहे. जीव केवळ सुख-दुखाचा भोक्ता आहे, त्याला स्वातंत्र्य नाही. (यालागीं ईश्वराची सत्ता। तो कर्मफळाचा दाता। जीवु सुखदुखांचा भोक्ता। स्वतंत्रता त्या नाहीं॥४४४॥).’’ आता, माणूस कर्म तेवढं करू शकतो, पण त्याचं फळ ईश्वरच देतो, हे म्हणताना, त्या कर्माचं जे योग्य फळ असेल तेच ईश्वर देतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. माणसाला मात्र गरकर्म करूनही, पापकर्म करूनही सुखच मिळावं, अशी ओढ असते. तेव्हा जसं कर्म तसं अचूक फळ, पापकर्माच्या बदल्यात दु:खभोग आणि पुण्यकर्माच्या बदल्यात सुखभोग, या नियमाचं अचूक पालन केवळ ईश्वरी सत्तेमुळेच होतं, हेच भगवंताला सांगायचं आहे.

– चैतन्य प्रेम