संत प्रपंचावर टीका करतात; पण ती टीका प्रपंचातील आपल्या मोहासक्तीवर असते, कर्तव्यपालनावर नसते. ते ‘प्रपंच करावा नेटका’ असं सांगतात, पण ‘नेटका’ म्हणजे आवश्यक तितकाच, हे लक्षात न घेता आपण तो अहोरात्र करीतच राहतो. संतांचा कर्तव्याला विरोध नाही कारण प्रपंचातील आप्तस्वकीयांबाबतच्या कर्तव्याचं मूळ हे प्रारब्धभोगातच आहे. सनातन तत्त्वज्ञानानुसार, प्रारब्ध म्हणजे देव-घेवीचा उरलेला व्यवहार आहे. म्हणजेच ज्यांना मी गेल्या जन्मापर्यंत दुख दिलं आहे ते मला दुखभोग देणार आहेत आणि ज्यांना मी गेल्या जन्मापर्यंत सुख   दिलं आहे ते मला सुखभोग देणार आहेत. हे दोन्ही भोग स्वीकारताना कर्तव्यप्रधानता आणि समवृत्ती बाळगली तर नवं प्रारब्ध निर्माण होणार नाही. कर्तव्यप्रधानता म्हणजे काय? तर, इतर माझ्याशी कसाही व्यवहार करोत, मला माझं मन शांत राखता आलं पाहिजे आणि माझ्या जीवनात माझ्या वाटय़ाला आलेल्या माणसांविषयी माझी जी जी कर्तव्यं आहेत ती ती पार पाडत गेली पाहिजेत, या धारणेनुसारचं आचरण म्हणजे कर्तव्यप्रधानता. समवृत्ती म्हणजे अनुकूलतेनं हुरळून न जाणं आणि प्रतिकूलतेनं खचून न जाणं! ही जीवनसाधनाच आहे. कारण मोहापायी कर्तव्याची सीमारेषा आपण अनेकदा ओलांडतो आणि भावनिक ओढीतून अनेकदा इतरांसाठी अनावश्यक कृतींमध्येही गुरफटून जातो. त्यातून वेळ आणि मानसिक शक्तीही वाया जात असते. त्यामुळे प्रपंचावरील टीकेचा रोख हा मोहासक्तीवर आहे, कर्तव्यावर नव्हे. त्याचबरोबर प्रारब्धाला सामोरं जाताना समवृत्तीचा अभ्यासही आवश्यक आहे. तो नसेल, तर मन अधिकच अशांत होऊन हातून चुकीची कृतीही घडण्याची शक्यता असते. जगताना    अनेक माणसांशी आपला संबंध येतो आणि आधीच म्हटल्याप्रमाणे काही जणांशी आपला व्यवहार हा सुखकारक, तर काहींशी दुखकारक असतो. त्यात भर म्हणून परस्परांतील कल्पना, विचारही एकमेकांच्या विरुद्ध असू शकतात. त्यामुळे प्रपंचातील आपल्या संबंधांमध्ये मोठी भावनिक गुंतागुंत असते. त्यात भर न घालण्यासाठी कर्तव्यावर भर देत आपण इतरांच्या वर्तनाचा स्वतवर परिणाम होऊ नये, असा प्रयत्न केला पाहिजे. इतरांच्या वर्तनापेक्षाही इतरांच्या उक्तीचा म्हणजेच बोलण्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. कुणी स्तुती केली तर आपण आनंदित होतो आणि निंदा केली, तर दुखी              होतो. पण अशा वेळी स्तुतीनं हुरळून न जाण्याचा आणि निंदेनं खचून न जाण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. पण या अभ्यासात मोठं आव्हान असतं ते मायेचं! प्रत्यक्षात नसलेल्या, पण आभासित होत पदोपदी आपल्याला नाचवत असलेल्या या मायेची पकड मोठी चिवट आहे.   ही माया प्रत्यक्षात कशी अस्तित्वहीन आहे   आणि त्यामुळेच या मायेचं निरसन करण्याचे उपायही किती निर्थक आहेत, हे सांगताना अंतरिक्ष मोठं मार्मिक रूपक योजतो. तो म्हणतो,    ‘‘जेवीं मृगजळीं मिथ्या मासे। तेवीं ब्रह्मीं प्रपंचु नसे। तो निरसावया कैसें साधनपिसे पिशाचा॥६४॥’’ अहो, मुळात मृगजळ हाच आभास असताना त्यातले मासेही खोटेच ठरणार ना? त्याचप्रमाणे परब्रह्मात प्रपंचच नाही, तर त्याच्या मायिक बंधनातून सुटण्यासाठी साधनेचं वेडही निर्थकच नाही का?

– चैतन्य प्रेम