03 June 2020

News Flash

अभिनव यज्ञ!

अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो ‘स्व-स्थ’ होण्यासाठी आहे. अर्थात, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्यात स्थित होणं, हे साधनेचं ध्येय आहे.

चैतन्य प्रेम

अध्यात्माचा जो अभ्यास आहे तो ‘स्व-स्थ’ होण्यासाठी आहे. अर्थात, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्यात स्थित होणं, हे साधनेचं ध्येय आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे? तर निर्लिप्त, निर्भेळ, निरावलंबी आनंद! मूळ स्वरूप तसं असूनही ‘मी’ आणि ‘माझे’च्या आवरणालाच सर्वस्व मानून जगण्याची सवय अनंत जन्मांपासून रुजल्यानं माझं जगणं सुख-दु:खमिश्रित झालं आहे. सुखासाठी परावलंबी झालं आहे. सुखप्राप्तीसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती असल्यानं अनेकदा इतरांच्या दु:खालाही कारणीभूत ठरत आहे. अर्थात, सुख मिळवताना इतरांना त्रास झाला तरी मला त्याचं दु:ख होत नाही. या वृत्तीमध्ये आत्माभ्यासानं बदल होत जातो, खरी स्वस्थता येते. मग हा आत्माभ्यास किंवा हे अध्यात्म एक प्रकारे समाजाचंच हित साधत नाही का? पण तरीही काही संत-सत्पुरुषांनीही लोकसेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे प्रयत्न केले. साधनेला अशा सेवाकर्माची जोड दिली. त्यापैकी एक ठळक नाव म्हणजे तुकडोजी महाराज! आजच्या अनारोग्याच्या वैश्विक संकटामुळे जो-तो ‘स्थानबद्ध’ झाला आहे. हे संकट दूर होईल तेव्हा समाजजीवनात फार मोठे आर्थिक बदल घडतील, असं मत मांडलं जात आहे. अशा वेळी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा तुकडोजी महाराजांनी मांडलेला विचार अनुसरावा लागणार आहे. १९५६ च्या सुमारास तुकडोजी महाराजांनी एक अभिनव यज्ञ सुरू केला, तो म्हणजे- ‘समयदान यज्ञ’! या यज्ञाची कल्पना मांडताना ते म्हणाले की, ‘‘सोन्या-चांदीहून आज वेळ मोलाचा आहे. त्यामुळे आज मी दान मागायला आलो आहे ते तुमच्या एका तासाच्या वेळेचे!’’ या भाषणात तुकडोजी महाराजांनी समर्थ रामदासांच्या ओव्यांचा दाखला दिला. समर्थही म्हणत की, ‘‘जे जे आपणासी ठावे। ते ते हळूहळू शिकवावे। शहाणे करूनी सोडावे। सकळ जन।।’’ तेव्हा इतरांना स्वत:च्या पायावर समर्थपणे उभं राहता यावं, यासाठी आपल्या थोडय़ा वेळेचा आणि क्षमतांचा विनियोग केला पाहिजे. हा एक तास द्यायचा म्हणजे काय करायचं? तुकडोजी महाराज म्हणाले की, ‘‘दिवसाच्या चोवीस तासांपैकी एक तास आपल्या बांधवांसाठी द्या. जे आपल्यापाशी आहे ते दुसऱ्याला शिकवा. कोणी व्यायाम शिकवावा, कोणी उद्योग शिकवावा, कोणी कला शिकवावी, कोणी आरोग्याची काळजी शिकवावी, कुणाला गाणं शिकवावं, कुणाला अक्षरओळख शिकवावी!’’ हा ‘यज्ञ’ सफल झाला तर प्रत्येक माणूस वर्षांचे किमान तीनशे तास देशासाठी देईल. यामुळे समाजातील अज्ञान, बेरोजगारी कमी व्हायला मदत होईल. समाज अधिक समर्थ होईल, हा तुकडोजी महाराजांचा हेतू होता. खरंच या ‘यज्ञा’साठी कुठली संस्था काढायला नको, कुठले मंत्र पाठ करायला नकोत, हवनसामग्री जमा करायला नको. फक्त आपला दिवसभरातला थोडा वेळ द्यायचा आहे. त्यासाठी कुठे जायला नको की शोधाशोध करायला नको. नुसतं आपल्या अवतीभोवती डोळे उघडून पाहिलं ना, तरी सहज लोकांच्या गरजा दिसतील. आपल्याकडची कला, ज्ञान, गुण कुणाला द्यावा, ते दिसेल. अगदी आपल्या नात्यागोत्यांतही अशा व्यक्ती दिसतील. आजचं वैश्विक संकट ओसरल्यावर तर समाजाची घडी पुन्हा बसवताना अशा ‘समयदान यज्ञां’ची गावा-गावांत नितांत गरज भासणार आहे. त्या यज्ञानं आपलं अंत:करणही तृप्त होणार आहे आणि समाजपुरुषही ‘तथास्तु’ असा आशीर्वाद देणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 12:05 am

Web Title: article on innovative sacrifice abn 97
Next Stories
1 भेद-अभेद
2 अशांतीचं मूळ
3 तत्त्वबोध : शांती आणि शक्ती
Just Now!
X