चैतन्य प्रेम

आपला आपल्या मनाशी संवाद नाही त्यामुळे जीवनात विसंवाद आहे. बहिर्मुखतेचीच सवय जडली असल्यानं अंतर्मुख होणं साधतच नाही. अंतर्मुख झाल्याशिवाय जगण्याचं निरीक्षण, परीक्षण होत नाही. स्वत:च्या चुका उमगत नाहीत. सुधारण्याची इच्छा निर्माण होत नाही. श्री तुकाराम महाराज तर म्हणतात, ‘‘क्षणक्षणा हाचि करावा विचार। तरावया पार भवसिंधु।। नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान।।’’ आपलं जगणं कसं आहे? क्षणा-क्षणांनी उलगडणारं आहे. प्रत्येक क्षण फार मौल्यवान आहे, पण आपण तो कित्येकदा किती बेफिकिरीनं वाया घालवत असतो! म्हणून तुकाराम महाराज सांगतात की, बाबांनो प्रत्येक क्षणी विचार करा, प्रत्येक क्षण विचारपूर्वक जगा, अविचारात तो वाया दवडू नका. पण हा विचार कोणता करायचा आहे? तर ‘तरावया पार भवसिंधु’! हा देहबुद्धीकेंद्रित भावनांचा जो समुद्र आहे तो तरून कसं जावं? या भावनांनी जगणं व्यापक होण्याऐवजी संकुचित झालं आहे. त्यातून मुक्त होत कसं जगावं, त्यासाठीचा उपाय काय, याचाच विचार करावा. विचार म्हटलं की त्यात मनन, चिंतन आलंच. मग हा उपाय काय? तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘संत समागमीं धरूनि आवडी। करावी तांतडी परमार्थी।। तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें। नये डोळे धुरें भरूनि राहों।।’’ अंतर्मुख होण्यासाठी, जीवनाचा अर्थ जाणण्यासाठी आणि जीवन्मुक्त स्थितीत आनंदानं जगण्यासाठी सद्गुरू प्राप्ती अनिवार्य आहे. ती होण्यासाठी संत, सज्जन, सत्पुरुष आणि सत्साधकांचा सहवास अतिशय आवश्यक आहे. त्या सहवासाची आणि परमार्थ साधण्याची आवड मनात जोपासा. भ्रम/मोह आणि आसक्तीनं ज्यांचं अंत:करण भरलं आहे, त्यांच्या संगतीनं केवळ भौतिकात गुंतून डोळ्यासमोर सत्याला झाकणारा भौतिक विचारांचा धूर निर्माण करून त्यात वावरू नका! पण या संतांच्या सहवासानं नेमकं काय घडतं? मनाची घडण बदलते का? आणि कशी? ताई दामले म्हणून एक साक्षात्कारी संत होऊन गेल्या. त्यांच्या काही प्रवचनांचं संकलन विद्याताई शिधये यांनी केलं आहे. त्यातलं एक प्रवचन तर आजच्या संदर्भात अतिशय चपखलपणे लागू आहे. त्यात ताई म्हणतात की, ‘‘जितके नवे नवे शोध लागले तितके नवे नवे रोग निर्माण झाले. पण शारीरिक रोग बरा होण्यासाठी औषधाइतकीच मन:स्वास्थ्याची सुद्धा आवश्यकता असते. मनाची तब्येत उत्तम राहावी, असं वाटत असेल, तर संतरूपी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. संत हे भवरोगाचे जाणकार आहेत. शारीरिक रोग काही दिवसांनी तरी बरे होतील, पण भवरोग बरा करणे आणि बरा होणे महा कर्मकठीण! नेत्रांद्वारे आपण सुख घेतो, मनात साठवतो आणि त्या सुखासाठी झुरायला लागतो. इच्छापूर्ती झाली नाही, तर राग, द्वेष, मत्सर हजरच असतात  त्यामुळे मनाची तब्येत बिघडते. म्हणून संत प्रथम नेत्रातच अंजन घालतात. त्यामुळे भविष्य दृष्टीसमोर येते. इतका चांगला देह, पण म्हातारपणी दिसणार नाही, ऐकायला येणार नाही. शरीरात त्राणच उरणार नाही. माझं घर, माझा प्रपंच, माझी मुले, एवढा हव्यास केला. पण आज माझ्याजवळ बसायला कोणाला वेळ आहे का? म्हणून भविष्याची तयारी देह निरोगी असेल, तेव्हाच करायला हवी. संत झणझणीत अंजन घालतात त्यामुळे दूरचे दिसायला लागते तसेच जवळचेही उमगते. माझा सर्वात जवळचा जर कुणी असेल तर तो एक भगवंतच आहे, हे उमगते!’’