माणसाची वृत्ती मोठी सूक्ष्म असते. त्या वृत्तीचा प्रत्यय त्याच्या कृतीतून अर्थात वागण्या-बोलण्यातून येतो. जशी वृत्ती तशी उक्ती आणि कृती. भौतिकात रुतलेल्या माणसाचं मन अहोरात्र भौतिकाच्याच विचारात गुंतून पडलेलं असतं. त्याची वृत्ती भौतिकानंच घडलेली असते. त्यामुळे त्याच्या उक्ती आणि कृतीतही भौतिकाकडे असलेल्या त्याच्या आंतरिक ओढीचंच दर्शन घडतं. उलट जो खरा भक्त आहे त्याचं मन अहोरात्र शाश्वताच्याच विचारात, स्मरणात, चिंतनात बुडालेलं असतं. प्रपंचातली सर्व कर्तव्यं तो पार पाडत असतो, पण त्यात आसक्तीतून प्रसवलेली आवड नसते. श्रीतुकाराम महाराजांनी या आंतरिक पालटाच्या स्थितीचं वर्णन करताना म्हटलंय की, ‘‘काय सांगो जाले काहीचियि बाही, पुढे चाली नाही आवडीने!’’ सद्गुरूंनी अंतरंगात अशी क्रांती केली आहे की, काहीबाहीच घडलं हो! आता पूर्वीप्रमाणे भौतिकाच्या प्रांतात आसक्तीचं बोट पकडून पुढे जाण्याची आवडच उरलेली नाही! असा जो भक्त असतो ना, त्याच्या नुसत्या सहवासातही निश्चिंती, आनंद आणि अहेतुक प्रेम भरून असतं. त्याचे संस्कार चित्तावर झाल्याशिवाय राहात नाहीत. संत, सद्गुरू आणि भक्तांच्या अनेकानेक चरित्रांत, त्यांच्या सहवासात आलेल्यांच्या चित्तावर कसा भक्तिप्रेमाचा ठसा उमटू लागला, याचे दाखले मिळतील. एक भक्तिमान स्त्री श्रीगोंदवलेकर महाराजांना सद्गुरू मानून उपासना करीत असे. पतीची फिरतीची नोकरी होती त्यामुळे कित्येकदा घरी ही एकटीच असे. घरही तसं गावाच्या थोडं बाहेरच होतं. दर गुरुवारी ती महाराजांसाठी खिचडीचा प्रसाद करी. जे कुणी घरी येत त्यांना महाराजांचाच प्रतिनिधी समजून तो प्रसाद खायला देत असे. एके गुरुवारी ती घरी एकटीच होती. रात्र झाली. आता खिचडीचा प्रसाद ग्रहण करायला ती बसणार तोच दारावर थाप पडली. तिनं दार उघडताच पाच-सहा जण आत घुसले आणि घरातील मौल्यवान वस्तू देण्यासाठी धमकावू लागले. तिनं आपले सगळे दागिने त्यांच्या पुढय़ात ठेवले आणि त्या टोळक्याचा जो प्रमुख होता त्याला म्हणाली की, ‘‘दादा! तुम्हाला घरातलं जे सोनं-नाणं हवं ते खुशाल घ्या. फक्त आज गुरुवार आहे. माझ्या महाराजांचा प्रसाद आहे तो खाल्ल्याशिवाय जाऊ नका!’’ या प्रसादात काही गुंगीचं औषध वगरे घातलेलं नाही, हे त्यांना पटावं म्हणून तिनं प्रथम प्रसाद घेतला. मग त्यांना वाढलं. त्या अन्नाचा, त्या स्त्रीच्या सरळ स्वभावाचा असा संस्कार झाला की, त्यांनी घरातला पसा-अडका तिथंच ठेवला आणि महाराजांना नमस्कार करून ते निघून गेले. याच तऱ्हेचा प्रसंग गुरुदेव रानडे यांच्या चरित्रातही घडलेला आहे आणि तो निंबाळचा आहे. गुळवणी महाराज पुण्याला ‘वासुदेव निवास’मध्ये राहात. पहिल्या मजल्यावर त्यांच्या खोलीत भक्तांची गर्दी असे. संध्याकाळी ते फेरफटका मारायला म्हणून जात. एकदा अशीच बाहेर जाण्याची लगबग सुरू असताना जिन्यातून गलका ऐकू आला. काही शिष्यांनी एका पोराला धरून आणलं होतं. दर्शनासाठी आलेल्यांच्या चपला गेल्या काही दिवसांपासून गायब होत होत्या. हा पोरगाही चपला चोरताना पकडला गेला होता. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या अंगावरच्या कपडय़ांतून आणि अनवाणी पावलातून घरच्या गरिबीचा प्रत्यय येत होता. महाराजांनी एका शिष्याबरोबर त्याला बाजारात पाठवून नव्या चपला घेऊन दिल्या. इतकंच नाही, तर तो पुढे उत्सवाला वगरे सेवेसाठी आला तर चपला सांभाळण्याची सेवाही त्याला दिली! माणसाला त्याच्यातील मनुष्यत्वाचं भान आलं तरी त्याची वृत्ती सुधारते. हे भान भक्ताच्या सहवासात तीव्रतेनं येतं. – चैतन्य प्रेम