चैतन्य प्रेम

मला ब्रह्मदर्शन घडवा, असं मागणं घेऊन एकजण शिर्डीला साईबाबांकडे आला आणि आला तोदेखील परतीचा टांगा ठरवून! म्हणजे सत्पुरुषाकडे आपण जातो खरं, पण तिथून परत भौतिकात परतायची ओढ बरोबर घेऊनच जातो! तर बाबा म्हणाले, ‘‘असं मागणं मागणारा कुणी भेटला नाही खरं! मला फार आनंद वाटतोय. पण आजवर तुम्हाला ब्रह्मदर्शन का झालं नाही, त्या दर्शनाच्या आड काय येतंय, ते मी तुम्हाला दाखवतो!’’ असं म्हणून बाबांनी एका लहान मुलाला हाक मारली आणि म्हणाले, जरा आपल्या वाण्याकडून पाच रुपये घेऊन ये. तो मुलगा धावत गेला, काही क्षणांत परत आला. म्हणाला, ‘‘तो वाणी दुकानात नाही की घरीसुद्धा नाही.’’ मग बाबांनी एखाद्याचं नाव घेऊन त्याच्या घरी त्या मुलाला पिटाळावं, तो माणूसही घरी नसावा आणि मुलगा रिकाम्या हातानं परतावा; हा ‘खेळ’ काही काळ चालू होता! गंमत पाहा बरं, बाबांनी लहान मुलालाच या कामासाठी निवडलं कारण लहान मुलं जास्त विचार करीत नाहीत. बाबांनी सांगितलंय त्याच घरी जातील आणि तिथं तो माणूस नसला, तर परत येतील. मोठय़ा माणसाच्या मनात लगेच विचार आला असता, की बाबांनी सांगितलेला माणूस नाही ना? मग तात्पुरते दुसऱ्या माणसाकडून घेऊ पैसे आणि बाबांना देऊन टाकू. पण तो विचार मूल करीत नाही. तर त्या मुलानं या ‘खेळा’त बाबांना चांगलीच साथ दिली. इकडे ब्रह्म पाहायला आसुसलेल्या माणसाचा जीव वर-खाली व्हायला लागला. अखेर तो कंटाळून म्हणालाच की, ‘‘बाबा अहो माझा टांगा बाहेर थांबलाय. मला ब्रह्म दाखवता ना?’’ त्यावर बाबांनी उसळून त्याला सांगितलं की, ‘‘ते ब्रह्म का दिसत नाही, याचं कारणच तर मघापासून मी तुला दाखवतोय! पैशाच्या भेंडोळ्यात तुझं मन अडकून आहे, मग ब्रह्म कसं दिसणार?’’ मग त्याच्या खिशात किती पैसे आहेत, ते बाबांनी अगदी अचूक सांगितलं आणि म्हणाले, की पाच रुपयांपेक्षा कैक पटीनं पैसे तुझ्या खिशात आहेत. पण तुला असं वाटलं नाही की, पाच रुपये बाबांना देऊन टाकू आणि मग ते काय सांगतात ते ऐकू! तर हा जो ‘खेळ’ आहे तोच भगवंताच्या भक्तीची जाणीव शुद्ध करणारं महापूनजच होतं. म्हणून कवि नारायण सांगतो, ‘‘त्याचा खेळु तेंचि महापूजन’’ आणि मग पुढे म्हणतो, ‘‘ त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन।’’ त्या सद्गुरूमय शिष्याचं जे बोलणं आहे तेदेखील भगवद्भाव वाढवणारं, जोपासणारं असतं. म्हणूनच ते भगवंताचं प्रिय स्तवनच ठरतं. त्याच्या लहानसहान कर्मानंही भगवंत सुखी होतो. एवढंच नाही, तर तो ज्या वाटेकडे पाहतो त्या वाटेवर देव आनंदानं उभा असतो. (तो जेउती वास पाहे। आवडीं देवो तेउता राहे। मग पाहे अथवा न पाहे। तरी देवोचि स्वयें स्वभावें दिसे ।।४५०।।). इतकंच नाही, तर ‘‘तयासी चालतां मार्गे। तो मार्गु होइजे श्रीरंगें।’’ तो ज्या मार्गावरून चालतो तो मार्गच देव होतो! म्हणजे तो जे काही कर्म करतो ती भक्ती होतं, तो जे काही बोलतो तो सत्संग होतो आणि त्याचा मार्गच देव होतो. अर्थात देवाशी असलेलं त्याचं सख्यत्व कधीच लयाला जात नाही. ते अभंग, अक्षय राहतं. ‘‘जें जें कर्म स्वाभाविक। तें तें ब्रह्मार्पण अहेतुक। या नांव भजन निर्दोख। ‘भागवतधर्म’ देख या नांव।।४५२।।’’ असा भक्त जे जे कर्म अगदी स्वाभाविकपणे करतो ते ते हेतुरहित असल्यानं ब्रह्मार्पण होतं. हे निर्दोष भजन म्हणजेच भागवतधर्म आहे!