– चैतन्य प्रेम

सद्गुरूची अन्य लोकांसमोर स्तुती करण्यामागे शिष्याच्या मनातला भाव प्रामाणिक असतो. पण ज्यांच्या अंत:करणात श्रद्धा नाही, त्यांच्या मनात ती स्तुती ऐकून निंदात्मक विचारच उत्पन्न होतात. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, ‘‘जे माझी निंदा करतात, त्यांना मी कळलो नाही; पण जे माझी स्तुती करतात, त्यांनाही मी कळलो नाहीच!’’ कारण काय? तर स्तुती म्हणजेही चौकटीपलीकडे असलेल्याला एका चौकटीत बसवणं. तर आपण जो सर्वत्र आहे त्याला एकाच स्थानी कल्पण्याचा, कोंडण्याचा प्रयत्न करतो. जो मनातीत आहे, त्याला ध्यानानं मनाच्या कक्षेत आणण्याची धडपड करतो. जो शब्दातीत आहे, त्याला स्तुतीनं शब्दगम्य करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा, ‘अवधूत गीता’ सांगते की, ‘‘क्षमस्व नित्यं त्रिविधा पराधान्!’’ हे सद्गुरो! आमच्याकडून हे त्रिविध म्हणजे तीन अपराध नित्य घडत असतात, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर!! पण आधीच म्हटलं त्याप्रमाणे, सद्गुरू सर्वत्र भरून असला, तरी त्याच्या स्थानाचं महत्त्व आहेच. माणसाच्या आकलनाचा आवाका प्रथम मर्यादितच असतो. कळी हळूहळूच उमलते. तेव्हा माणसाच्या मनाला सद्गुरू दर्शनासाठी एका विशिष्ट स्थानाची गरज भासते. त्या स्थानी गेल्यावर दर्शन घेतल्याची भावना मनात निर्माण होते. त्याच्या ध्यानाला सद्गुरूंच्या रूपाचा आधार आवश्यक असतो. त्या रूपाचं डोळे मिटून दर्शन घेता घेता त्याच्या मनाचं समाधान होतं. त्याला सद्गुरूविषयी भरभरून बोलावंसं वाटतं. कारण त्या बोलण्यातून त्याच्या मनाचीही तृप्ती होत असते. तेव्हा जरी हे त्रिविध अपराध असले, तरी त्याशिवाय माणसाच्या मनातील सद्गुरूंवरील प्रेमाची सहज प्रक्रियाही सुरू होत नाही. कारण जगातल्या आवडीच्या विषयांच्या दर्शनाचीच सवय असलेल्या डोळ्यांना सद्गुरू दर्शनाची ओढ, जगात भटकंती करीत असलेल्या पायांना एका स्थानी जाण्याची ओढ, तसंच परनिंदा आणि आत्मस्तुतीचीच सवय जडलेल्या मुखाला सद्गुरू स्तुतीची ओढ या ‘अपराधां’मुळेच लागते! त्यामुळे हे अपराध असले तरी तो सद्गुरूही क्षमाच करतो! श्रीधर स्वामीही म्हणतात की, ‘‘गुरूची उपासना केल्याशिवायही मनाला समाधान होत नाही. त्याचे वर्णन करावेसे वाटते, असतील तिथे जावेसे वाटते, त्यांचे ध्यान करावेसे वाटते. तेव्हा या दृष्टीने आम्ही जो प्रयत्न करतो, तोही अगदीच टाकाऊ आहे असे म्हणता येत नाही. मनाचे काही तरी समाधान त्याच्यापासून होते. ज्याच्यावर आपले निस्सीम प्रेम असते, त्याच्या ध्यानाने मन आनंदाने पुलकित होते.’’ म्हणजेच जे मन आधी प्रपंचात रुतून होते, त्याला परमार्थाकडे वळवायचं तर प्रथम मनालाच हाताशी धरावं लागतं. मनाला प्रपंचाची आवड असते म्हणून तो प्रपंच आपण अगदी असोशीनं करीत राहतो. कितीही खस्ता खाव्या लागल्या तरी तो प्रपंच हवासाच वाटतो, सोडावासा वाटत नाही. अशा मनाला परमार्थ हवासा वाटण्यासाठी हे ‘अपराध’ क्षम्यच असतात. पण त्यात तारतम्य मात्र हवं. ज्यांच्या मनात श्रद्धा नाही, अशांसमोर सद्गुरूची थोरवी गाणं योग्य नाही, हे स्तवनापुरतं पाळायचं तारतम्य! तर मनाला हाताशी धरून परमार्थ आत्मसात करण्याचा अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. कारण संत तुकाराम महाराजही म्हणतात, ‘‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण!’’ पंत महाराज बाळेकुंद्रीकर म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘या मनाचं पोषण आणि मुंडण केलं पाहिजे.’’ त्यासाठी गुरुस्थानची यात्रा, त्यांचं ध्यान आणि स्तवन आवश्यकच असतं.