07 July 2020

News Flash

३३६. सर्वकाळ सुखदाता

जलतत्त्वाकडून आपण निर्मळता, कोमलता आणि माधुर्य हे गुण आत्मसात केले

– चैतन्य प्रेम

जलतत्त्वाकडून आपण निर्मळता, कोमलता आणि माधुर्य हे गुण आत्मसात केले. त्यामुळे ‘पृथ्वी’, ‘वायू’ आणि ‘आकाशा’नंतर ‘जल’ हा आपला चौथा गुरू आहे, असं अवधूतानं सांगितलं. अवधूत हा योगीच होता. चराचरांत एका गुरूतत्त्वावाचून काहीच नाही, या भावानं जो सदोदित युक्त असतो, तो खरा योगी! पण हेच पाणी जरी गुरू ठरत असले, तरी खऱ्या योग्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. तो अतुलनीयच असतो. कसा? अवधूत सांगतो, ‘‘जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य़ करी निर्मळ। उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।४६६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). पाणी केवळ शरीराचा मळ धुऊन टाकतं. त्यामुळे चित्तास प्रसन्नता वाटते खरी, पण काही काळ लोटताच किंवा दुसऱ्या दिवशी स्नानाशिवाय ती प्रसन्नता परत अनुभवता येत नाही. अर्थात, ती प्रसन्नता चिरकाल टिकणारी नसते. तेव्हा पाणी केवळ देहाचा मळ धुऊन टाकतं, तर योगी हा मन, चित्त आणि बुद्धीतली घाण धुऊन टाकतो. अर्थात मन, चित्त आणि बुद्धीला शुद्ध करतो. पाण्याच्या स्नानानं एकवेळची तृप्ती लाभते, तर योग्याच्या बोधरूपी धारेनं मन, चित्त आणि बुद्धी अखंड शुचिर्भूत होत असल्यानं ती तृप्ती अखंड टिकणारी असते. पुढे अवधूत सांगतो, ‘‘उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती। योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाहीं।।४६७।।’’ पाण्याचं सुख ते किती? तहानलेला पाणी पितो त्या क्षणापुरता तो तृप्त होतो. पण त्याची तहान काही कायमची भागत नाही. काही क्षणानं पुन्हा त्याला तहान लागतेच. योगी मात्र स्वानंदपान इतकं करवतो, की त्यानं लाभणारी आत्मतृप्ती कधी आटतच नाही. मग अवधूत सांगतो, ‘‘उदकाची जे मधुरता। ते रसनेशींचि तत्त्वतां। योगियांचे गोडपण पाहतां। होय निववितां सर्वेद्रियां।।४६८।।’’ म्हणजे, जलाची गोडी रसनेपुरतीच मर्यादित असते, पण योगी आपल्या माधुर्यानं मनासकट सर्व इंद्रियांना तृप्त करतो! एकेक सद्गुरूरूप आठवून पाहा! त्या दर्शनानंच मन, चित्त कसं निवतं, तृप्त होतं! सत्पुरुषाच्या वावरण्यातच माधुर्य दरवळत असतं. मधाच्या पोळ्यातून मधच ठिपकत राहावा, त्याप्रमाणे सत्पुरुषाच्या पाहण्यात, बोलण्यात आणि सहज वावरण्यातही प्रेमच आकंठ भरून असतं. जीवनाच्या रणरणत्या वाळवंटात तप्त भूमीवरून चालून दमलेल्या, पोळलेल्या जीवाला सत्पुरुषाचं दर्शन तृप्त करून टाकतं. अवधूत सांगतो, ‘‘तापले आले उदकापाशीं। अंगस्पर्शे निववी त्यांसी। तैसिचि दशा योगियासी। स्पर्शे तापासी निवारी।।४७०।। उदकें निवविलें ज्यासी। परतोनि ताप होय त्यासी। योगी कृपेनें स्पर्शे ज्यासी। त्रिविध तापांसी निर्मुक्त।।४७१।।’’ म्हणजे, तप्त जीव उदकापाशी येताच जलाच्या दर्शनानं, स्पर्शानं आणि प्राशनानं ते शांत होतात. तसाच योगीही आपल्या नुसत्या स्पर्शानं वा अस्तित्वानं संसारताप शोषून घेतो! जलानं शांत झालेला मनुष्य पुन्हा रणरणत्या उन्हात जाताच तापदग्ध होऊ शकतो, पण योग्याचा कृपास्पर्श एकवार ज्याला झाला आहे तो त्रिविध तापांतून कायमचा मुक्त होतो! पुढे म्हणतात, ‘‘योगी ज्यासी निववी जीवेंभावें। त्यासी जीवु गेलियाही तापू नव्हे। निवालेपणें तो वोल्हावे। स्वानुभवें डुल्लतु।।४७२।।’’ म्हणजे, योगी ज्याला जीवाभावानं निववतो, तृप्त करतो, त्याला पुन्हा कसलाही ताप शिवतदेखील नाही. परमशांतीच्या ओलाव्यानं त्याचं अंत:करण सतत इतकं स्पर्शित असतं, की तो स्वानुभवाच्या आनंदात सदोदित डोलतच असतो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:06 am

Web Title: ekatmayog article 336 abn 97
Next Stories
1 ३३५. जैसी गंगा वाहे..
2 ३३४. मेघांचा पडदा
3 ३३३. एकातून व्यापकत्वाकडे!
Just Now!
X