चैतन्य प्रेम

सगळ्या गोष्टींपासून जो तटस्थ होतो, तो  आंतरिक समाधी अवस्थेत असतो, असं लोकांना वाटतं. पण त्याची बुद्धी ठकली आहे, असं कवि नारायण सांगतो. (ताटस्थ्या नांव समाधी। म्हणजे त्याची ठकली बुद्धी।) कारण? कवि नारायण सांगतो की, ‘‘ताटस्थ्यापासूनि उठिला। तैं तो समाधीस मुकला। तेव्हां एकदेशी भावो आला। ’’ म्हणजे काही काळासाठी मन गोळा करून एका जागी केंद्रित केलं आणि ताटस्थ्य टिकवलं खरं, पण जेव्हा ‘समाधी’ संपली अर्थात ताटस्थ्य ओसरलं की पुन्हा तो देहभावावरच आला! मग अशा घडीभरच्या ‘समाधी’ला काय अर्थ? समाधी ही मनाची स्थिती आहे आणि ती सदोदित टिकली पाहिजे. ती कशी टिकेल? तर जेव्हा तीच सहजस्थिती होईल तेव्हा!  ‘‘यालागीं समाधि आणि व्युत्थान। या दोनी अवस्थांसहित जाण। बुद्धी होये ब्रह्मार्पण। अखंडत्वें पूर्ण परमसमाधि।।४३१।।’’ अर्थात समाधी असो की व्युत्थान असो म्हणजेच अंत:र्मुख स्थिती असो की बहि:र्मुख स्थिती असो; ज्याच्या समस्त स्थितींसहित बुद्धीही ब्रह्मार्पण म्हणजे सद्गुरुचरणी लीन झाली असते, तो सदैव अखंड आणि पूर्ण समाधीस्थिती भोगत असतो! कवि नारायण सांगतो, ‘‘अर्जुना देऊनि निजसमाधी। सवेंचि घातला महायुद्धीं। परी तो कृष्ण कृपानिधी। ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पशरे।। ४३२।।’’ म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाला आत्मसमाधी देऊन लगेच युद्धात लोटलं! पण तरीही त्या कृपानिधी कृष्णाने त्याला ताटस्थ्यपणाचा स्पर्शही होऊ दिला नाही! म्हणजे काय? तर श्रीकृष्णानं या चराचराचं विराट दर्शन घडविलं आणि त्यात जन्म-मृत्यूचं तितकंच व्यापक चक्र कसं फिरत आहे, हेही दाखवलं, सर्व आपल्यातूनच कसं उत्पन्न होत आहे, आपल्याच आधारावर कसं टिकून आहे आणि अखेर आपल्यातच कसं लय पावणार आहे, हेसुद्धा दाखवलं, पण तरीही त्या विराट स्वरूपात क्षुल्लक भासू शकणाऱ्या महाभारताच्या युद्धापासून अर्जुनाला परावृत्त होऊ दिलं नाही! त्याच्या मनाला ताटस्थ्याचा स्पर्श होऊ दिला नाही. त्रिशुद्धी म्हणजे सत्त्व-रज-तम या तिन्ही गुणांच्या प्रभावातून मुक्त करून त्या गुणांवर ताबा मिळवू देऊनही त्याला लढायलाच लावलं! अगदी त्याचप्रमाणे या चराचराच्या विराट पसाऱ्यात आणि व्यापक घडामोडींत एका माणसाचं जीवन ते कितीसं मोठं आणि महत्त्वाचं असणार? अनंत ब्रह्मांडांच्या विराट जीवनप्रवाहात त्या एका जीवनाला किंमत ती काय असणार? तरीही त्या विराट स्थितीचं भान देणारे आणि त्या विराटावर ज्यांची सत्ता आहे असे सद्गुरू शिष्याला त्याचं जे काही जीवन आहे, त्या जीवनातली जी कर्तव्यं आहेत, ती सर्व पार पाडायलाच लावतात. जीवनसंघर्षांतून, जीवनयुद्धातून त्याला पळ काढू देत नाहीत. त्याच्या त्या तोकडय़ा जीवनात जणू रस घेतात आणि त्याला भौतिक मार्गदर्शनही करतात. पण ते मार्गदर्शन अगदी आवश्यक तितपतच असतं. आईनं मुलाशी समरस होत त्याच्याबरोबर त्याच्या खेळण्यांशी खेळावं तसं असतं ते! पण त्यामागचा हेतू शिष्याच्या मनातला भौतिक चिंतेचा पगडा उरू नये आणि त्यानं आध्यात्मिक चिंतनाकडे वेगानं वळावं, हाच असतो. तेव्हा सर्व कर्मातही समाधी स्थितीची कला तोच शिकवू शकतो. म्हणूनच कवि नारायण सांगतो की, ‘‘सकळ कर्मी समाधी। हे सद्गुरूचि बोधी बुद्धी। तरी युद्धींही त्रिशुद्धी। निजसमाधी न मोडे।।४३३।।’’