चैतन्य प्रेम

पूर्ण ब्रह्मार्पण भावानं भगवंताचं भजन करताना सर्व मनोव्यवहार कसे अर्पण करावेत, याचं वर्णन झाल्यावर कवि नारायणानं इंद्रियार्पण कसं करावं, हे सांगितलं. त्यातली पहिली म्हणजे ३६२वी ओवी आपण आधीच पाहिली आहे. त्या ओवीत एक फार सुंदर रूपक वापरलं आहे. ‘‘दीपु लाविजें गृहाभीतरीं। तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं। तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी। तोचि इंद्रियांतरीं भजनानंदु।।३६२।।’’ घराच्या आत दिवा उजळला की त्याचा प्रकाश खिडक्यांतून बाहेर जसा फाकतो, त्याप्रमाणे अंत:करणात श्रीहरी म्हणजे सद्गुरूप्रेम प्रगटलं की इंद्रियव्यवहारांतून त्याच्या प्रेमाचा आनंद पाझरू लागतो. इंद्रियांचे व्यवहार हेच जणू भजन होतं. डोळ्यांचं पाहणं, कानांचं ऐकणं, मुखाचं बोलणं हे सारं सारं भक्तीप्रेमानं माखलेलं असतं. ते कसं, हे ३६४ ते ३९३ या ३० ओव्यांत सांगितलं आहे. त्या ओव्या आणि त्यांचा अर्थ इथं सांगता येईल, पण त्यातला जो भाव आहे तो नुसत्या शब्दार्थानं कळणारा वा सांगता येणारा नाही. त्या आपण ‘एकनाथी भागवता’त वाचाव्यात. पण त्यातून काय घ्यायचं, याचा विचार करू. गीतेतही स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत ना? ती वाचून एकच जाणवतं, आपण काही तसे स्थितप्रज्ञ नाही आणि निव्वळ कुठल्या साधनेनं ती स्थितप्रज्ञता येणे नाही! अगदी तीच जाणीव या तीस ओव्या वाचून होईल. की हे इतकं परिपूर्ण इंद्रियार्पण काही नुसत्या साधनेनं साधणारं नाही. इंद्रियार्पण म्हणजे इंद्रियांचे जे जे विषय आहेत, त्यांची ओढ भगवंतात लीन करून टाकणं. म्हणजे पाहणं हा डोळ्यांचा विषय असेल, तर पाहण्याची जी ओढ आहे ती इतकी भगवंतमय करून टाकायची की जे जे पाहू त्या त्या जागी  मनातला भगवद्भावच जागा झाला पाहिजे. नव्हे असं जो पाहतो त्याची क्षमता अशी असते की त्याला पाहणाऱ्याच्या अंत:करणातही भगवद्भावच जागा होतो. शंकर महाराज लहर आली की ताडकन उठायचे आणि कुणाच्याही घरी जायचे. आता ‘लहर आली की’ हे आपलं देहबुद्धीचं आकलन! ती लहरदेखील भगवद्प्रेरणेनुसार अगदी पूर्वनियोजित असायची. तर ते असे निघून जायचे. मग कधी श्रीमंताच्या हवेलीत मऊ गाद्यागिरद्यांवर बसतील, तर काही वेळात गरीबाच्या फाटक्या सतरंजीवरही बसतील, पण त्यात त्यांचा आत्मानंदी भाव एकसमान. तर असेच अचानक ते निघाले तर वेश्यावस्तीचा रस्ता लागला. त्यांच्याबरोबर जे नवखे होते ते थोडे घाबरले की, इथं आपल्याला कुणी पाहिलं तर काय म्हणेल? पण जसं महाराज रस्त्यावरून जाताना तिथल्या स्त्रियांनी पाहिलं त्या धावत खाली आल्या आणि पाया पडल्या. तेवढय़ापुरते महाराज स्थिरावले आणि मग लगेच त्याच गतीत पुढे निघून गेले. तेव्हा सर्वत्र भगवद्भावातच वावरणं, सर्वत्र भगवद्भावाचंच सिंचन करणं आणि दुसऱ्याच्या अंत:करणातला भगवद्भाव नुसत्या दर्शनानं आणि सहवासानं जागा करणं, हे सद्गुरूशिवाय अन्य कुणालाही शक्य नाही. ही भगवंतमयता कशी असते, हे सद्गुरूच त्यांच्या जीवनातून दाखवतात. तेच संस्कार ग्रहण करून आपल्या जीवनात निर्भयतेला, भक्तीला आणि परिस्थितीच्या स्वीकाराला वाव द्यायचा अभ्यास सद्भावपूर्वक करायचा असतो. तेव्हा कुठे भगवद्भावाची ओझरती झलक आपल्या जीवनात अनुभवता येईल. तेव्हा भगवंतमय होणं सोपं नाही. त्यासाठी जो खऱ्या अर्थानं भगवंतमय आहे, त्याचाच आधार अनिवार्य आहे.