चैतन्य प्रेम

जे नाही त्याची चिंता करणं ही अतिचिंता आहे आणि जे आहे त्याचं चिंतन करण्यातून निश्चिंतता येते, (नाथिलें चिंती ते ‘अतिचिंता’। आथिलें चिंती ते ‘निश्चिंतता’। आथी नाथी सांडिली चिंता। सहजें न भजतां भजन होये।।४२१।।) या ओवीच्या अनुषंगानं आपण ‘आनंदलहरी’ या एकनाथ महाराजांच्याच लघुग्रंथातील काही ओव्यांचा मागोवा घेत आहोत. नाथ सांगतात, ‘‘तैसें देह पावलिया लय। पूर्वकर्म सहजेंचि जाय। संचितासि नुरे ठाय। सहजें होय सुखरूप।।२८।।’’ देह लय पावतो म्हणजे काय? तर देहभाव लय पावतो. ही लय कुठली? तर देहभाव हा सदोदित प्रपंचाच्या अनंत लयींमध्ये अर्थात ओढींमध्ये भिरभिरत असतो. तो जेव्हा परमात्मभावात लय पावू लागतो, परमात्मभावाची गोडी जेव्हा त्याला जडू लागते तेव्हा जी पूर्वकर्म असतात, प्रारब्धानुरूप वाटय़ाला आलेली र्कम असतात, ती सहजपणे सरतात आणि संचित कर्माचाही प्रभाव नाहीसा होत जातो. आता यामागचं रहस्य काय? तर प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेलं कर्म आपण आवश्यक तेवढंच करीत नाही. तर त्या कर्माच्या फळाबाबतच्या अपेक्षांचाही विचार सतत घोंगावत असतो. त्यामुळे कर्म करताना कर्तव्याची मर्यादा ओलांडून मोहापायी आपण अधिकचं कर्म करून नवं प्रारब्धही जन्माला घालत असतो. पण जेव्हा देहबुद्धी आत्मबुद्धीत पालटते आणि देहभावाच्या जागी परमात्मभाव जागा राहू लागतो, तिथं दु:खाचं मूळ कारण असलेल्या अज्ञानजन्य कर्माचं प्रमाण वेगानं घटत जातं आणि मग दु:खाऐवजी सुखच विलसू लागतं. आता देहबुद्धीच्या अनुकूलतेला माणूस सुख समजतो. पण इथं जे सुख आहे, ते देहबुद्धीवर अवलंबून नाही! तर ते खरं विशुद्ध आंतरिक आत्मसुख आहे. बाहेरून तो ‘दु:खा’त आहे, असं वाटू शकेल, पण अंतरंगातून तो पूर्ण ‘सुखी’ असतो. अर्थात अत्यंत प्रतिकूल प्रसंगातही त्याचं मन स्थिर असतं. बाहेरच्या घडामोडींकडे ते अगदी अलिप्तपणे पाहात असतं आणि त्याच्या प्रभावापासून ते मुक्त असतं. याचा अर्थ ते मन निष्क्रिय झालेलं असतं का? तर नाही. संकटांचा ते अगदी कणखरपणे सामना करतं, पण त्या संकटामागचं कारणही त्याला उमगत असतं. त्यामुळे संकटाला जीवनसर्वस्व मानून ते अटीतटीनं झुंजून घायाळ होत नाही. उलट आवश्यक ते सर्व प्रयत्न कसोशीनं करूनही ते फळाबाबत उदासीन असतं. याचं कारण ज्या गोष्टीसाठी खरी तळमळ पाहिजे, त्याच गोष्टीसाठी ते मन तळमळत असतं. जे आज आहे आणि उद्या असेल, याचा काही भरवसा नाही, त्याच्यासाठी तळमळत आयुष्याचा मोठा काळ, देहाच्या क्षमता नाहक वाया जातात, याचं भान त्याला आलं असतं. त्यामुळे खरा अग्रक्रम आंतरिक स्थितीला आहे, हे जाणून त्या आंतरिक स्थितीला बाधा येणार नाही इतपत बाह्य़ स्थितीत बदल करण्यात ते कार्यरत असतं. त्यामुळे अशा भक्ताच्या जीवनात अद्भुत अशी ऐक्यता भासमान होत असते. नाथ म्हणतात, ‘‘चित्त चिंत्य आणि चिंतन। यापरी तिहींस जाहलें समाधान। तें समाधानही कृष्णार्पण। सहजीं संपूर्ण स्वयें होये।।४२२।।’’ चित्त, चिंत्य आणि चिंतन या तिन्ही गोष्टींना समाधान लाभतं आणि तेदेखील सहजतेनं कृष्णार्पण होतं आणि सहज स्वरूपात असा भक्त वावरू लागतो! अशा भक्ताचं स्थिर पण प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्व इतरांवर सूक्ष्म प्रभाव टाकतं. त्याची ही अखंड सुखरूपता आपल्यालाही साधावी, असंही अनेकांना वाटतं.