चैतन्य प्रेम

ज्या चित्तात चिंतन चालतं, ते चित्त, ज्याचं चिंतन करायचं म्हणजेच जे चिंतनीय आहे, ते परमतत्त्व आणि ती चिंतन प्रक्रिया या तिन्हींत एकलयता निर्माण झाली. चित्त तृप्त झालं. ज्याचं चिंतन करायचं त्या चिंतनाशी विसंगत अशा गोष्टींचं चिंतन झालं नाही आणि चिंतनाची प्रक्रियाही समधारेत सुरू राहिली. यामुळे एक आंतरिक तृप्ती विलसू लागली. मग ती तृप्तीही जणू कृष्णार्पणच झाली. म्हणजे ती तृप्ती कृष्णापासून विलग राहिलीच नाही. जेव्हा मन तृप्तीनं भरून जातं तेव्हा ज्या गोष्टीमुळे ते तृप्त झालं असतं ती गोष्ट, मनाची तृप्तावस्था आणि त्या तृप्तीत मनात उमटत असलेल्या आनंदलहरी, हे सारं एका तृप्तीच्या अनुभवातच सामावलं असतं. त्यांचं वेगवेगळं वर्णन करता येत नाही. तशी अनन्य भक्ताची अभंग आंतरिक समाधानावस्था असते. नाथ म्हणतात, ‘‘चित्त चिंत्य आणि चिंतन। यापरी तिहींस जाहलें समाधान। तें समाधानही कृष्णार्पण। सहजीं संपूर्ण स्वयें होये।।४२२।।’’ चित्त, चिंत्य आणि चिंतन या तिन्ही गोष्टींना समाधान लाभतं आणि तेदेखील सहजतेनं कृष्णार्पण होतं आणि सहज स्वरूपात असा भक्त वावरू लागतो! अशा भक्ताचं स्थिर पण प्रसन्नचित्त व्यक्तिमत्त्व इतरांवर सूक्ष्म प्रभाव टाकतं. त्याची ही अखंड सुखरूपता आपल्यालाही साधावी, असंही अनेकांना वाटतं. आता हे जे आंतरिक समत्व आहे, स्थैर्य आहे, समाधान आहे; ते कशानं प्राप्त होईल? तर उत्तर एकच, भगवद्तत्त्वाला पूर्णपणे समर्पित होणं! त्यासाठीचा एकच उपाय आहे, एकच साधना आहे ती म्हणजे भक्ती! जनार्दन महाराजांनी एकनाथ महाराजांना यासंबंधात जो बोध केला, तो एका अभंगात आला आहे. त्यात जनार्दन महाराज सांगतात, ‘‘मुख्य ती उपासना भक्ती। ज्ञान विरक्ति तेणं जोडे।। १।। हेंचि एक परमार्थ सार। आणिक विचार करूं नये।।२।। योगयाग तपतां तप। न जाय संकल्प मनीचा।। ३।। म्हणे जनार्दन एकनाथा सावध। हृदयीं गोविंद आठवी सदा।। ४।।’’ मुख्य ती उपासना भक्ती! संकुचिताच्या प्रभाव पकडीतून सुटण्यासाठी एकच उपाय आहे, एकच उपासना आहे, ती म्हणजे भक्ती! मागेच आपण पाहिलं, की ‘उपासना’ या शब्दांत उपसण्याची क्रिया आहे! आपल्या आत जे जे परमतत्त्वाशी विसंगत आहे, संकुचिताचा भ्रम-मोह वाढविणारं आहे, ते ते उपसून टाकून द्यायचं आहे. आणि हे भक्तीनं सहज घडणार आहे! ज्ञान, वैराग्य, कर्म हे सारं साधू गेलो, तर ते साधेल अगदी थोडं, पण तेवढय़ाचाही फार मोठा अहंकार वाटू लागेल आणि मग ती ‘उपासना’ होणार नाही, उलट अहंभावाची ‘जोपासना’च होईल. जेव्हा भक्ती सुरू होईल, तेव्हा ज्ञान, वैराग्य आपोआप जोडलं जाईल. आता ‘भक्ती’ म्हणजे काय? तर विभक्त न होणं! म्हणजेच परम तत्त्वाच्या भावनेत सदैव स्थिर राखणारा सद्गुरूंचा जो बोध आहे त्याच बोधाशी सदोदित जोडलेलं राहणं, त्यापासून कृतीतूनही दूर न  होणं, विचार-उच्चार आणि आचार यात एकवाक्यता असणं. जेव्हा अशी खरी भक्ती साधू लागेल तेव्हा अनवधान जाऊन अवधान येईल. मग जगण्यातल्या विसंगतींकडे तत्काळ लक्ष जाईल आणि तशा विसंगती रोखल्या जातील. आत्मज्ञानावाचून या चराचरात खरं ज्ञान नाही. बाकी सगळ्या ज्ञानछटा या त्या मूळ आत्मज्ञानाचेच कवडसे आहेत. अवधानपूर्वक जगणाऱ्या भक्ताच्या जीवनव्यवहारातच निर्लिप्तता, अलिप्तता आणि विशुद्ध जाणीव विलसत असते. ज्ञान आणि विरक्ती त्यात प्रतिबिंबित होत असते.