चैतन्य प्रेम

कोणताही सत्पुरुष कोणतीही कृती अकारण करीत नाही. जरी त्यांची प्रत्येक कृती ही अकर्तेपणानं घडत असली आणि ती सद्गुरूइच्छेनंच घडत आहे, असा त्यांचा शुद्ध प्रामाणिक भाव असला, तरी त्यांच्या प्रत्येक कृतीमागे निश्चित असा आध्यात्मिक हेतू असतो. माउलींनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली ती सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं. संस्कृत भाषेत असलेलं गीतेतील शुद्ध सखोल तत्त्वज्ञान लोकांच्या भाषेत, लोकव्यवहारात असलेल्या भाषेत प्रकट व्हावं, ही त्यांची इच्छा होती आणि त्या इच्छेची पूर्ती माउलींनी  ‘भावार्थदीपिका’ अर्थात ज्ञानेश्वरी प्रकट करून केली. तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग म्हणजे जणू अमोल असा हिराच! हा अभंग म्हणजे त्यांचं हृदगतच जणू. बाह्य़ आणि आंतरिक असा अखंड संघर्ष सुरू असतानाही भगवंताशी लय कशी साधली जाते, हे उलगडून दाखवणारं अनुभवसिद्ध रूप म्हणजेच हे अभंग. अगदी त्याचप्रमाणे एकनाथ महाराजांनी ‘एकनाथी भागवत’ जनांपुढे आणलं त्याचा हेतू भक्तीचा भावसंस्कार हाच आहे. या भागवताचं प्रकटन संतजनांच्या आज्ञेनुसार झालं आहे, हे स्वत: नाथच सांगतात. ते म्हणतात, ‘‘एकांतीं आणि लोकांतीं। थोर साक्षेप केला संतीं। तरी सांगा जी मजप्रती। कोण ग्रंथीं प्रवर्तो।।’’ (अध्याय पहिला, ओवी ५८). मी ग्रंथ लिहावा, असा आग्रह संतांनी एकांतात आणि लोकांतातही केला. अर्थात जगात वावरत असताना, लोकांचा जीवनसंघर्ष दाखवून आणि अशाश्वताच्या मोहानं ग्रासलेल्या या लोकांना आंतरिक सावधानता शिकवणारा आणि  त्यांच्या चित्तावर भक्तीचे संस्कार करून त्यांना जगाच्या आसक्तीपासून विभक्त करणारा आधार किती आवश्यक आहे, हे संतांनीच मला वेळोवेळी जणू दाखवून दिलं. एकांतातही माझ्या अंत:करणात त्या ग्रंथलेखनाची ऊर्मी उत्पन्न केली. पण अशा कोणत्या ग्रंथाला मी प्रारंभ करू,  हा प्रश्न मी त्यांना वेळोवेळी विनवणीपूर्वक केला. त्यावर संतांनीच कृपापूर्वक सांगितलं की, ‘‘पुराणीं श्रेष्ठ भागवत। त्याहीमाजी उद्धवगीत। तुवा प्रवर्तावें तेथ। वक्ता भगवंत तुज साह्य़।।’’ (अध्याय पहिला, ओवी ५९). संतसज्जनांनी मला सांगितलं की, ‘‘सर्व पुराणांमध्ये श्रीमद्भागवत महापुराण हेच श्रेष्ठ आहे आणि संपूर्ण भागवतातील उद्धवगीत हे अत्यंत श्रेष्ठ आहे. तेव्हा ते उद्धवगीत ज्या अकराव्या अध्यायात आहे, त्याचंच निरूपण तू सुरू कर. ज्या भगवंतानं उद्धवांना हा बोध केला होता, तोच भगवंत तुझ्या अंत:करणात असून या नव्या ग्रंथांचं अख्यानही तोच पूर्णत्वास नेईल! अहो, सर्व ज्ञान प्रकट करणाऱ्या वेद, शास्त्र, पुराणादि ग्रंथांचं शुद्धीकरण, सुसूत्रीकरण आणि प्रकटीकरण व्यासांनीच केलं आणि तरीही त्यांचं अंत:करण तृप्त झालं नव्हतं! शुद्ध, स्पष्ट आणि तीव्र ज्ञानानं मनाला वाटणारं समाधान चिरंतन टिकत नव्हतं. काहीतरी अपूर्णता जाणवत होती. अतृप्तीची रुखरुख होती. ‘जोवर भगवंताच्या लीलाचरित्राचं गायन तुम्ही करणार नाही, तोवर मनाची ही अवस्था पालटणार नाही,’ असं महर्षि नारदांनी त्यांना सांगितलं आणि मग त्यांच्याच सांगण्यानुसार व्यासांनी ‘श्रीमद्भागवद् महापुराण’ रचलं तेव्हा कुठं ते पूर्ण तृप्त झाले! तेव्हा भौतिक जीवनाच्या संघर्षांत अहोरात्र झुंजत असलेल्या जिवालाही खरी आंतरिक तृप्ती या भागवताच्या चिंतनानं लाभणार आहे. आणि म्हणूनच नाथांनी त्यातील एकादश स्कंधाचं आख्यान सुरू केलं आहे!