चैतन्य प्रेम

जनार्दन स्वामी एकनाथांना सांगतात, ‘‘देह शुद्ध करुनी भजनीं भजावें। आणिकांचे नाठवावें दोषगुण।।’’  हे शिष्या, ‘मी खरा भक्त’, ‘मी खरा ध्यानयोगी’, ‘मी खरा तपस्वी’ हे सगळे स्वत:च्या सगुण रूपाला तू चिकटवलेले मुखवटे टाकून दे आणि झडझडून जसा आहेस, तसा भगवंताला सामोरा होऊन त्याच्या भजनात स्वत:ला झोकून दे. आधी शुद्ध होऊ आणि मग भजनाला लागू, असं वाटत असेल, तर हे शक्य नाही. आधी शुद्ध झालो, तर मग भजन ते वेगळं काय करायचं? तेव्हा इथं शुद्ध म्हणजे सर्व तऱ्हेचं ढोंग सोडून प्रामाणिकपणे भगवंताच्या भजनाला लागायचं आहे आणि हे साधण्यासाठी सद्गुरू सांगत आहेत, ‘आणिकांचे नाठवावे दोषगुण!’ इतरांचे दोषच नव्हे, तर गुणदेखील आठवायचे नाहीत! आपल्या मनात येईल की, इतरांचे दोष आठवू नयेत, हे तर अध्यात्मात अभिप्रेत आहेच. अनेकानेक संतसत्पुरुष इतरांच्या दोषांचं दर्शन आणि उच्चारण करायला नकार देतात. दुसऱ्याचे दोष दिसतात याचाच अर्थ त्या दोषांचं मूळ आपल्यातही असतं, असं सत्पुरुष सांगतात. बरेचदा त्या दोषदर्शनातून परनिंदेचा दोष आपल्या मनात अधिक खोलवर रुजण्याचाही धोका असतो. तेव्हा इतरांचे दोष आठवू नकोस, असं सद्गुरू सांगतात त्यात काही गैर वाटत नाही, पण इतरांचे गुणही आठवू नकोस, असं सांगतात त्यातलं मर्म पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे इतरांचे गुण न आठवण्याचा बोध पचनी पडत नाही. उलट दुसऱ्याच्या गुणांचा आदर्श ठेवला तर परमार्थ पथावरील वाटचाल अधिक नेटकी आणि वेगानं होईल, असंही आपल्याला वाटतं. मात्र आपल्या ‘परगुण-स्मरणा’मागे आपलीच देहबुद्धी कशी सुप्तपणे काम करीत असते, त्या ‘गुणां’ना आपला स्वार्थच कसं जोखत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. याचं कारण दुसऱ्यात जो ‘गुण’ आहे, असं आपल्याला वाटतं तो ‘गुण’ आपल्या ‘मी’पणानुसार आपण मानत असतो. म्हणजे एखाद्यानं आपले दोष आपल्याला स्पष्ट सांगितले तर त्याच्या त्या सांगण्यामागे ‘स्पष्टवक्तेपणा’ हा गुण आहे, असं आपल्याला कधीच वाटत नाही. तर त्या स्पष्ट बोलण्यामागे ‘उद्धटपणा’ हा दोष आपल्याला दिसतो! एखाद्यानं आपल्या स्वार्थाला प्रोत्साहन दिलं, आपल्या अज्ञानी कृत्याची भलामण केली तर, मित्राला वास्तवाची जाण करून देण्याचा खरा स्नेहगुण त्याच्यात नाही, असं आपल्याला वाटत नाही, तर उलट ‘अनुकंपा’, ‘प्रेम’ आदी ‘गुण’च आपण त्याला चिकटवतो आणि मग त्याच्याशी स्वत:ला आपलेपणानं जखडून घेऊन राहू पाहतो. तेव्हा इतरांचे जे ‘गुण’ आपल्याला दिसतात, वाटतात, भासतात आणि भिडतात ते बरेचदा आपल्या ‘मी’पणानुसारच असतात. त्यामुळे भगवंताचं भजन करताना भगवंताऐवजी अशा ‘गुण’वंताचा आधार अधिक वाटतो! भगवंताऐवजी अशा ‘गुण’वंताचं अस्तित्वच अधिक जाणवतं, खरं वाटतं आणि हवंसंही वाटतं. मग अशा ‘गुण’वंताच्या अस्तित्वाचाच दिलासा भगवंतापेक्षा अधिक वाटतो. आपल्या ‘गुणां’ची कुणी स्तुती केली, तर आपल्याला आनंद होतो हे जाणून त्याचप्रमाणे मग दुसऱ्याच्या ‘गुणां’ची स्तुती करून त्याच्याशी आपुलकीचं नातं जोडायचा आपण प्रयत्न करीत राहतो. हेच नातं पुढे आसक्तीत कधी रूपांतरित होतं, हे उमगतही नाही. मग परमगुणांची जो खाण आहे, अशा गुणातीत सद्गुरूंकडे दुर्लक्ष सुरू होतं. हे धोक्याचं वळण लक्षातही येत नाही.