02 March 2021

News Flash

३८. भगवंताचं हृदगत्!

वंदनेनं भरलेल्या पहिल्या अध्यायात आता भागवताचा उगम प्रकट झाला आहे.

 चैतन्य प्रेम

वंदनेनं भरलेल्या पहिल्या अध्यायात आता भागवताचा उगम प्रकट झाला आहे. दत्तात्रेयांना नाथ वंदन करतात आणि त्या दत्तात्रेयांनी भागवताचं  जे माहात्म्य वर्णिलं ते नमूद करतात, ‘‘तो म्हणे श्रीभागवत। तें भगवंताचें हृदगत्। त्यासीचि होय प्राप्त। ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं।। १४४।।’’ दत्तात्रेय म्हणतात की, ‘श्रीमद्भागवत हे भगवंताचं हृदगत् आहे. ज्याचं चित्त निरंतर भगवंताच्या ठायी असेल, त्यालाच ते प्राप्त होईल!’ इथं हृदगत् हा शब्दच भागवताचं सर्वोच्च स्थान दर्शवितो. जो हृदयस्थ आहे, ज्याच्यावर हृदयापासून प्रेम आहे, त्यालाच हृदगत् सांगितलं जातं. तेव्हा भगवंताचं हे हृदगत् असलेलं भागवतही त्यालाच प्राप्त होतं, जो त्याच्या चरणीं एकरूप होत असतो. आता कुणालाही वाटेल की भागवत तर काय छापलेलं आहे. ग्रंथ विकत घेतला की भागवत प्राप्त झालंच की! पण तसं नाही. ग्रंथ हाती आला म्हणून त्यातला भाव हृदयाला उमगेलच, असं नाही. त्यासाठी भगवंताशी भावतन्मय होण्याची शुद्ध इच्छा हवी. तरंच अक्षराची टरफलं गळून पडतील आणि अर्थ स्वत:हून प्रकट होऊ लागेल. आता भागवताचं जे ज्ञान आहे, परमात्मशक्तीचं जे ज्ञान आहे म्हणजेच सद्गुरूतत्त्वाचं जे बीजज्ञान आहे ते चार श्लोकांत कल्पाच्या आधीपासून साठवलं होतं. भगवंतानं हा आपला निजात्मबोध मग ब्रह्मदेवाला सांगितला आणि त्या सद्गुरू कृपेनं चराचराचा हा निर्माता नि:संदेह झाला. हा चार श्लोकांचा उपदेश गुरुपरंपरेनं नारदापर्यंत आला. ब्रह्मदेवानं आपल्या मानसपुत्र असलेल्या नारदांना हा उपदेश केला आणि त्यातून नारदही भगवंत प्रेमात बुडून गेले. नाथमहाराज सांगतात, ‘‘तेणें नारदु निवाला। अवघा अर्थमयचि झाला। पूर्ण परमानंदें धाला। नाचों लागला निजबोधें।। १४८।।’’ नारदाच्या मनातली उरलीसुरली दग्धताही निवाली. तो अवघा अर्थमय झाला! याचा अर्थ भगवद्प्रेमाचा अर्थ त्याला असा काही उमगला की जणू त्याचं सर्वाग या अर्थानंच ओतप्रोत भरून गेलं. म्हणजे त्या श्लोकांचा अर्थ त्याच्या देहबोलीतून, जगण्यातून प्रकट होऊ लागला. मग नारदांची भावस्थिती कशी झाली? नाथ त्या भावस्थितीचं मनोरम वर्णन करताना म्हणतात, ‘‘तो ब्रह्मवीणा वाहतु। ब्रह्मपदें गीतीं गातु। तेणें ब्रह्मानंदें नाचतु। विचरे डुल्लतु भूतळीं।। १४९।।’’ ब्रह्मवीणी खांद्यावर घेऊन परब्रह्मरूपी सद्गुरूस अनुलक्षून मधुर भजन गात, ब्रह्मानंदात नाचत नारद भूमंडळी भक्तीप्रेमानं डुलत वावरू लागला. अशावेळी तो सरस्वती नदीच्या तीरावर आला असताना महापुराणांचा रचयिता व्यास त्याच्या दृष्टीस पडला. जगातलं यच्चयावत तत्त्वज्ञान प्रकट करूनही व्यास अतृप्तच होते. याचं एकच कारण नुसत्या ज्ञानानं समाधान नाही. त्या ज्ञानावरही भक्तीची प्रचीती हवी! मग नारदांनी काय केलं? ‘‘तेणें एकांतीं नेऊनि देख। व्यासासि केलें एकमुख। मग दाविले चाऱ्ही श्लोक। भवमोचक निर्दृष्ट।। १५३।।’’ व्यासांना नारदांनी एकांतात नेलं आणि त्यांना एकमुख करून ते भवमोचक असे, सामान्य दृष्टीला न आकळणारा अर्थ प्रकट करणारे चार श्लोक त्यांना ऐकवले! एकांत आणि एकमुख या दोन्ही गोष्टी परम भक्तीज्ञान आकळण्यासाठी आवश्यक आहेत. एकांत म्हणजे जगाची ओढ संपणं आणि एकमुख म्हणजे विखुरलंपण संपणं. नारदांच्या त्या वचनांनी व्यासांचं मन निर्द्वद्व, नि:संशय आणि पूर्ण समाधानी झालं. ‘‘तें नारदाचें वचन। करीत संशयाचें दहन। तंव व्यासासि समाधान। स्वसुखें पूर्ण हों सरलें।। १५५।।’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 1:28 am

Web Title: ekatmyog article number 38
Next Stories
1 ३७. अभेद जाहला अनंतु
2 ३६. आवडी होय भक्तु
3 ३५. अभावो भावेशी गेला
Just Now!
X