चैतन्य प्रेम

दोन माणसं एकमेकांना भेटतात तेव्हा प्रथम थोडय़ा अवांतर गप्पा होतात. त्या गप्पांमध्ये ज्या मूळ विषयावर दोघांना बोलायचं आहे, त्याचं सूत्र असतं, पण तरीही बोलणं बरंचसं अवांतर असतं. अगदी त्याचप्रमाणे एकनाथी भागवताचा पहिला अध्याय हा पृष्ठभूमी मांडणारा होता. त्यात मूळ विषयाचं सुतोवाच होतं, पण विस्तार अर्थातच नव्हता. दुसऱ्या अध्यायात तो सुरू झाला आहे आणि या अध्यायात संपूर्ण एकादश स्कंधाचं सारही सांगितलं आहे. हे सार म्हणजे भक्तीचं महत्त्व आणि रहस्य! ही भक्ती आहे सद्गुरूचरणांची म्हणजेच ज्या मार्गावरून त्यांचे चरण दृढपणे चालतात, त्या मार्गाची ही भक्ती आहे! कुणाला वाटेल की भक्तीचा मार्ग काही आपल्या आवाक्यातला नव्हे. कुणाला ज्ञानाचं प्रेम वाटतं, कुणाला योगमार्गाचं प्रेम वाटतं. पण तरीही त्या त्या मार्गावर भक्ती असल्याशिवाय त्या मार्गानं वाटचाल शक्य तरी आहे का हो? तेव्हा भक्ती हीच खरी आहे आणि आपलं जन्मापासूनचं जीवन तरी काय आहे? भक्तीनंच तर भरलं आहे! मग लहानपणी खेळण्यांची ‘भक्ती’ सुरू होती, सवंगडय़ांची ‘भक्ती’ सुरू होती, मग कधी शालेय अभ्यासाची ‘भक्ती’, कधी खेळांची ‘भक्ती’, मग तारुण्यसुलभ गोष्टींची ‘भक्ती’, देहाची ‘भक्ती’, प्रेमविषयाची ‘भक्ती’, नोकरीची ‘भक्ती’, पगाराची ‘भक्ती’, पगारवाढीची आणि पदाची ‘भक्ती’, घराची आणि भौतिक वस्तूंच्या संग्रहाची ‘भक्ती’.. सगळं जीवन असं अपूर्ण वस्तूंच्या भक्तीनंच तर भरलं आहे. जन्मापासून अपूर्णाची भक्ती करून पूर्ण समाधान मिळवण्याची आपली धडपड अव्याहत सुरू आहे. मग अशा अपूर्णाच्या भक्तीत अडकलेल्या, त्या अपूर्णाच्या प्राप्तीसाठी तळमळणाऱ्या माणसाला अपूर्णाचं अपूर्णत्व जाणवून देणारी आणि खरं समाधान कोणत्या मार्गानं मिळेल, ते दाखवून देणारी खरी पूर्णत्वाची भक्ती का करू नये? त्या भक्तीकडेच आता ‘एकनाथी भागवत’ वळवू पाहात आहे. तो भक्तीविचार आता पाहू.

।। अध्याय दुसरा।।

या अध्यायाची सुरुवात गुरुवंदनेनं आहे. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘जय जय देवाधिदेवा। भोगिसी गुरुत्वें सुहावा। विश्वीं विश्वात्मा ये सद्भावा। तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी।। १।। ते विश्वीं जो विश्ववासी। त्यातें विश्वासी म्हणसी। तेणें विश्वासें प्रसन्न होसी। तैं पायांपाशीं प्रवेशु।। २।। त्या चरणारविंदकृपादृष्टी। अहं सोहं सुटल्या गांठी। एकसरें तुझ्या पोटीं। उठाउठी प्रवेशलों।।३।।’’ हे सद्गुरो तुमचा जयजयकार असो. तुम्ही गुरूरूपानं भक्तीप्रेम भोगत आहात. तुम्ही जेव्हा कृपेनं साधकाकडे पाहाता तेव्हा त्याच्या अंतरंगातच या विश्वातला जो विश्वात्मा आहे, या विश्वाचा उगम-प्रतिपाळ आणि संहार यांचा जो नियंता आहे त्या विश्वात्म्याचं दर्शन घडेल, असा सद्भाव उत्पन्न होतो! या विश्वात वास करून असणारा हा जो विश्ववासी आहे, त्याच्यावर विश्वास ठेव, अशी आज्ञा तू करतोस. तसा विश्वास ज्याचा जडतो त्याच्यावर तू प्रसन्न होतोस आणि मग तुझ्या चरणांच्या मार्गानं तुझ्या अंतरंगातच प्रवेशाचा मार्ग खुला होतो! त्या चरणांच्या कृपाछायेत ‘अहं’ आणि ‘सोहं’च्या गाठी सुटतात आणि थेट तुझ्या अंत:करणातच साधकाला प्रवेश मिळतो. अहंमध्ये ‘मी’ आहेच, पण ‘सोहं’ मध्येही ‘तोच मी,’ असा सुप्त ‘मी’ उरतोच! तेव्हा त्या चरणांशी एकरूपता आली की अहंभावाप्रमाणेच सोहंभावही वेगळेपणानं उरत नाही!