चैतन्य प्रेम

खरा जो सद्गुरू आहे त्याच्या प्राप्तीसाठी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. ती प्राप्ती सोपी मात्र नाही. पण ती झाल्यावरही त्याच्या बोधानुसार वागण्याचं सोडून माणूस त्याच्या आवडीनुसारच्या विविध साधना करीत शिणतो. मग तो त्याच्या कल्पनेनुसारच्या तीर्थयात्रा करील, त्याच्या मनाजोगते उपास-तापास करील, पारायणं करील. नाथ स्पष्टच सांगतात की, सद्गुरूंचे चरण सोडून देवांचा देव जो इंद्र त्याचंही भजन केलंत, तरी काही उपयोग नाही. कारण हे सगळे देव काळाच्याच पकडीत आहेत. त्यांचं भजन करणाऱ्याच्या अंतरंगातलं काळभय ते कुठून घालवणार? आता देवांचं पुण्य क्षीण झालं की त्यांना स्वर्गलोकातून मृत्यूलोकात ढकललं जातं, असं गीताही सांगते. इंद्र आपलं पद कुणी हिरावून घेऊ नये, यासाठी किती धडपडत होता, हे अनेकानेक पुराणकथांमधून दिसतं. तेव्हा देवलोकातली ही पदं आहेत आणि ज्यांचा पुण्यांश त्या तोडीचा आहे त्यांना ती देवपदं मिळतात, हेच सूचित होतं. तेव्हा स्वर्ग मिळाला तरी बंधनातून सुटका नसते, हेच दिसतं. तर मग केवळ सद्गुरूच्या बोधानुसार शाश्वताच्या प्रकाशात का वाट चालू नये? त्यासाठीच नाथांनी श्रीकृष्ण चरणांचा उल्लेख केला आहे. त्या चरणांशी नारद एकनिष्ठ होते. नाथ म्हणतात, ‘‘धन्य धन्य तो नारदु। ज्यासी सर्वी सर्वत्र गोविंदु। सर्वदा हरिनामाचा छंदु। तेणें परमानंदु सदोदित।।३७।।’’ नारदाला सर्वत्र सद्गुरू बोधाचंच दर्शन घडत होतं. त्याच्या अंतर्मनाला हरिनामाचा छंद जडला होता आणि त्यामुळे तो सदोदित परमानंदच अनुभवत होता. असा परमानंदानं व्याप्त सत्पुरुष जो असतो ना, त्याचा संग मिळणं ही फार दुर्लभ गोष्ट असते. अनेकदा त्याचं मोल उमगत नाहीच, पण तो संग मिळूनही आपण आपल्या देहबुद्धीच्या तोऱ्यात या संगापासून वंचित होतो, हेदेखील लक्षात येत नाही. पण ज्याच्या देहबुद्धीचा निरास होत असतो आणि दिव्यभाव जागृत होत असतो त्याला या संगाचं मोल तीव्रतेनं उमगतं. त्यामुळेच परमभावानं ओथंबलेले नारद जेव्हा वसुदेवाकडे गेले तेव्हा आपल्या भाग्यानं तो हरखून गेला. नाथ म्हणतात, ‘‘तो नारदु एके वेळां। स्वानंदाचिया स्वलीळा। आला वसुदेवाचिया राउळा। तेणें देखोनि डोळां हरिखला।। ३९।।’’ मग वसुदेवानं नारदांना साष्टांग नमन केलं. उच्चासन दिलं आणि नाथांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘ब्रह्मसद्भावें’ म्हणजे नारद हे साक्षात परब्रह्मस्वरूप सद्गुरूच आहेत, या भावनेनं त्यांचं पूजन केलं. मग त्याच श्रद्धायुक्त बुद्धीनं त्यांनी नारदांची पाद्यपूजा केली.  मग भावनेनं वसुदेवाचं हृदय उचंबळून आलं. आईनं धाव घेतल्यावर लेकराला जसा आनंद होतो, तसा तुमच्या आगमनानं जनांना आनंद होतो, असं वसुदेव म्हणाले. मग आपल्या रूपकालाही मर्यादा आहे, याची जाणीव होऊन ते म्हणाले, ‘‘माता सुख दे तें नश्वर। तुमच्या आगमनीं अनश्वर। नित्य चित्सुख चिन्मात्र। परात्पर भोगावया।। ४७।।’’ मातेचं सुखसुद्धा काळाच्याच आधीन असतं रे. त्यामुळे ते आज ना उद्या खंडित होतं. पण तुमच्या आगमनानं जे सुख जनांना लाभतं ते अनश्वर असतं. ते नित्य असतं. आणि परेपलीकडील म्हणजे वर्णनातीत असतं! मग नारदांची त्यांनी अनेकानेक रूपकांनी स्तुती केली आणि ती ती रूपकंही खुजी आहेत, हे ही सांगितलं. मग नारदांच्या सर्वसंचारीपणाचंही त्यांनी भारावून वर्णन केलं. तो गुणस्वभाव आहे म्हणूनच तर त्यांची आपली गाठभेट आहे!