19 October 2019

News Flash

७. द्वैत कवटाळून अद्वैत!

परमतत्त्वाशी ऐक्य साधायची इच्छा असेल, तर आधी विखुरलेल्या जगाशी जोडून घेत राहण्याची निष्फळ धडपड थांबवावी लागेल.

चैतन्य प्रेम

परमतत्त्वाशी ऐक्य साधायची इच्छा असेल, तर आधी विखुरलेल्या जगाशी जोडून घेत राहण्याची निष्फळ धडपड थांबवावी लागेल. द्वैताला कवटाळून अद्वैताची प्राप्ती अशक्य आहे. पण द्वैतात राहून अद्वैताची प्राप्ती शक्य आहे! एकानं मोठा भक्तीचा आव आणत एका सत्पुरुषाला विचारलं की, ‘‘गोपींसारखी भक्ती आम्हाला कधी साध्य होईल?’’ नुसता प्रश्नच तर विचारायचाय! त्या स्थितीची खरी इच्छा थोडीच आहे! मीही एकदा गुरुजींना विचारलं होतं की, ‘‘मी आणि माझे कधी नष्ट होईल?’’ गुरुजींनी ताडकन विचारलं, ‘‘तशी खरी इच्छा आहे? इच्छा खरी असेल, तर ते या क्षणी नष्ट होईल!’’ तर असाच हा प्रश्न, गोपींसारखी अनन्य भक्ती कधी प्राप्त होईल? या प्रश्नावरचं उत्तर थोडं किळसवाणं वाटेल, पण त्याइतकं चपखल उत्तरच नाही. तर त्या सत्पुरुषानं ताडकन् सांगितलं, ‘‘हागूनं भरलंय ते आधी धू!’’ म्हणजे काय? तर भौतिकाचं सुख अपचन होईल इतकं ओरबाडलंय आणि ते पचलं नसतानाच आणखी आणखी ‘सुख’ ओरबाडून भोगण्याची लालसा कणमात्र कमी झालेली नाही आणि ही स्थिती कायम राखून गोपींसारखी भक्तीही करायची आहे! ‘काय गुणदोष पाहू आणिकांचे,’ या तुकाराम महाराजांच्या वचनाचं स्मरण ठेवलं तर लक्षात येईल आपली स्थितीही काही वेगळी नाही. अत्यंत तुच्छात तुच्छ अशा गोष्टींचीही आसक्ती सुटलेली नाही, लहानसहान गोष्टींत मनाचं अडकणं थांबलेलं नाही, पैशाचं प्रेम, लोकांकडून स्तुती करवून घेण्याचं प्रेम, मुलाबाळांवरचं आसक्तभावयुक्त प्रेम जराही आटलेलं नाही आणि त्याचवेळी सद्गुरूंशी ऐक्यताही हवी आहे! सद्गुरूंची माझ्यावर कृपा आहे, याची प्रचीती, काहीतरी खूण हवी आहे! त्यांचं दर्शन आणि साक्षात्कार हवा आहे!! तेव्हा खऱ्या अद्वैतभावात लय पावायची इच्छा असेल, तर द्वैतभावात वाहवत जाण्याची आवड तपासावी लागेल. तुकाराम महाराजांनीही सांगितलंय की, एक मन तुझं भांडवल आहे, त्याची विभागणी नाही होऊ शकत! ते मन दुनियेतही गुंतून राहील आणि देवातही गुंतून राहील, असं नाही होऊ शकत. कारण देवात गुंतण्याचं केवळ ढोंग वठवलं जाईल, पण त्या क्षणीही दुनियेतलं गुंतणंच कायम असेल. तेव्हा मन हे जर भांडवल असेल, तर ते देह आणि देव या दोन्हींमध्ये एकाचवेळी गुंतवता येणार नाही. तसं ते गुंतवलं तर त्यानं काहीच साधणार नाही. तेव्हा या मनरूपी भांडवलाकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. कारण हे मनच ज्या ताकदीनं मायामोहात गुंतवून बुडवू शकतं तेच मन त्याच ताकदीनं त्या मायामोहापलीकडे जाण्याच्या प्रयत्नांसाठी साह्य़भूतही होऊ शकतं. हे मनच अनेक विकल्प आणून वाटचालीत अडथळे आणू शकतं, तर हेच मन दृढ संकल्पानं ती वाटचाल निर्धारानं करायला बळही देऊ शकतं. फक्त ते बळ जागृत करण्यासाठी मनातल्या आवेगांना आवरावं लागतं आणि ते आवरण्यासाठी सद्गुरू बोधाचाच आधार अनिवार्य असतो. दशेंद्रियांनंतरचं अकरावं इंद्रिय आहे मन. हेच मन अनेक ठिकाणी भटकंती करवून आपली दयनीय दशा करू शकतं आणि हेच मन एकाच सद्गुरूशी अनन्य होऊन एकादशेत स्थिर होऊ शकतं! त्या मनावर या ऐक्यतेचा संस्कार करण्यासाठी, त्याला एका दशेत स्थित करून खरी एकादशी साजरी करण्यासाठी जो बोध आहे तोच ‘एकनाथी भागवत’! ज्या एकाचा नाथ एकच आहे तोच केवळ या ऐक्यतेची महती गाऊ शकतो आणि बिंबवू शकतो! नाही का?

First Published on January 9, 2019 1:51 am

Web Title: ekatmyog article number 7