News Flash

८५. दीप-पतंग

एखाद्या सत्पुरुषाचा संग निमिषार्धभरासाठी जरी मिळाला, तरी भवदु:खाचा निरास होण्याची प्रक्रिया सुरू होते, असं जनक राजानं सांगितलं.

 चैतन्य प्रेम

एखाद्या सत्पुरुषाचा संग निमिषार्धभरासाठी जरी मिळाला, तरी भवदु:खाचा निरास होण्याची प्रक्रिया सुरू होते, असं जनक राजानं सांगितलं. पण हा सत्पुरुषही खरा पाहिजे, त्याचा संगही खरा पाहिजे आणि त्या संगाचा खरा लाभ घेण्याची खरी कळकळही पाहिजे! बरेचदा असा सत्संग लाभूनही आपण देहबुद्धीच्या केंद्रबिंदूनुसार अशाश्वत अशा इच्छा-अपेक्षांचा जो परीघ आखला असतो, त्या परीघातच भिरभिरत राहतो आणि मग आपले तळमळीचे प्रश्नही ईश्वराला नव्हे, तर त्या नश्वरालाच चिकटून असतात. राजानं मात्र खरा प्रश्न विचारला की ज्याचा लाभ अनंत पिढय़ांना होणार होता. राजा म्हणाला की, भागवत धर्म हाच आत्यंतिक क्षेमाचा आधार असेल, तर त्या धर्माचं आचरण कसं करावं, हे सांगा (आत्यंतिक क्षेमाचें वर्म। जरी म्हणाल भागवतधर्म। त्या धर्माचा अनुक्रम। साङ्ग सुगम सांगा जी।। २६५।। ). हा प्रश्न करताना जनकराजानं असीम अशा विनयशीलतेचंही दर्शन घडवलं. तो म्हणाला, भागवतधर्म ऐकायचा माझा जर अधिकार असेल, तर कृपा करून मला तो सांगा! म्हणजे आग्रह नाही. कारण तो धर्म जाणण्याची पात्रताच नसेल, तर नुसता विकल्प निर्माण होऊन काय उपयोग? तेव्हा जर माझी ती पात्रता आहे, असं वाटत असेल तर हे करुणामूर्ती, मला तो धर्म सांगा, अशी राजाची विनवणी आहे. नारद वसुदेवाला सांगतात की, जनक राजाच्या या सरळसाध्या स्वभावानं नऊहीजण संतुष्ट झाले आणि राजाला म्हणाले की, हे राजा तुला जे काही विचारायची इच्छा आहे ते विचार! मग राजानं एकूण नऊ प्रश्न विचारले. हे प्रश्न असे : भागवतधर्म कसा आहे, भगवंताचे भक्त कसे असतात, माया कसा खेळ करते, त्या मायेतून अज्ञ जनांचा कसा तरणोपाय होतो, परब्रह्म कसे आहे, कर्म कशाला म्हणावं, अवतारचरित्रांची संख्या किती, अभक्तांना अधोगती का प्राप्त होते, कोणत्या युगाचा कोणता धर्म आहे; असे ते नऊ प्रश्न होते. (भागवतधर्म, भगवद्भक्त। माया कैसी असे नांदत। तिचा तरणोपाव येथ। केवीं पावत अज्ञानी।।२८०।। येथ कैसें असे परब्रह्म। कासया नांव म्हणिजे कर्म। अवतारचरित्रसंख्या परम। अभक्तां अधमगति कैशी।। २८१।। कोणे युगीं कैसा धर्म। सांगावा जी उत्तमोत्तम। ऐसे नव प्रश्न परम। जनक सवर्म पुसेल।।२८२।।). या नऊ प्रश्नांची त्या नवांनी अनुक्रमे उत्तरं दिली आणि जनकाचे नऊ प्रश्न हा या कथेचा मुख्य विषय आहे कारण या प्रश्नांच्या उत्तरातूनच भागवद्धर्म आणि भक्तीचं विराट दर्शन घडत आहे. राजानं आत्यंतिक क्षेम कशात आहे, असं विचारलं होतं आणि भागवत धर्म हेच त्याचं उत्तर असेल तर त्या धर्माचं विवेचन करावं, असं विनवलं होतं. या विषयात पारंगत असलेला कवि त्याचं उत्तर देऊ लागला. या उत्तरात सामान्य माणसाच्या जगण्याची रीत मांडली आहे आणि या जीवनपद्धतीतच दु:खाचं मूळ आहे, याकडे लक्ष वेधलं आहे. माणूस देहबुद्धीनं जगत असतो आणि ही देहबुद्धी मनाला सदोदित नश्वर अशा वैषयिक ओढींकडेच खेचत नेत असते. त्यातून माणूस त्या ओढींचाच गुलाम होतो आणि त्या ओढीनुसार जगू लागतो. त्यातील अनेक ओढी अवास्तविक असतात. त्यापायी माणसाच्या मनावर आघात होतात आणि त्या आघातांच्या ज्वालेमध्ये त्याच्यातली सकारात्मकता खाक होते! नाथ सांगतात, ‘‘दीपाचे मिळणीपाशीं। केवळ दु:ख पतंगासी!!’’ दीपावर झडप घालणाऱ्या पतंगाच्या वाटय़ाला निव्वळ दु:खच दु:ख येतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 12:03 am

Web Title: ekatmyog article number 85
Next Stories
1 ८४. भवनिरास
2 ८३. नाम-धेनु!
3 ८२. अमृत आणि मृगजळ
Just Now!
X