चैतन्य प्रेम

पेटत्या दिव्यावर पतंग आकर्षित होऊन झडप घालतो आणि स्वत:च जळून खाक होतो. त्याचप्रमाणे देहबुद्धीनं अशाश्वतासाठी माणूस स्वत:ला झोकून देतो आणि मनुष्यजन्माच्या खऱ्या परमलाभापासून वंचित राहतो. स्वाभाविकपणे आपल्या मनात येईल की, देहाशिवाय माणूस जगू शकत नाही हे जर खरं आहे, तर मग त्या देहाला चिकटलेली बुद्धी तिरस्करणीय का? तर देहाशिवाय या जगात वावरता येत नाही, हे खरंच. इतकंच कशाला, त्या देहाशिवाय साधनाही करता येत नाही. तेव्हा हा देह जगण्यासाठी आणि साधनेसाठी महत्त्वाचाच आहे. त्यामुळे त्याची योग्य ती निगा राखली पाहिजे. त्याच्या आवश्यक गरजांची यथायोग्य पूर्तीही केली पाहिजे. पण हा देह म्हणजे एक संधी आहे. त्या देहाच्या माध्यमातून खरं हित साधण्याकडे सर्वाधिक लक्ष असलं पाहिजे. देहबुद्धी ही अशाश्वत गोष्टींमध्ये शाश्वत सुख लाभेल या कल्पनेनं गुंतत जाते आणि त्यायोगे आयुष्य वाया घालवते. त्यामुळे या देहबुद्धीवर संत टीका करतात. त्या टीकेनं अधेमधे का होईना माणूस थोडा जागा होतो आणि जगण्याच्या आपल्या रीतीबद्दल विचार करू लागतो. कवि सांगू लागला की, ‘‘ऐक राजा नवलपरी। आपुला संकल्प आपणा वैरी। देहबुद्धी वाढवूनि शरीरीं। अतिदृढ करी भवभया।। २८५।।’’ हे राजा, आपला संकल्पच आपला वैरी आहे. तो आपल्यात देहबुद्धी वाढवून संसारभय अधिकच दृढ करीत असतो. आता हा संकल्प कोणता आहे? तर आपण सुखी व्हावं, हा तो आदिम संकल्प आहे. माणसाचं सगळं आयुष्य हे सुखाच्याच शोधासाठी, जे सुखाचं वाटतं ते मिळवण्यासाठी, जे सुखाचं वाटतं ते टिकवण्यासाठीच सरत असतं. एवढं होऊनही कायमचं सुख काही लाभत नाही. सुख-दु:खाचा पाठशिवणीचा खेळ काही संपत नाही. ‘सुख मिळावं,’ या एकाच संकल्पातून दु:खाच्या अनेक शक्यताही निर्माण होत असतात. मग जे सुखाचं वाटतं ते मिळेल ना, जे सुखकारक मिळालं आहे ते सुख टिकेल ना, अशी भीतीही सावलीसारखी सोबत असते. मग कधी ती तीव्रपणे जाणवते, तर कधी ती सुप्तपणे वावरते. सुखसंकल्प आयुष्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्यातूनच पुन्हा जन्माचं बीज रोवलं जातं. मग या देहबुद्धीच्या जाळ्यातून सुटायचं असेल, तर काय करावं? कुणी सांगतं इंद्रियांच्या ओढीचं दमन करा, कुणी सांगतं विषयांचा पूर्ण त्याग करा! पण नवनारायणातील कवि म्हणतो, ‘‘इंद्रियें कोंडितां न कोंडती। विषय सांडिता न सांडती। पुढतपुढती बाधूं येती। यालागीं हरिभक्ती द्योतिली वेदें।। २९४।।’’ अहो इंद्रियं कोंडता येत नाहीत की विषय सांडता येत नाहीत. इंद्रियांच्या ज्या ज्या ओढी आहेत त्यांना नियमांचा बांध घालून त्या ओढी दडपून टाकू, असं कुणाला वाटत असेल, तर त्यात काही अर्थ नाही. कारण इंद्रियं मग अधिकच प्रबळतेनं विषयांच्या ओढी उत्पन्न करू लागतात. विषयांचा त्यागही शक्य नाही. कारण विषयांशी असलेली एकरूपता इतकी खोलवर असते की वरकरणी विषय सोडल्याचं दाखवलं किंवा आपणही मानलं तरी विषयांची सुप्त ओढ अगदी क्षीणपणानं अंग चोरून लपून असते. ती कधी उफाळून येईल, ते सांगता येत नाही. तेव्हा हे दोन्ही उपाय चुकीचे आहेत, देहधर्माच्याही विपरीत आहेत आणि उलट मानसिक संघर्ष वाढवून आंतरिक बळ क्षीण करणारे आहेत. त्यामुळेच नकारात्मकतेचा हा मार्ग त्यागून सकारात्मकतेकडे कवि वळवत आहे.