चैतन्य प्रेम

काया, वाचा, मन आणि इंद्रियांद्वारे माझ्याकडून जे जे काही कर्म घडत आहे, ते ते तुला अर्पण असो, या भावनेचं स्मरण नाथ देत आहेत. मग कुणाच्या मनात प्रश्न येईल की, हे नुसतं म्हणणं सोपं आहे हो. किंवा म्हणण्यापर्यंत ठीक आहे, पण आपण कित्येक र्कम बरीवाईटही करतोच. मग ती कशी काय कृष्णार्पण करायची? तर इथं एक मेख आहे. रामदासांचा तो श्लोक आहे ना? की उठता, बसता, धंदा करता, चालताना, फिरताना, खाताना, पिताना काहीही करताना नाम घ्यावं! त्याचा आशयही हाच आहे की हे सर्व सोडून नाम घ्या म्हटलं तर कुणीही नामाकडे वळणारच नाही. तेव्हा बाबांनो, तुम्ही जसे जगत आहात त्यात काहीही बदल करू नका, पण एकीकडे नाम घ्या, असं सांगितलं तर कुणी ऐकतील तरी आणि त्यातले कुणी तसं नाम घ्यायचा प्रयत्न करतील तरी! आणि जेव्हा हे सारं काही करताना नामाची जोड दिली गेली, तर मग या सर्व क्रियांमधील फापटपसारा आपोआप कमी होऊ लागेल! म्हणजे उगाचंचं चालणं-बोलणं, खाणं-पिणं हे सारं कमी होत जाईल. नामच काय योग्य आणि काय अयोग्य, काय करावं आणि काय टाळावं, याची तीव्र जाणीव अंतर्मनातून करून देऊ लागेल. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म जर भगवंताला अर्पण करायचं असेल, तर हळूहळू अनावश्यक, अशाश्वतात गुंतवणारी, अशाश्वताची ओढ वाढवणारी, अहितकारक र्कम आपोआप कमी होऊ लागतील! मग जनकराजाला कवि नारायण सांगतात की, ‘‘दारा सुत गृह प्राण। करावे भगवंतासी अर्पण। हे भागवतधर्म पूर्ण। मुख्यत्वें ‘भजन’ या नांव।।२९९।।’’ हे राजा! घरदार, बायकोमुले आणि इतकंच कशाला प्राणसुद्धा भगवंताला अर्पण करावेत, हाच खरा पूर्ण ‘भागवतधर्म’ आहे आणि हेच खरं ‘मुख्य भजन’ आहे.. यालाच खरं भजन म्हणतात! ‘भाविदडी’त नवविधाभक्ती विशद करताना भजनभक्तीचा आधार हाच श्लोक होता! किती व्यापक भजन आहे हे. पण त्याचा रोख आणि अर्थ जर नीट लक्षात आला नाही आणि घरदार, बायकापोरं यांचा त्यागच सांगितला आहे, असं मानलं तर ते मुख्य भजन न होता मूर्खाचं भजन होईल! त्यागणं वेगळं आणि अर्पण करणं वेगळं. त्यागात ‘मी’ त्याग केलाय, हा अहंभावही सुप्तपणे असतोच. माणूस कसला त्याग करू शकणार? प्रारब्धानुसार जे वाटय़ाला आलं आहे आणि प्रारब्धानुसार जी कर्तव्यंर्कम अटळ आहेत त्यांना सामोरं जाण्यातच हित आहे. उलट ती कर्तव्यंर्कम अचूकपणे आणि योग्य तऱ्हेने केली तर गुंता निर्माण होत नाही आणि वेळ आणि शक्तीही वाचते. तर मग, घरदार, बायकामुलं एवढंच नाही तर प्राणही भगवंताला अर्पण करायचे, म्हणजे काय करायचं? तर त्यांच्यावरची जी आसक्ती आहे, त्यांची जी आसक्तीयुक्त काळजी आहे ती भगवंताला देऊन टाकायची आणि त्यांच्याप्रतीची आपल्या वाटय़ाला आलेली कर्तव्यं तेवढी योग्यपणे पार पाडायची, हेच खरं मुख्य भजन आहे! ‘मी’ आणि ‘माझे’ची संपूर्ण काळजी भगवंताला देता आली, तर काळीजही त्यालाच देता येईल! मन, चित्त, बुद्धी त्याच्यात रममाण झालं तर मनाचं अमन आणि मग सुमन होईल, चित्ताचं सुचित्त होईल, बुद्धीची सुबुद्धी होईल. मग अनवधान संपून अवधान येईल. अवधानपूर्वक जगणं सुरू झालं की आपल्याकडून होणाऱ्या चुका, गैरवर्तणूक कमी होत जाईल. त्यानं मनावरचं ओझं आपोआप कमी होऊन भक्तीसाठी चित्तवृत्ती एकाग्र होऊ लागेल.