चैतन्य प्रेम

आपला प्रपंच मनानं भगवंताला अर्पित करून देहानं कर्तव्यकर्म करीत राहणं, हे मुख्य भजन आहे. त्याचबरोबर इंद्रियविषयांची जी ओढ आहे ती हळूहळू भक्तीकडे कशी वळवता येईल? जनकराजाला कवि सांगतो, ‘‘अकराही इंद्रियवृत्ती। कैशा लावाव्या भगवद्भक्ती। ऐक राया तुजप्रती। संक्षेपस्थिती सांगेन।। ३००।। ‘मनें’ करावें हरीचें ध्यान। ‘श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण। ‘जिव्हेनें’ करावें नामस्मरण। हरिकीर्तन अहर्निशीं।। ३०१।। ‘करीं’ करावें हरिपूजन। ‘चरणीं’ देवालयगमन। ‘घ्राणीं’ तुलसीआमोदग्रहण।जिंहीं हरिचरण पूजिले।।३०२।।’’ इंद्रियवृत्ती म्हणजे त्या त्या इंद्रियांनुसार मनात जे वासनातरंग उमटतात, जी ओढ निर्माण होते ती भगवंताच्या भक्तीकडे कशी वळवता येते, ते सांगत आहेत. त्यानुसार मनानं हरीचं ध्यान करावं, कानांनी त्या भगवंताच्या कीर्तीचं श्रवण करावं, जिव्हेनं हरीचं नामस्मरण करावं आणि दिवसरात्र त्याच्या कीर्तनात दंग व्हावं, हातानं हरीचं पूजन करावं, चरणांनी भगवंताच्या देवालयाची यात्रा करावी, नाकानं तुलसीपत्राचा गंध ग्रहण करावा. आताचा काळ पाहिला, तर कुणालाही वाटेल की बाह्य़ाकडे मन घरंगळत जाईल इतकी अनंत व्यवधानं असताना हा उपाय कितपत प्रभावी ठरेल? तर इथं हा उपाय संकेतार्थानं अधिक लक्षात घ्यायचा आहे. हा संकेत म्हणजे जर अंतर्मुख व्हायचं असेल, तर बहिर्मुखता थोपवावीच लागेल, हा आहे! आणि ही बहिर्मुखता ज्या ज्या गोष्टींनी निर्माण होते, वाढते, आपल्याला अडकवते त्या त्या गोष्टी कठोरपणे टाळाव्याच लागतात. आध्यात्मिक साधनाच कशाला, दैनंदिन व्यावहारिक जीवनातही आपण याच नियमाचं पालन करतोच ना? घरात समजा मुलाची किंवा मुलीची दहावी-बारावीची परीक्षा असेल, तर मग त्यात वर्षभर किती बदल केले जातात. म्हणजे घरातलं दूरचित्रवाहिन्या पाहण्याचं प्रमाण अगदी कमी केलं जातं, शक्यतो पाहुण्यारावण्यांनी येऊ नये, अशी काळजी घेतली जाते, अवांतर वेळ जाणार नाही, याची काळजी घेतली जाते, जास्तीत जास्त अभ्यासावर भर असतो, मनातल्या मनात त्याची उजळणी करवून घेतली जाते.. तेव्हा एखाद्या परीक्षेसाठी जर आपण बहिर्मुखता थोपवण्यासाठी आटापिटा करतो, तर मग आध्यात्मिक वाटचालीसाठी ती थोपवणं का महत्त्वाचं नाही? अर्थातच आहे. मग ती कशी थोपवायची? तर अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या गोष्टी मनावरच अवलंबून असतात. त्यामुळे पहिला स्पर्श त्या मनालाच केला आहे. जे मन अहर्निश प्रपंचविचारातच बुडालं असतं, त्या मनाला त्या विचारांपलीकडे नेण्यासाठी हरीचं ध्यान करायला सांगितलं आहे. ध्यान म्हणजे ध्यास. आजवर प्रपंचाचा ध्यास खोलवर होता आणि त्यामुळे प्रपंचाचंच ध्यान सदोदित होतं. त्या जागी आता भगवंताचं ध्यान करायला सद्गुरू सांगतात. अनन्य भक्ताला मात्र सद्गुरूंचंच ध्यान होऊ लागतं. देहात असलेल्या, पण देहभयाचा लवलेश नसलेल्या सद्गुरूंचा आधार हा निश्चित मनात खोलवर ठसणारा असू शकतो. त्यामुळे त्याच्या मनात सद्गुरूंचंच रूप येऊ लागतं. त्यांचंच मधुर, पण सत्यस्पर्शी बोलणं आठवू लागतं. निर्भय नि:संग निरपेक्ष निर्लेप सद्गुरूंचं जेव्हा मनानं निरंतर ध्यान होऊ लागतं तेव्हा आपल्या मनातलं भय, भौतिक जखडण, अपेक्षांचं ओझं आणि मुखवटे सगळं गळून पडू लागतं. कुचकामी होत जातं.