चैतन्य प्रेम

जडभरतामुळे आपली चाल चुकत आहे, असं राजसेवकांना वाटत होतं. आत्मज्ञानी पुरुषाची चाल आणि भौतिकात जखडलेल्या जिवांची चाल, यात फरक असायचाच! आणि सत्पुरुषामुळे आपली भौतिकाकडे असलेली चालही बिघडते, असंही अनेकांना वाटतंच! राजानं एकदा रागानं जडभरताकडे पाहिलं आणि उपहासानं त्याला काही टोमणेही मारले. त्याचा आशय असा होता की, खाऊनपिऊन तुझा देह इतका स्थूल झालाय तरी तुला धड पालखीचं ओझं उचलता येत नाही! नंतर पुन्हा एकदा पालखी हिंदूकळू लागली तसा राजाचा क्रोध अनावर झाला. त्यानं पालखीबाहेर नजर टाकली आणि जडभरताला रागाच्या भरात तो बोलू लागला. राजा म्हणाला, ‘‘अरे तू जिवंत असूनही मेल्यासारखा का वावरतो आहेस? मी तुला नीट चालायला सांगितलं तरी तू तसं करीत नाहीस. तुला मी सांगूनही तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करीत आहेस. याचा अर्थ तुला प्रमाद करण्याचीच सवय आहे. जिवांना यमराज जसा दंडीत करतो तसंच तुझ्याशी वागायला हवं. त्याशिवाय तू वठणीवर येणार नाहीस!’’ जडभरताचा चेहरा तरीही निर्विकार, निश्चल होता. पण यावेळी आयुष्यात प्रथमच त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. ते शब्द म्हणजे जणू आत्मज्ञानाचं व्यक्तरूपच होतं. जडभरत उद्गारला, ‘‘हे राजा!  ओझं म्हणून काही असेलच, तर जो ते वाहतो त्याच्यापुरतंच ते खरं आहे. जर काही रस्ता असेल, तर तो चालणाऱ्यापुरताच अस्तित्वात आहे. स्थूलपणा, कृशपणा, आधि-व्याधि, भूक, तहान, भीती, कलह, इच्छा, क्रोध, अहंकार आणि शोक हे सर्व मनोधर्म देहबुद्धीतूनच उत्पन्न होणारे आहेत.  माझ्यात ते लेशमात्रही नाहीत. राजन, तू जन्म आणि मृत्यूचा उल्लेख केलास, तर या दृश्य जगातील यच्चयावत वस्तूमात्रांना या दोन्ही गोष्टी म्हणजेच आदि आणि अंत, लागू आहेत. हे राजन, जिथे स्वामी आणि सेवक भाव स्थिर असतो तिथंच आज्ञापालनाचा नियम लागू होतो. ‘मी राजा आहे आणि तुम्ही प्रजा आहात,’ ही भेदबुद्धी व्यवहारापुरतीच खरी आहे. पारमार्थिकदृष्टय़ा पाहता कोण स्वामी आणि कोण सेवक? कोण राजा आणि कोण प्रजा? तरीही हे राजन, तुम्हाला तुमच्या स्वामीपणाचा अहंकार असेल, तर सांगा मी तुमची काय सेवा करू?’’ जडभरताच्या सहजज्ञानानं राजा रहूगण अंतर्मुख झाला. आजवर अनेक सत्पुरुषांच्या सत्संगाचा योग त्यानं साधला होता आणि म्हणूनच जडभरत हा असामान्य कोटीचा साक्षात्कारी विद्वान आहे, याबाबत त्याच्या मनात शंका उरली नाही. त्यानं पालखी खाली उतरवायला सांगितलं आणि जडभरताच्या पायावर लोटांगण घातलं. तरीही त्याच्या मनाची तृप्ती काही झाली नव्हती. ज्याला ज्ञान ऐकण्याची गोडी असते त्याला  ज्ञानाच्या कितीही गोष्टी ऐकल्या तरी समाधान वाटत नाही. मात्र ज्ञानाची गोडी ज्यांना वाटते ते नकळत निव्वळ बौद्धिक मनोरंजनात अडकण्याचाही धोका असतो. पण जेव्हा आत्मज्ञानी साक्षात्कारी विभूतीच्या मुखातून ज्ञान प्रकट होतं तेव्हा ते थेट हृदयाला जाऊन भिडतं. आपल्या जगण्याच्या रीतीबद्दल विचार करायला ते भाग पाडतं. आपल्या जगण्याचे हेतू तपासायला लावतं. आपल्यातल्या उणिवा, दोष, चुका लक्षात आणून देतं. जडभरताच्या शब्दांनी राजाचं अंतर्मनही असंच जागृत झालं होतं आणि म्हणूनच त्यानं जडभरताला नम्रतापूर्वक विनवणी केली की, ‘‘हे दयानिधे! मला आत्मज्ञान कसं होईल?’’