News Flash

२२६. प्रश्न-जाल

बाबा बेलसरे सांगतात त्याप्रमाणे, ‘‘परमात्म स्वरूप हे अखंड स्फुरणारे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बाबा बेलसरे सांगतात त्याप्रमाणे, ‘‘परमात्म स्वरूप हे अखंड स्फुरणारे आहे. त्या स्फुरणाच्या पोटी स्वत:मध्ये स्वत:ला दुसरेपणाने ते बघू लागते. हे दुसरेपण शक्तिरूप असल्याने मूळचे परमात्म स्वरूप ईश्वर आणि माया किंवा शिव आणि शक्ति अशा अद्वैतमय द्वैताने प्रकट होते. आपण आपलेच तोंड आरशात पाहून प्रसन्न व्हावे तसे परमात्मा मायेमध्ये आपले स्वरूप पाहून आनंदाने बेहोष होतो. या आनंदाचा अमर्याद विलास म्हणजे हा सृष्टीचा खेळ होय. तो अनंतरूपाने अनंतकाल चालण्यास मूळ शक्तीला अधिकाधिक दृश्य रूप धारण करावे लागते. किंबहुना अव्यक्तांतून अनंत व्यक्त रूपे निर्माण करणे आणि कालांतराने ती सर्व रूपे पुन्हा अव्यक्तांत आवरून नाहीशी करणे हाच खरा सृष्टीचा खेळ होय.. ज्या शक्तीने हा अचाट व्यवहार युगानुयुगे चालतो तिला भगवंताची माया असे म्हणतात.’’ याचाच अर्थ असा की अव्यक्त भगवंत हा सत्यस्वरूप आहे, त्याची शक्तीही त्याच सत्यस्वरूपाची शक्ती आहे, पण त्या शक्तीच्या जोरावर जे व्यक्त जग दृश्यमान होतं ते सतत बदलणारं, सततच्या घडामोडींनी पालटणारं आणि म्हणूनच अस्थिर, अशाश्वत, खंडित भासणारं आहे. प्रत्यक्षात मात्र त्याचा मूळ आधार जो परमात्मा तो स्थिर, शाश्वत, अचल आणि अक्षय आहे. आपल्या मनात अनेक प्रश्न घोंगावू लागतात. त्यातला सर्वात मुख्य प्रश्न असतो तो हा की, हे जग जर मिथ्या आहे, तर ते भगवंतानं उत्पन्नच का केलं? मला असं वाटतं की, आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायला लागतो तेव्हा सर्वप्रथम जे सोपे प्रश्न आहेत, आपल्या आवाक्यातले प्रश्न जे आहेत ते सोडवतो. अवघड प्रश्न पर्यायी म्हणून बाजूला ठेवतो. तसा हा प्रश्न बाजूला टाकला पाहिजे! याचं कारण या शाब्दिक प्रश्नाचं शाब्दिक उत्तर जरी गवसलं, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. कारण ते उत्तर मिळाल्यानं मनातलं जग-प्रभाव मावळणार नाही. दुसरं उदाहरण घ्या. एखादा फलंदाज बॅट सरसावून उभा आहे आणि गोलंदाज चेंडू टाकण्याच्या तयारीत आहे. तोच फलंदाज जर बॅट बाजूला टाकून असा विचार करू लागला, की मुळात क्रिकेटचा खेळ जन्मालाच का आला, तर काही उपयोग आहे का? त्याचं प्रमुख कर्तव्य हे उत्तम निर्दोष आणि अचूक खेळणं हे आहे! अगदी त्याचप्रमाणे मुळात ही सृष्टीच उत्पन्न का झाली, जगात दु:खच का निर्माण झालं, या प्रश्नांशी अडखळून थबकण्याऐवजी जीवनाच्या परीक्षेला सकारात्मक वृत्तीनं सामोरं जाणं, निर्दोष आणि अचूक जगण्याचा अभ्यास करणं, हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. आणखी एक प्रश्न असा की भगवंत हा जर आनंदरूप आहे, तर त्यानं निर्माण केलेलं जग सुख-दु:ख मिश्रित का?

याचं उत्तर अनेक अंगांनी देता येईल. एक म्हणजे भगवंत आनंदरूप आहे तसंच हे जगही आनंदरूपच आहे, पण जो भगवंतापासून विभक्त आहे त्याला हे जग कधी सुखमय, तर कधी दु:खमय भासतं! जो भगवंतमय झाला त्याच्या दृष्टीनं जगही भगवंतमय आणि म्हणूनच आनंदमयच असतं. आज आपली ती स्थिती नाही आणि म्हणूनच जग द्वंद्वमय भासतं. कुणी म्हणेल, हे फसवं उत्तर आहे. या जगात एवढा अनाचार, भ्रष्टाचार सुरू आहे, दहशतवादाचा उन्माद आहे, गरिबी आणि रोगराईसारखे ज्वलंत प्रश्नही आहेत. त्या सगळ्याचं मूळ काय ‘भगवंतमय’ स्थिती नसल्यात आहे काय? तसं मानणं हे वैचारिक क्रौर्यच नाही का? – चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:13 am

Web Title: integration article prashn jal akp 94
Next Stories
1 २२५. माया-विस्तार
2 २२४. माया-रहस्य
3 २२३. मायेचा पाया
Just Now!
X