चैतन्य प्रेम

कर्मसंस्कार चित्तात साठू नये यासाठी स्वामी नित्यबोधानंद तीर्थ व्यवहारशुद्धी पाळायला सांगत. ती अशी की, ‘‘कर्म करीत असताना मी ते करीत नसून, गुरूशक्तीच ते करीत आहे, असे समजून कर्म करावे. कर्म माझे नाही तर भगवंताचे, गुरूंचे आहे, असे समजून ते करावे. मग कर्मच जर माझे नाही तर कर्माचे फलही माझे नाही. ते जेवढे, जसे मिळेल तसे असो किंवा न देखील मिळो; तरी

कर्म त्यांचे असल्याने अधिक चांगल्या रीतीने करायचे. यालाच निष्काम, फलाशारहित कर्म करणे म्हणतात. अशा कर्माचे संस्कार चित्तात संचित होत नाहीत.’’

मग काहींच्या मनात प्रश्न येतो की, ‘काही वेळेला काही कारणाने सत्कर्मात न बसणारी कर्मे हातून होतात. अजाणतेपणी नव्हे, हे करायला नको, याची जाणीव असूनही. त्या वेळी काय करायचं?’ याचं उत्तर असं की, म्हणूनच तर प्रत्येक कर्म भगवंताचं समजून करण्याची सवय झाली तर मनाच्या ओढीनं घडणारी र्कम उघड होतील! अनेक र्कम अनंत जन्मांच्या संस्कारांनी, प्रारब्धानं हातून होतात. मनाच्या ओढीतून ती घडतात कारण मन हे प्रारब्धाच्या हातातलं बाहुलं आहे. मन तेच घडवू पाहातं, त्याचीच आस लावू पाहातं जे प्रारब्धाला हवं आहे! ज्यायोगे प्रारब्धाचा पाश बळकटच होईल.

म्हणून सद्गुरू आज्ञेच्या पालनाचा काटेकोर अभ्यास हवा. मनात येताच आपण एखादं कर्म करून टाकतो त्या क्षणी थोडं थांबून पाहावं. मनाचा आवेग या ‘वेग नियंत्रका’मुळे कधी कधी कमी होईल आणि अशी कर्मे होण्याचे प्रमाणही कमी होऊ लागेल.

बहुतांश वेळा असंही जाणवतं की, आपण मायासक्त होऊन अयोग्य कर्म करीत आहोत, याची जाणीव होऊनही मनाला आवर घालता येत नाही. अशा वेळी मनाला कसं आवरावं? खरं पाहता उपजीविकेचे म्हणजे नोकरी वगैरेचे प्रयत्न वगळले तर आपली बहुतांश सगळी र्कम मायासक्तच असतात. मनाच्या आवडी-निवडीनुसार असतात. जगरहाटीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न, असं आपण त्यांचं समर्थनही करीत असतो.

हे जे ‘जग’ आहे ते कसं आहे? निसर्गदत्त महाराज म्हणतात त्याप्रमाणे ज्याचं त्याचं जग वेगवेगळं आहे! कारण प्रत्येकाचं जग त्याच्या इच्छेला अग्रक्रम देणारं आहे. त्याच्या कल्पनेनुसारच्या सुखप्राप्तीच्या धडपडीनं भरलेलं आहे. काही माणसं, काही वस्तू आणि ठरावीक परिस्थिती यासाठी सतत तळमळणारं आहे. तुम्हाला खेटून उभ्या असलेल्या माणसालादेखील तुमच्या ‘जगा’ची कल्पना येऊ  शकत नाही, इतकं ते व्यक्तिगत आहे! प्रत्यक्ष जगात अनंत ‘मी’ असताना आणि जो-तो त्याच्या त्याच्या स्वार्थात रुतला असताना हे जग तुमच्या तळमळीला कुठवर किंमत देईल? तर जोवर त्यात जगाचा काही स्वार्थ साधला जात असेल तिथवर.

आणि यात जगाचा काही दोष नाही बरं. कारण मीदेखील तसंच तर स्वार्थप्रेरित प्रेम आणि द्वेष या जगात करतो! तेव्हा या जगाकडून जो आघात होतो तो माझ्याच भ्रामक मायासक्त धारणेतून मीच स्वत:वर ओढवून घेतलेला असतो.

श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात त्याप्रमाणे, ‘आघात जगाचे नाहीत, आपलेपणाचे असतात.’ त्यामुळे खरं तर प्रत्येक आघात, प्रत्येक संकट आपल्याला जागं करीत असतं. त्यानं तरी आपण भानावर येऊन सद्बोधानुसार जगण्याचा अभ्यास केला पाहिजे.