– चैतन्य प्रेम

देहाच्या आधारावर माणूस जसं आंतरिक प्रगतीचं व्यापक क्षितिज गाठू शकतो तसंच या देहाच्या आधारावर संकुचिताच्या खोडय़ात अडकून तो अधोगतीचा रसातळही गाठू शकतो. त्यामुळेच ‘एकनाथी भागवता’च्या नवव्या अध्यायात संत एकनाथ महाराज सांगतात, ‘‘तरी हें त्यागावें ना भोगावें। मध्यभागें विभागावें। आत्मसाधनीं राखावें। निजस्वभावें हितालागीं।।२५३।।’’ म्हणजे हा देह त्यागू नये, तिरस्कारू नये, पण त्याचबरोबर तो अनिर्बंध देहसुखापुरताच भोगूही नये. मग या नरदेहाचा काय उपयोग करावा? तर निजहितासाठी हा देह परमार्थाकडे अधिक वळवावा. एकनाथ महाराज फार चपखल शब्द योजतात ‘आत्मसाधन’! हा देह आत्मसाधनासाठी सतत राखावा. ‘श्रीअवधभूषण रामायणा’त देह हा केवळ ‘साधनधाम’ असल्याचं म्हटलं आहे. अर्थात साधनेसाठीच हा देह राबवायचा आहे. तो साधनेचं घर आहे. म्हणजेच घरात जशा आपण प्रपंचपूरक अशा सर्व सोयी करतो तशा देहरूपी घरातील सर्व सोयी (क्षमता) या परमार्थपूरक करायच्या आहेत. म्हणजे डोळ्यांच्या आधारावर पाहण्याची क्षमता लाभली आहे. तर व्यवहारासाठी या दर्शनक्षमतेचा वापर करतानाच परमार्थासाठीही तिचा वापर वाढवत न्यायचा आहे. म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन, सद्गुरू दर्शन, त्यांच्या रूपाचं ध्यान साधायचं आहे. कानांद्वारे लाभलेल्या श्रवण क्षमतेचा उपयोग व्यवहारात करीत असतानाच सत्संग श्रवणासाठीही तो वाढवीत न्यायचा आहे. हातांद्वारे लाभलेल्या कर्मक्षमतेद्वारे सेवा आणि सत्कर्म, पायांद्वारे लाभलेल्या चलन क्षमतेद्वारे आंतरिक यात्रेशी जोडलेली बाह्य तीर्थाटनं, सेवा साधायची आहे. एकनाथ महाराजही म्हणतात की, ‘‘हेतू ठेवूनि परमार्था। गेहीं वस्ती करून जेवीं उखिता। देहआसक्तीची कथा। बुद्धीच्या पंथा येवों नेंदी।।२५५।।’’ म्हणजे परमार्थाचा मुख्य हेतू बाळगून देहरूपी घरात एखाद्या पांथस्थाप्रमाणे वस्ती करावी आणि बुद्धीच्या आधारावर देहाची आसक्ती जोपासू नये. पांथस्थ म्हणजे वाटसरू. पूर्वी लोक पायीच प्रवास करीत असत. संध्याकाळ झाली की मग वाटेतील कोणत्या तरी मंदिरात वा धर्मशाळेत किंवा कधी कधी कोणा धर्मवान प्रापंचिकाच्या घरी रात्रीपुरती वस्ती करीत. पण जिथं आपण आसरा घेतला आहे, ते स्थान आपलं कायमचं निवाऱ्याचं स्थान नाही, याची जाणीव खोलवर असे. त्यामुळे त्या जागेत ते आसक्तीनं वावरत नसत. मग जो देहदेखील कायमचा राहाणारा नाही त्याची आसक्ती का बाळगावी? अनेक अभंगांमध्ये नाथमहाराजांनी हाच बोध केला आहे. ते म्हणतात, ‘‘देह हा काळाचा जाणार शेवटी। याची धरुनी मिठी गोडी काय?’’ जो अखेर जाणारच आहे त्या देहाला मिठी मारून जन्म घालवण्यात काय गोडी? ते विचारतात, ‘‘अशाश्वतासाठीं। कां रे देवासवें तुटी।।’’ ज्या देहाशी असलेला संबंध कालप्रवाहात कोणत्याही क्षणी तुटणार आहे त्या अशाश्वत देहाच्या आसक्तीपायी देवाशी असलेलं कायमचं नातं का तोडतोस? म्हणूनच, ‘‘नरदेहीं येऊनी करीं स्वार्थ। मुख्य साधीं परमार्थ।।’’ नरदेहात आला आहेस ना? मग आता खरा स्वार्थ म्हणजे परमार्थ साधून घे! त्यासाठी  ‘‘देह सांडावा ना मांडावा। येणें परमार्थचि साधावा।।’’ देह सांडू नका की मांडू नका, त्यायोगे केवळ परमार्थ साधा! नाथ महाराज सांगतात, ‘‘जेणें देहीं वाढे भावो। देहीं दिसतसे देवो!’’ या देहात परमार्थ साधनेनं जसजसा विशुद्ध भक्तीभाव वाढत जाईल, तसं या देहातच विलसत असलेल्या दिव्यत्वाचं दर्शन घडू लागेल!

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…